Horn
आज संध्याकाळी बागेत बसले असतांना विचार मनात सुरू होते . समोरून जाणाऱ्या गाडीने जोरात हॉर्न वाजवला आणि माझी समाधी भंग पावली . विचारांची शृंखला तुटली पण हेही वाटलं , बरं झालं हॉर्न वाजला आणि मनातले विचार थांबले कारण मनात सुरू असणारे विचार हे काही फारसा आनंद देणारे नव्हते . असो . खूपदा नकळत असे विचार मनात कधी सुरू होतात कळतच नाही आणि ते थांबवायला कधी कधी मनाची तयारी नसते तर कधी त्यामुळे निर्माण होणारा राग , चीड , दुःख , हतबलता यांना क्षणिक वाट मिळून मोकळं वाटलं अस मनाला वाटत असतं , हो ना ?
रोज सकाळी घरची काम आटोपून रस्त्याने ऑफिस ला जातांना जशी रस्त्यावर लोकांची असते तशीच मनात विचारांची गर्दी असते , हो ना ? घरी काय करायचं राहिलय ? ऑफिस मध्ये गेल्यावर पाहिलं काम कुठलं करायचं आहे ? कुणाला काल काय करायला सांगितलं होतं ? आज जमलं तर घरी जातांना भाजी न्यायची आहे एक ना अनेक . डोक्यात विचार सुरू असतात आणि सवयीने ठरलेल्या रस्त्यावरून आपण जात राहतो . त्यावेळी बाजूने जाणाऱ्या व्यक्तीकडे देखील कधी कधी लक्ष नसतं . ती व्यक्ती नंतर कधी भेटली तर सांगते , मी तुमच्या समोरून गेलो पण लक्षच नव्हतं तुमचं , होतं ना अस ? दिसत असतं सगळं पण मेंदूपर्यंत कदाचित ते पोहोचत नसतं . एखादी गाडी बाजूने जोरात हॉर्न वाजवत जाते तर कधी red signal येतो , थांबायला लागतं आणि त्या तंद्रीतून आपण वर्तमानात येतो . होतं ना असं ?😊
असे हॉर्न हे फक्त विचारांसाठी आवश्यक आहेत का ?
कधी मित्रांच्या whatsapp ग्रुप मध्ये चॅटिंग करतांना किंवा कुठे एकत्र जेवायला बाहेर गेलो असतांना तर कधी कुठे एकत्र गप्पा मारत असताना संभाषण निराळं वळण घेत आणि नकळत वातावरण तंग होतं . त्यावेळी कुणाला आलेला खोकला , लागलेला ठसका किंवा अगदी साधी शिंक किंवा waiter ने आणलेलं पाणी हे सुद्धा तो वाद थांबवण्याचा हॉर्न असू शकतो . अर्थात हॉर्न चा आवाज येईलच अस मात्र नाही , ती साधी एखादी छोटी हालचालही असू शकते मग ते खुर्ची सरकवत मागे जाणं असो वा अजून काही . नंतर वाटतं , अस म्हंटल नसतं तर पुढचा वाद टळला असता किंवा त्यावेळी हसायला नको होतं किंवा अजून काही . पण तो हॉर्न मात्र नेमक्या वेळेला वाजायला हवा . अशा वेळी असा हॉर्न वाजण्याची सोय असती तर किती बर झालं असतं .
आपलं शरीर सुद्धा आपल्याला वेळोवेळी हॉर्न देतंच असतं . डोळे दुखणं , डोकं दुखणं . पोट दुखणं हे तर अगदी नॉर्मल आहे . कधी कधी सारखं थकल्यासारखं वाटतं . कधी पाय दुखतात , कधी दात अथवा हिरड्या दुखतात , कधी जिना चढतांना धाप लागते तर कधी अजून काही . आपल्या सर्वांना हे कशामुळे होतं असावं हा अंदाज बहुतेकवेळा येतो . त्यावेळी त्याकडे जर वेळेवर लक्ष दिल्या गेलं तर संभाव्य धोका टाळता येतो . बरोबर ना ?
समुद्रात जहाज रात्री अंधारात पाण्यात प्रवास करत असतात त्यावेळी दिपस्तंभांवरचा प्रकाश त्यांना जमीन जवळ आहे हे दर्शवत किंवा कुठे खडकाळ भाग आहे , धोका आहे अशी धोक्याची घंटा वाजवून सांगत त्यामुळे अपघात टाळायला मदत होते . अशी धोक्याची घंटा कधी कधी आपल्या मनातही वाजते , वाजते ना ? काही करत असताना , कुठला निर्णय घेत असतांना कधी कधी उगीचच मनात एखादी शंकेची घंटा वाजते . ती कधी आपण ऐकतो आणि ते काम करत नाही , कधी ती ऐकू येत नाही तर कधी ऐकू आली तरी ते करणं किंवा तो निर्णय घेणं त्यावेळी जास्त महत्वाच वाटल्याने त्या वाजणाऱ्या घंटेकडे दुर्लक्ष केल्या जात .
अस म्हणतात " From fear of the unknown, both horns and wings have grown "
हे वाक्य खरंच किती अर्थपूर्ण आहे .
आपण घरात असतांना किंवा आपल्या शहरात ओळखीच्या रस्त्यांवर वावरतांना खूपदा फारसा विचार न करता फिरत असतो तेच ज्यावेळी अनोळखी गावात , दुसऱ्या देशात किंवा अगदी आपल्याच गावात पण अनोळखी area त गेलो तर आपलं लक्ष येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे , दुकानांकडे असतं . जास्त सतर्क असतो त्यावेळी आपण . त्यामुळे हॉर्नस पटकन ऐकू येत असतात आपल्याला . कान टवकारले असतात , डोळे नुसतेच उघडे नसतात तर ते सगळं नीट अवलोकन करत असतात . होतं ना अस ?
कुठल्याही नवीन क्षेत्रात व्यक्ती ज्यावेळी पहिल्यांदा जाते मग ते कुठलंही असो , भ्रमंती , व्यवसाय , खेळ , अभ्यास त्यावेळी मनात , मला हे जमेल का ? रस्ता सापडेल का ? मी यशस्वी होईन का ? अजून कितीतरी प्रश्न त्या त्या क्षेत्राप्रमाणे मनात येतात . थोडी भीतीही वाटत असते . हीच भीती मनातले हॉर्नस अधिक सतर्क करते तसेच त्या भीतीवर मात करण्यासाठी , उंच भरारी घेण्यासाठी पंखांमध्ये बळही देते . हो ना ?
Horn कुठेतरी कुठलेतरी सतत वाजत असतात . कधी ते ऐकू येतात , कधी नाही . कधी लक्ष असत , कधी नाही . काहीवेळा लक्ष नसेल तर अपघातही होतात . कधी लहान तर कधी मोठे . कधी हॉर्न छोटे असतात तर कधी मोठे कर्कश . कधी निसटते आवाज तर कधी मंजुळ . निरनिराळे स्वरही असतात , कधी खर्जातले तर कधी एखादी शिट्टी अगदी कुकर ची का असेना . असे हॉर्न जेव्हा वेळोवेळी वाजतात त्यावेळी ते प्रत्येकवेळी आपल्याला ऐकू आले तर ? तर कितीतरी नकळत अथवा भावनेच्या , आवेशाच्या भरात बोलल्या जाणाऱ्या , केल्या जाणाऱ्या , सांगितल्या जाणाऱ्या ठरवल्या जाणाऱ्या गोष्टींना , वादांना थांबवता येईल . चुकीच्या वेळी चुकीचे निर्णय घेतले जाणार नाहीत . पटकन ब्रेक मारता येईल आणि संभाव्य धोका टाळता येईल . " सूनने की क्षमता तो है सबमे " काय ? काय वाटतं तुम्हाला ?











