Followers

Wednesday, 25 March 2020

गुढीपाडवा

गुढीपाडवा


सर्वांना माझ्या कडून  गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा . खरतर दरवर्षी गुढीपाडवा  येतो , आपण सगळे तो साजराही करतो . हो न , मात्र यावर्षीचा  गुढीपाडवा नक्कीच सर्वांच्या लक्षात राहणार आहे . जरी तो निराळा नसला तरी आपण भारतीयांचं जग , जगण्याची पद्धत , विचारांची दिशा मात्र आजपासून बदलणार हे निश्चित .

 तुम्हाला तसही लक्षात आलंच आहे की मी काय म्हणते आहे ते , बरोबर न . हा वागण्यातला , विचारातला बदल नक्की खरंच कशामुळे आहे . हे जे आपण आत्ता सगळं करतोय ते तर आपले आईबाबा , आजीआजोबा , आपण सर्व करतच होतो , होतो न ? त्यात थोडेफार बदल आपल्या पिढीने केले . सर्वच बदललं असं नाही ,  कुठे कुठे सोयी पहिल्या गेल्या , कधी गरज तर कधी कुठल्या रूढी ज्या वेळेनुसार relevent राहिल्या नाही असं वाटलं . अर्थात हे सर्व व्हायला भरपूर काळ जावा लागला . आज मात्र एका जादूच्या कांडीने एका झटक्यात खूप काही परत मूळ पदावर आणून ठेवलंय . ही जादू नक्की आहे कशाची ? ही जादू झालीय कदाचित आपल्या सगळ्यांच्या मनात असलेल्या भीतीची . कुणी बोलून दाखवतात कुणी नाही . भीती मात्र प्रत्येकाला वाटतेय . कुणाला वाटतंय मला काही झालं तर ? कुणाला वाटतंय माझ्या कुटुंबियांना काही झालं तर ? कुणाला किती दिवस घरात राहायचं , काय करू इतके दिवस ?  कुणाला वाटतंय , मला काम तर बंद करता येणार नाही , बाहेर गेलं आणि काही झालं तर ? कुणाला मी बाहेर नाही जाणार , काम नाही करणार तर पैसे कसे मिळतील ? घर कसं चालणार ? कुणाला कशाची तर कुणाला कशाची , व्यक्ती तितक्या प्रकारच्या भीती , काय बरोबर न .

आपण नेहमी म्हणतो " होनी को कौन टाल सकता है " । हे जरी खरं असलं तरी सध्याच्या परिस्थितीत आपण ते काही प्रमाणात टाळू शकतो हेही सर्वांना माहिती आहे . ही जादू तस पाहिलं तर एक दिवसात झाली असंही नाही . हळूहळू 1, 2 महिन्यात या भीतीच्या रोपाच झाड झालंय आणि आता तो वृक्ष होण्याच्या मार्गावर आहे . एक गोष्ट वाचलीय सगळ्यांनी लहानपणी , एका ठिकाणी एक अंबाडीच छोट रोप आलं . ते एक पक्षी त्याच्या चोचीने तोडू लागला . त्याच्या पिल्लाने विचारलं , या झाडाला दाणे नाहीत , फळ नाहीत , याची पानही आपण खात नाही ,यावर आपण घरटंही बांधत नाही , मग हे झाड तोडण्यात तू तुझी शक्ती का खर्च करते ? त्या पक्षाने पिल्लाला सांगितलं , अरे हे रोप आपल्याला काही देत नसलं , त्याचा जरी आत्ता आपल्याला उपयोग अथवा अपाय होत नसला तरी जेव्हा हे झाड मोठं होईल , त्याच्या तंतुपासून फासेपारधी जाळ तयार करेल आणि आपल्याला त्यात पकडेल त्यावेळी ते तंतू इतके मजबूत झाले असतील की आपल्याला चोचीने ते तोडता येणार नाहीत म्हणून आत्ताच हे झाड जर तोडलं तर पुढे येणारा धोका टाळता येईल . आठवली ही गोष्ट ? तसच काहीसं आपलं सगळ्यांच होतंय . सुरुवातीलाच आवश्यक ती काळजी घेणं जरुरी  आहे मात्र मनातल्या भीतीमुळे कुठेतरी physically fit असणारी व्यक्तीही मानसिक रित्या स्वतःला दुर्बळ करते आहे .  आपण सर्वांनी वाचलंय की आधी माणूस मनाने हरतो . कितीतरी यशस्वी व्यक्तींच्या मुलाखतीत ऐकलंय सर्वांनी की यशस्वी होण्यासाठी , त्या मार्गावर चालण्यासाठी mentally strong असणं किती आवश्यक आहे . ती व्यक्ती खेळाडू  असो , व्यावसायिक , actor असो किंवा अगदी social worker सुद्धा . प्रत्येकाचा अनुभव हेच सांगतो . परिस्थिती ही मनुष्याला नमवण्यासाठी प्रयत्न करते ,  कधी आजूबाजूचे लोकही त्या परिस्थिलाच मदत करतात , कधी कधी आपले सुद्धा . त्यावेळी जी व्यक्ती स्वतःच्या मानसिक प्रबळतेचा आवश्यक तो उपयोग करते तीच त्या परिस्थितीशी मुकाबला करून जिंकते आणि स्वतःला सिद्ध करते .

आजकाल खेळाडूंना साठी mental trainer असतात . Brain trainer किंवा mind trainer हे त्या athlete किंवा ज्या कुठल्या sport साठी तो खेळाडू तयारी करतोय त्याची mental strengh वाढवण्यासाठी training देतात . लहान मुलं जेव्हा मोठ्यांना कधी विचारतात हे मी करू का ? मला जमेल न ? तेव्हा काय सांगतो आपण त्यांना , अरे जमेल तुला . करशील तू  आणि कितीतरी निरनिराळ्या व्यक्तींची उदाहरण देतो त्यांना आपण आणि त्यांनी  परिस्थितीवर कशी मात केली हे सांगतो , बरोबर न . यामुळे त्यांच्या मनात आलेल्या शंकेच निरसन तर होतच तसच त्यांच्या मनाला ही उभारी मिळते . 

आज हवाय  तो असाच मनाला उभारी देणारा आत्मविश्वास वाढविणारा आदर्श . प्रत्येकाचे आदर्श वेगळे असू शकतील , ध्येय मात्र एकच आहे . आज नवचैतन्याची गुढी मनामनातही उभारली जाणार .  संकट कितीही बिकट असो  , आपण  सर्व ,  मनातील सगळी मरगळ  झटकून अत्यंत दक्षतेने ,  निर्धाराने,  एकजुटीने या संकटाला परतावून लावु हा संकल्प करू या .
                 
हे नूतन वर्ष आपणा सगळ्याना आनंदाचे , भरभराटीचे , सुख समाधानाचे व आरोग्यदायी आणि मनोकामना पूर्ण करणारे जावो हीच मनीषा . 





#gudhipadwa# , #गुढीपाडवा#

Tuesday, 10 March 2020

मेंदी

मेंदी

घरी मेंदीचा cone खूप दिवसांचा ठेवलेला होता म्हंटलं चला आज मेंदी काढू हातावर . मेंदी काढणं किती सोप्प झालंय न आता .

लहानपणी मेंदी हातावर काढायची ठरवली की कित्ती आधीपासून तयारी सुरू व्हायची . कुणाकडे मेंदीच कुंपण आहे त्यांना विचारून मेंदीची पान खुडून आणायची . कधी कुण्या मैत्रिणींनी सांगितलं की कुठल्यातरी एका घराजवळच्या मेंदीचा रंग जास्त रंगतो की मग तिथे जाऊन आणायची पान . त्यांना विचारल्यावर त्यांनी दिली तर छानच नाहीतर मग .......पण आणायची ती . असो .

मेंदीची पान आणली की पुढचे सोपस्कार सुरू . आधी त्यावरची धूळ स्वच्छ करायला ती धुवायची .त्यानंतर कापडावर ठेवून त्यातलं पाणी सुकवायचं .  पुढच्या कामासाठी मात्र आई लागायची . पाटा वरवंट्यावर वाटावी लागायची न  मेंदी . आईच्या मागे  लकडा सुरू व्हायचा , अग आई झालं का तुझं काम , लवकर कर न ग , संपतच नाही बा तुझं काम . तू आता काही करू नको बर दुसरं काम ,  ठेऊन दे सगळं ,  हो हेच मेंदी वाटणं सगळ्यात महत्वाचं काम आहे , चल न ग . असे सगळे संवाद सगळ्या घरी व्हायचे .  मेंदी वाटताना हात रंगणार हे आईला  माहिती असल्यामुळे कितीही मागे लागल तरी सगळी काम आटोपली की मगच ती आपलं ऐकायची . मग सुरू व्हायचं मेंदी वाटणं . आईनी वाटायला सुरुवात केली की मजा यायची  ते वाटणं बघायला .  पाट्यावर ठेवलेली पान त्या वरवंट्याखालून पुढे जातांना बघणं , वा . मी पण करते चा धोशा लावला की आई ते वाटायला द्यायची पण ती पान अडून बसायची , समोर जायचीच नाहीत . एकतर तो वरवंटा जड त्यात तो आई करायची तसा हलायचाही नाही . बर थोडा प्रयत्न करून हलवला तर ती दुष्ट पान  बारीक न होता तशीच पुढे जायची . आता हसू येत पण तेव्हा वाटायचं हे आपल्याला कस जमत नाही , आई जे करतेय तेच तर केलं न आपण . काय ,  केलाय न हा प्रयोग बहुतेक सर्वांनी कुणी मेंदी वाटताना तर कुणी चटणी , मसाला वाटताना , बरोबर न .

 तो प्रयत्न सोडून नंतर फक्त मेंदीची पान आईनी सांगितल्यावर पाट्यावर ठेवणं हे करण्यातही मजा यायची . कशी ती ठेवलेली पान वरवंट्याखालून बारीक होत होत पुढे जातात आणि बघता बघता संपतात याकडेच लक्ष असायचं . मग मात्र पाट्यावर जागा कमी पडायला लागायची . ती वाटलेली मेंदी एका दुसऱ्या भांड्यात गोळा करून ठेवली की  परत पान ठेवण सुरू . हे करता करता आईचे हात कसे मेंदीनी रंगून जायचे . आता मी कधी मेंदी लावणार याचे वेध लागायचे . त्यावेळी मेंदी लावणं म्हणजे  वाटलेली मेंदी हातावर थापायची आणि देवबाप्पासारख दोन्ही  हातावर मोदक घेतल्यासारखं बसून राहायचं . त्यातला तो रंगीत रस कधी कधी खाली गळायचा .  ते व्हायला नको म्हणून  एकावर एक हात करत तो रस सांडू न देण्याची कसरत करायची . अस वाटायचं तो रस खाली पडला तर तेवढी मेंदी कमी रंगेल न . ती मेंदी कोरडी होईपर्यंत बसून राहायचं . अस बसलेलं असताना चिडवत नाही , टपली मारून जात नाही तो भाऊ कसला . तो मेंदीचा सुगंध काही औरच होता.

नंतर मात्र बारीक मेंदीची पूड बाजारात आली . ती  भिजवून लावणं सोपं झालं . त्याची अजून एक निराळीच मजा . मेंदी आणल्यावर  ती भिजवणे ही एक मोठ्ठी process असायची . साधी भिजवून लगेच लावली तर फार काही रंगायची नाही .  आपल्याकडच्या मेंदीच्या शास्त्रज्ञांनी आपापले डोके लावून त्यावर उपाय शोधले . एक तर ती एक दिवस आधी भिजवायची , तीही लोखंडाच्या भांड्यात  .  कोणी सांगायचं त्यात थोडी भेंडी घातली की छान तार येते आणि बारीक design काढायला सोपं होतं . रंग dark लाल हवा असेल तर काथ घालायची . तो तर  त्यावेळी घरी असणाऱ्या  पानदानात मिळून जायचा . मेंदीचा रंग काळसर यायला हवा असेल तर त्यात थोडा आवळा किंवा जर शिकेकाई करायला आईने आवळकंठी आणली असेल तर ती घालायची . आवळा मिळणं सोपं असायचं पण आवळकंठी जरा आईला लाडीगोडी लाऊन मिळवावी  लागायची . मेंदी लावायला बारीक काडी हवी मग ती कधी माचीस ची , कधी उदबत्ती तर कधी खराट्याची घ्यायची . जेवढी बारीक काडी तेवढी मेंदी नाजूक काढता यायची . पानांच्या मेंदीपेक्षा ही वाळायचीही लवकर .  मात्र  गंमत अशी की मेंदी लवकर वाळली तर रंगणार नाही अशी भीती आधीच आपल्या मैत्रिणींनी घातलेली असल्यामुळे ती थोडं थोडं पाणी कापसाला लावून ओली करत राहायची ,  तेही रात्रभर . बरं एव्हढ्यानेही भागायच नाही .  मेंदी तंत्रज्ञांनी शोध लावला की ते साखरेचं पाणी असावं त्यामुळे मेंदी लवकर वाळत नाही आणि रंग अजून छान चढतो .  technology वाढली आणि त्याची जागा निलगिरी तेलाने घेतली ,  जे सारखं लावावं लागायचं नाही , बस एकदा किंवा दोनदा. झालं . त्यानंतर मेंदी वाळल्यावर पाण्यानी धुवायची पद्धत ही या नवीन technology मुळे बंद पडली .  मेंदी तंत्रज्ञांनी सांगितलं की वाळलेली मेंदी फक्त काढून टाकायची आणि त्यानंतर 12 तास पाणी हाताला लावायचं नाही  . बापरे काय काय सोपस्कार ती मेंदी रंगण्यासाठी.

इतकं करून एखादेवेळी मेंदी रंगायची नाही मग  कुठल्या दुकानातून आणली यावर चर्चा रंगून ते दुकान बाद व्हायचं . ज्या मैत्रिणीची मेंदी रंगली असेल तिच्या बरोबर सल्ला मसलत व्हायची , कित्ती छान रंगली तुझी मेंदी , कशी भिजवली ? काय काय घातलं त्यात ? कुठून आणली तू ? वगैरे वगैरे . कुठल्या दुकानातून असो वा दूरच्या एखाद्या घराजवळून पान खुडून आणायची असो या कार्यात  खोडकर भाऊच मदतीला यायचे . ती मदतही काही फुकफूकी मिळत नसे . असो     ती मैत्रीण  तिनी मेंदी कशी भिजवली , कशी लावली ,  त्यानंतर कायकाय केलं याच साग्रसंगीत वर्णन रंगवून रंगवून सांगायची .  पुढच्या वेळी कुठून मेंदी आणायची आणि कशी लावायची याची रंगीत तालीम व्हायची . वा ही चर्चा  ती मेंदी हळूहळू पुसट होईपर्यंत परत परत रंगायची .

मेंदी काडीने लावणं सुरू असताना मग शोध लागला घरी plastic च्या बॅग चा cone तयार करून त्याने मेंदी लावण्याचा . तसे कोन तेव्हा फार कमी लोकांना यायचे . हळूहळू कलाकार तयार झाले . आता तर हे कौशल्य काही लोकांनी तर इतकं छान आत्मसात केलंय की ती मेंदी पाहतच राहावीशी वाटते . बारीक नाजूक रेषा , निरनिराळ्या पद्धतीचे नक्षीकाम , कधी अरेबियन style तर कधी लग्नात , मौन्जीत  असलेले विधी सुद्धा त्या मेंदीने हातावर काढले जातात .

 मेंदीचे cone विकत मिळतात . आणून ठेवले की कधीही मेंदी लावता येते .  ही इन्स्टंट मेंदी  लावता पटकन येते , वाळतेही लवकर तसच फारसे काही प्रयत्न न करता रंगतेही . त्यामुळे आता घरी मेंदी भिजवून लावणं बंद झालय .आता घरी मेंदी भिजवल्या जाते ती केस रंगवण्यासाठी , हो न .

एक मात्र  खरं की ज्या मेंदीकडे  कौतुकाने आपण बघत असतो तिचे जेव्हा 2, 3 दिवसानंतर  पोपडे उडल्यासारखे अर्धवट रंग उडतात त्यावेळी वाटत पटकन पुसट व्हावी, उडून जावी ,  हो न .  ती जुन्या वेळेची मेंदी कशी हळूहळू पुसट होत जायची आणि एकसारखी दिसायची . कितीतरी दिवस  कौतुकाने त्या मेंदीकडे बघण्यात जायचे .

" 2 दिवस कौतुकाचे " अस झालंय या मेंदीच . मेंदी भिजवण्यापासून जे कौतुक त्या मेंदीच सुरू व्हायचं ते या मेंदीच फारसं होत नाही , हो न .  मेंदीची पान खुडून आणण्यापासून ते ती रंगेपर्यंत च्या खटपटीत , मेहनतीत  गुंफलेले अनेकांचे हात असायचे त्यामुळेच कदाचित त्याची रंगत वाढत जायची आणि कौतुकही तेवढं जास्त असायचं , हो न. याबरोबरच हाही विचार मनात येतो की अस फक्त मेंदीचच झालंय का ?


#nostalgic


Sunday, 1 March 2020

कंटाळा

 कंटाळा

आज सकाळपासून जरा कंटाळाच आला होता , आधी सकाळी उठायचा मग काम करायचा..... सकाळच्या वाऱ्यात चहा घेत  नुसतं बसून राहावंसं वाटत होतं . घड्याळं पाहिलं मात्र मग कंटाळा बाजूला सारून उठले आणि लागले कामाला . सवयीने सगळं सुरळीत पार पडत होतं पण मनात मात्र आज रोज सारखा उत्साह नव्हता , ना काम करण्यात , ना नवऱ्याशी वाद घालण्यात . हो ती पण एक दिवसाची मस्त सुरुवात असते . थोडा एकमेकांशी विनाकारण वाद घातला  की दिवस कसा मस्त जातो , सगळी मरगळ निघून जाते .  प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक आपली व्यक्ती असते जिच्या बरोबर दूध कुणामुळे उतू गेलं पासून ते तिसरं महायुद्ध का होईल या सगळ्या विषयांवर वादविवाद करता येतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बोलतांना फारसा विचार करून बोललं नाही तरी चालत . युतीच सरकार मतभेद करत करत चालतच राहत , काय खरं न . हे माहिती असल्याने आपल्याला त्यातही आनंद मिळतो  . आपणही खूश ....... काम पटापट आवरून office ला जायला तय्यार . आज मात्र तसही काही झालं नाही कारण आज त्यातही रस वाटत नव्हता .

खरंच कंटाळा का येतो आपल्या सर्वांना कधी कधी ? होतं असं आपलं सगळ्यांचंच , हो न .

कुठलीही गोष्ट टाळायची असली की कंटाळा येतो  का ? ......  म्हणूनच यात टाळा हा शब्द असेल का?

कंटाळा म्हणजे प्रत्येक वेळी काही टाळण्यासाठी येतो असही तर नाही . कधी कधी एकच एक काम वारंवार केल्यामुळे ते करावंस वाटत नाही . आयुष्य रटाळ झालय अस वाटायला लागतं . असंही तर होतं , होतं न ?

 तोच तो विचार करून मन थकत , तेच ते काम करून शरीर थकत , तेच ते आयुष्याचं चित्र पाहून डोळे थकतात , तेच ते बोलणं ऐकून कान थकतात . थकण मनाचं असो ,  शरीराचं , डोळ्यांचं असो किंवा कानांच ,  कुठलंही असो , थकण हे कंटाळ्याला दिलेलं आमंत्रण असतं .आमंत्रण आपोआप जातं मेंदूला .

 थकल्यावर आराम आवश्यक आहे मग तो आराम कसलाही असू शकतो .  झोप झाल्याने डोळ्यांचा आराम तर होईल पण तेच ते दृश्य रोज पाहणं कस थांबवणार ?  त्यासाठी कुठला आराम देणार डोळ्यांना ? घरात किंवा office मध्ये तेच तेच काम , त्याच तशाच meetings , त्याच त्याच लोकांबरोबर जमवून घेणं , कधी कधी तीच कुरबुर ,  रागावणं किंवा अजून काही सुरू असतं अशावेळी  त्यापासून दूर कस होणार ? कानांना , डोळ्यांना आराम कसा देणारं ? थकलेल्या शरीराला आराम देणं सोपं आहे पण मनाला ? त्याला आराम कसा देणार ?

एक वाक्य वाचलं होतं  मागे , rest is nothing but change of work .

सकाळी उठल्यापासून जर कुठलीही व्यक्ती निरनिराळ्या कामांमध्ये गर्क असेल मग ते अगदी चहा करणं असो की पेपर वाचन , बाजूला राहणाऱ्या व्यक्ती बरोबर 2 वाक्य बोलणं असो की कुणा आमंत्रण द्यायला आलेल्या व्यक्ती बरोबर होणारा संवाद , office मध्ये होणाऱ्या project meeting असो किंवा दुपारी लंच time ला केलेल्या गप्पा .  रात्रीपर्यंत निरनिराळी काम  करण्यात , अगदी काही वेळ घरी निवांत एकटं बसण्यात सुद्धा व्यक्ती जर busy असेल तर कंटाळा हा शब्द आठवतही नाही .

खूपदा आपणच आपलं रोजचं routine ठरवून स्वतःला बंदिस्त करतो . हे रोज करायचंच , याच वेळेला करायचं , यानंतर हे करायचं , त्यानंतर ते करायचं . यामुळेच कदाचित त्या चक्रात आपण गोल गोल फिरत राहतो . आपल्या सगळ्यांना माहिती आहे खूप जास्त गोल फिरत राहिलं आणि तेही वेगाने तर कुठल्याही व्यक्तीला थोड्या वेळाने चक्कर ही येणारच . बरोबर .

निरभ्र नीळ आकाश सुंदर दिसतं , पण त्यात जेव्हा कापसासारखे ढग निरनिराळ्या आकारात पसरलेले दिसतात ते अजून जास्त विलोभनीय वाटतात . त्यात निरनिराळे आकार शोधतांना मजा येते . एकाच ढगात एका व्यक्तीला हरीण दिसत तर दुसऱ्याला वाघ . सूर्योदय किंवा सूर्यास्ताची वेळ असेल तर आकाशात झालेली रंगांची उधळण पाहातांना मन प्रसन्न होतं . मी रंगांची उधळण म्हंटल , लक्षात आलं का तुमच्या ? रंग उधळले जाऊन एकमेकात मिसळतात , कसेही . त्यांचं ते अस अनिर्बंध मिसळून परत वेगळं दिसणं हेच तर भावतं मनाला .हो न.

झाडांकडे बघा , त्यांची रंगसंगती , फुलांचे रंग . सगळं कसं contrast असतं . साचेबंद नसत काहीच , म्हणतो पहा आपण फुलांनी फुललेली , डवरलेली झाडं . फुल , फळसुद्धा झाडांना निरनिराळ्या ठिकाणी लगडलेली असतात , काही  वरून दिसतात , काही डोकावून बाहेर बघत असतात तर काहींना आपल्याला आत डोकावून बघावं लागतं . बरोबर .

समुद्राचं , नदीच कुठलंही पाणी बघा त्यावर पडणाऱ्या प्रकाशामुळे त्यांचं चमकदार दिसणं मनाला भावतं . आजूबाजूच्या झाडांची पाण्यात पडलेली प्रतिबिंब मनाला आकर्षित करतात . बाजूचे निरनिराळ्या आकारांचे दगड , रेती , छोटे प्राणी सगळं कसं अफलातून असतं . खरतर यांचं एकत्रपणे दिसणार  वेगळेपण हेच यांचं सौन्दर्य फुलवत , खुलवत .  निसर्गातील हे वेगळेपण आपणही शिकायला हवं . प्रत्येक दिवस जेवढा जमेल तेवढा वेगळा जगायला हवं . रोज काहीतरी निराळं करायला हवं . जे काल केलं नाही ते आज करायचं . जशी एकच भाजी निरनिराळ्या प्रकारे केली तर तिची चव बदलते त्यासाठी त्यात आपण निरनिराळे मसाले घालतो किंवा कधी अगदी साधी भाजी करतो . मिळमिळीत भाजीला चव यायला आपण  एक मस्त खमंग  तडका देतो तसच दिवसालाही एक तडका द्यायचा. तो कसा , केव्हा आणि कशाचा  द्यायचा हे ज्याचं त्यानी ठरवायचं . रोजचा दिवस जगतांना दिवसभरात एक काहीतरी अस करायचं जे त्यावेळी आपल्याला करावस वाटेल .

कंटाळा यावा असं मनातून कुणालाच वाटत नाही पण तरीही होत असंही कधी की ठरवूनही त्यातून आपण बाहेर पडू शकत नाही . हे जस कधी होतं तसच कधी  होत नाही हे मात्र आपल्या लक्षात येत नाही . ज्यादिवशी जमेल त्यादिवशी मुद्दाम routine बदलून बघा . सकाळी घरी चहा घ्यायच्या ऐवजी जवळच्या टपरीवरचा चहा घ्या . घरासमोरून शाळेत जाणाऱ्या छोट्या मुलांची सहज विचारपूस करा . ते 10 मिनिटे तुमचा दिवसच छान करून जातो . कधी खूप दिवसात न भेटलेल्या मित्राला किंवा कुणा नातेवाईकांना फोन करा , मज्जा वाटते . कधी ऑफिसला सुट्टी , चाट मारा . स्वतःसाठी , काही काम आहे  म्हणून नाही . असच आणि अजून कितीतरी,  तुमचेच तुम्हाला सुचतील उपाय .

 चला करून तर पाहू आपण सगळे हा प्रयत्न .  अगदी वाटलं तर समोर खेळणाऱ्या छोट्या मुलांमध्ये जाऊन लगोरी फोडून येऊ . मग बघा या कंटाळ्याला आपण शोधूनही सापडणार नाही . आपण त्याला आणि तो आपल्याला शोधण्यात यशस्वी न होवो हीच मनीषा .




#contrast