Followers

Saturday, 19 September 2020

कॅलिडोस्कोप

 कॅलिडोस्कोप


कॅलिडोस्कोप म्हंटला की लहानपण आठवतं  , छोटे छोटे ,  रंगीत  रंगीत काचांचे तुकडे असलेली एक बासरीसारखी लांब नळी  .  या बासरीमध्ये जेव्हा आपण एका बाजूने बघतो तेव्हा आत दुसऱ्या बाजूला खूप सुंदर आकार दिसतात  आणि ती  हळूहळू फिरवली की आकर्षक सुंदर सुंदर बदलत्या रंगीत आकृत्या दिसत जातात .  सुरुवातीला भावतात त्यातले रंग , आकर्षक रंगसंगती ,  त्यातलं सौन्दर्य , प्रमाणबद्धता  symmetry .  कुणी हातही न लावता हे असे कसे आपोआप सुंदर आकार , रांगोळ्या तयार होतात ? याचं अप्रुपही वाटतं आणि कुतुहलही निर्माण होतं , त्यात आरसे असतात हे जरा नंतरच कळतं .  मग ते स्वतःला तयार करून पहायची इच्छा होते . आरसे हे विशिष्ट कोनात ठेवायचे असतात हेही कुणी सांगितल्याने किंवा वाचल्याने  कळतं . काचेचे रंगीत तुकडे शोधणं , किंवा घरी असलेल्या रंगीत बांगडया , " आता तू या वापरत नाही न अस विचारून " किंवा कधी कधी स्वतःच ठरवून त्यांना या प्रयोगाचा भाग केलं जातं . या सगळ्या प्रक्रियेत खूप मजा येते . आरसा म्हणून वापरण्यासाठी शोधून आणलेले काचांचे तुकडे जरा जपुनच वापरावे लागतात नाहीतर त्यामुळे जर दुखापत झाली तर प्रयोग बंद करण्याची वेळ येते आणि मेहनतीने जमवलेल्या या संपत्तीचा त्यागही करावा लागतो . यावरही उपाय असतोच म्हणा , आहे तो कॅलिडोस्कोप उघडून परत तसाच करून पाहण्याचे उपद्व्याप . ही मात्र एक  फार मोठी जोखीम असते . " हातचं सोडून पळत्याच्या मागे " अशी गत होण्याचीही भीती असते , असो . 


कॅलिडोस्कोप या शब्दासाठी मराठी पुष्कळ समानार्थी शब्द वापरले जाऊ शकतात जस , शोभादर्शक , चीत्ररूपदर्शक , बहुरूपदर्शक , बहुमूर्तीदर्शक . या शब्दांमध्येही अर्थ फार छान प्रतीत होतो . ते खेळणं म्हणजे नक्की  काय हे लगेच कळतं . कालौघात कुठेतरी हे शब्द हरवले म्हणा किंवा विस्मृतित गेले म्हणा , आपण सर्व याला कॅलिडोस्कोप म्हणूनच जास्त पटकन ओळखतो , म्हणूनच की काय या शब्दाचा उपयोग इंग्रजीत जास्त दिसतो . 


कॅलिडोस्कोप शब्द अलंकार , उपमा म्हणून जेव्हा कधी ,  कुठे वापरल्या जातो त्या त्या वेळी तो विभिन्न प्रकारच्या अनेक गोष्टींचा बांधेसूद समूह आणि त्यांचं निरंतर बदलणार स्वरूप याचं प्रतीक असा प्रतीत होतो .  त्या गोष्टी कुठल्याही असू शकतात . बरोबर  ?


कधी विचार करतांना किंवा जुने फोटो पाहतांना अथवा कुणाबरोबर बोलतांना जुन्या आठवणींचे प्रसंग अगदी झरझर एकामागून एक डोळ्यासमोर एखाद्या चित्रपटासारखे  दिसतात , ते पाहतांना ,त्यावर बोलतांना होणारी  भावनांची  चेहऱ्यावर उमटलेली , मनाला जाणवणारी सरमिसळ आपण सर्वांनी कितीतरी वेळा अनुभवली आहे , हो ना ? अशावेळी  ' kaleidoscope of   emotions ' हा शब्द फार समर्पक वाटतो  . 


जगात कुठेही तुम्ही रहात असाल तरी आजूबाजूला समाजात दिसणारी वैविध्यपूर्ण राहणी , भाषा , कुठलाही सण साजरा करण्याच्या निरनिराळ्या पद्धती पाहतांना  ' kaleidoscope of cultures , language असे शब्द आपण नेहमीच ऐकतो किंवा बोलतोही . 


अशी अजून कित्ती उदाहरण देता येतील ,  kaleidoscope of  colours , kaleidoscopic origami , wonderful kaleidoscope of orchestral sound , kaleidoscope of  pattern , kaleidoscopic effect  हे आणि असे कितीतरी. 


तस पाहिलं तर कॅलिडोस्कोप म्हणजे प्रकाश , रंगीत काचांचे तुकडे ,  ठराविक कोनात ठेवलेले आरसे आणि त्यावरून परावर्तित होणारा प्रकाश यांचा खेळ . त्यामुळे तयार होणार आणि थोडं हलवल्यावर बदलत जाणारं रंगीत काचेच्या तुकड्यांच प्रतिबिंब . बरोबर ?  प्रतिबिंब हे प्रत्येक  गोष्टीच पडत . म्हणजे पहा हं , पाण्यात आपलं प्रतिबिंब पडतं , आजूबाजूच्या झाडांचं पडतं , आकाशच पडतं ,वरून उडणाऱ्या पक्षांचं पडतं तसच आपण असंही म्हणतो की  त्या त्या भाषांमध्ये , त्या त्या काळामध्ये लिहिल्या गेलेल्या  पुस्तकात   ' त्यावेळच्या समाजाच प्रतिबिंब ' जाणवतं   फक्त त्यासाठी प्रकाश , आरसा , कोन हे निराळे असतात .  


जसं समाजाचं प्रतिबिंब पुस्तक , लोकगीतं , सिनेमा , गाणी अजून इतर गोष्टींमध्ये दिसतं तसच प्रत्येक व्यक्तीच प्रतिबिंब हे त्या व्यक्तीला ओळखणाऱ्या व्यक्तीच्या मनातही पडतं . बरोबर ना ?  व्यक्ती एकच ,  ती कधी बाबा/ आई असते तर कधी ती व्यक्ती कुणाचा तरी मुलगा/मुलगीही असते . कुणाची  मित्र / मैत्रीण असते तर कधी कुणाची गुरुही असते .  प्रत्येक व्यक्ती समाजात निरनिराळ्या व्यक्तींबरोबर निरनिराळ्या स्वरूपात संपर्कात येत असते .  मुलगा/ मुलगी म्हणून ती आईबाबांना वेगळी दिसते तर मित्रांसाठी ती अजून निराळी असते . ऑफिस मध्ये सहकाऱ्यांना निराळी दिसते तर त्याच्या employer ला ती वेगळीच भासते . मुलांना निराळी दिसते तर नवरा/ बायको ला निराळी . व्यक्ती असते तर तीच मात्र तिचं प्रत्येकाच्या मनातलं प्रतिबिंब मात्र निराळं असतं . त्या प्रतिबिंबात काही रंग , आकार सारखे असतातही मात्र काही  त्या त्या व्यक्तींनाच दिसतात . 



 कॅलिडोस्कोप मध्ये आरशावर ठराविक  कोनातून  परावर्तित झालेल्या प्रकाशाने पडलेली प्रतिबिंब जशी थोडं थोडं फिरवत गेल्यावर  बदलत जातात तसच एकाच व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीच्या मनात असणार प्रतिबिंब हे त्या दुसऱ्या व्यक्तीच्या (दृष्टी) कोनाप्रमाणे , त्यांच्या नातेसंबंधांचा प्रकाश परावर्तित होऊन बदलत जात . प्रत्येक व्यक्ती  एक कॅलिडोस्कोपच  , हो ना ?









#कॅलिडोस्कोप  , #प्रतिबिंब  , #Kaleidoscope  , #Reflection  , #MirrorImage

Sunday, 6 September 2020

शिक्षण

 शिक्षण

भारतात आपण सगळे डॉ . राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर हा  शिक्षकदिवस म्हणून साजरा करतो . जगात वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या दिवशी शिक्षकदिवस  साजरा केल्या जातो . काही देश '  युनेस्को ने घोषित केलेल्या 'World Teachers Day' म्हणजेच  5 ऑक्टोबर ला साजरा करतात .

 ज्यांनी आपल्याला शाळेत , कॉलेज मध्ये शिकवलं आहे किंवा जे आपल्या ओळखीचे लोक शाळेत कॉलेज किंवा अजून कुठे शिक्षक म्हणून शिकवतात त्यांच आपण त्यादिवशी अभिनंदन करतो . त्यांना शिक्षकदिनाच्या शुभेच्छा देतो , काय बरोबर ना ?

शिक्षक कोण ? तर शिक्षण देणारा शिक्षक . ही झाली साधी सोपी सरळ व्याख्या .   कित्ती वेळा जाणवतं आपल्याला , अरे हे शिकायला हवं  , ते राहीलच शिकायचं . जगात इतकी ज्ञानसंपदा आहे  की एखाद्याने आयुष्यभर  ज्ञान संपादन करत राहायचं ठरवलं तरी आयुष्य कमी पडेल  .


शिकणे ही एक मानसशास्त्रीय क्रिया आहे तर शिक्षण या संकल्पनेची व्याप्ती खुप मोठी आहे .  शिक्षण हे शाळेबरोबर संपत नाही , तर ते  शाळेबाहेरही  जन्मभर सुरूच असत .


 संपूर्ण  आयुष्यात  मनुष्य खूप निरनिराळ्या प्रकारच शिक्षण घेतो . बरोबर ना ? तस जर पाहिलं तर शिक्षण हे जन्म झाल्यापासूनच सुरू होत . सुरुवात होते ती मोकळ्या हवेत श्वास घेण्यापासून . मग हळूहळू भूक लागल्यावर रडल की कोणीतरी जेवायला देत , जवळ घेत हे कळत . हे शिकण्यासाठी कुठल्या शाळेत जावं लागतं नाही . हळूहळू ते बाळ शिकत जातं . इतकचं कशाला छोटं कुत्र्याचं , मांजरीच पिल्लू सुदधा घरी आणलं  की ते ही छोट्या छोट्या गोष्टी शिकतं  . कोण जेवायला देतं , कधी देत , कोण लाडवत , कोण खेळत , कोण फिरायला नेत . हो ना ?  अर्थात त्या मुलांना किंवा छोट्या पाळीव प्राण्यांना काही सवयी लावण्यासाठी शिकवावं लागतं . ते ही एक प्रकारचं  शिक्षणच आहे . हे शिक्षण घरात आई , बाबा , आजी , आजोबा इतकंच काय कधी कधी मोठा भाऊ बहीण सुदधा देतात .


मुलं थोडी मोठी झाली की शाळेत त्यांना शिक्षक तर शिकवतातच पण बऱ्याच गोष्टी ते मित्रांकडून ही शिकतात . हो ना ? . कधी त्या चांगल्या सवयी असतात तर कधी वाईटही .  भाषा असो , गणित असो की विज्ञानाचा किचकट न समजलेला पाठ ......हे सुदधा शाळेत एकमेकांना शिकवल्या जातं . हेही शिक्षणच आहे आणि ते शिकवणारा शिक्षक हा कधी  मित्र असतो तर कधी आईबाबा , दादा , ताई तर कधी घरचें किंवा शेजारी राहणारे काका काकू तर कधी आजोबा आजी देखील  असतात  , बरोबर ना ?


 शाळा कॉलेज संपल्यावर नौकरी करतांना  काही बाबी शिकत जातो आपण आपल्या सहकाऱ्यांकडून ,  कधी boss कडून तर कधी अगदी एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून सुद्धा . ज्या गोष्टी पटतात , मनाला भावतात , आवडतात त्या आपसूक शिकल्या जातात मात्र काही गोष्टी आपल्याला आपलं काम सुकर करायला शिकाव्या लागतात तर कधी त्या आपल्याला नौकरीत ,  व्यवसायात आवश्यक असणाऱ्या असतात .  त्या प्रयत्न करून शिकाव्या लागतात  , बरोबर ना ?

विचार करता करता कित्ती लोक आठवतील आपल्या सर्वांना ज्यांच्याकडून आपण काहीतरी शिकलो आहे  , मग ती लहानपणी शिकलेली कागदाची नाव असो की  ऑफिस मध्ये computer वर लिहितांना उपयोगी असणारी एखादी trick .

आपण फक्त लोकांकडूनच शिकतो का ? प्राण्यांकडून सुद्धा खूप काही  शिकण्यासारखं असत . त्यांच्या कडून  सगळयात महत्वाचं शिकण्यासारखं असत ते म्हणजे गरजेपुरते खाणं . कुठलाही प्राणी हा भूक नसतांना खात नाहीं . काय , बरोबर ना ?

वृक्ष असोत किंवा छोटी झाडं , त्यांच्या आयुष्यभर ती फक्त दानच करत असतात . कुणी सावली देतील तर कुणी दुसऱ्या प्राणांना अन्न तर कुणी सुगंधी फुल तर कुणी काही . जे  आहे ते आनंदाने भरभरून देऊ करणं हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे .

पाणी मार्गात कितीही अडथळे आले तरी मार्ग काढून पुढे जात राहतं , हे पाण्याकडून शिकण्यासारखं आहे . इतका विशाल समुद्र , त्याची सर्वकाही सामावून घेण्याची वृत्ती  शिकण्यासारखी आहे  . डोंगरांची ऊन,  पाऊस , थंडी  अश्या आलेल्या सर्व परिस्थितीत  निश्चल उभं राहण्याची वृत्ती  शिकण्यासारखी आहे .  निसर्ग आणि निसर्गातल्या  छोट्या मोठ्या प्रत्येकाकडे मग ती जैविक असो अथवा अजैविक ,  काही न काही शिकण्यासारखं नक्की आहे जे त्याच्याकडून आपण शिकायला हवं . हो ना ?


आयुष्याच्या प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण .  शिक्षित  व्यक्तीला सुसंस्कारांची जोड देऊन सुशिक्षित बनवते  ते  शिक्षण .  शरीराला श्रमाकडे , बुद्धीला सत्याकडे आणि  भावनेला माणुसकीकडे वळविणे म्हणजे शिक्षण . शिक्षण हा एक आयुष्यभर सुरू असणारा प्रवास आहे .  काय वाटतं तुम्हाला ?




#शिक्षकदिवस , #WorldTeachersDay ,  #शिक्षकदिन ,