Followers

Sunday, 10 October 2021

ग्रह


 ग्रह 




ग्रह म्हंटल की आपसूकच तारेही आठवतात . ' ग्रहतारे ' असंच म्हंटल्या जातं . जुळ्याचं दुखणं म्हणतात तसं , हो ना . आता तुम्हाला वाटेल आज काय ग्रहतारे , भविष्य यावर ब्लॉग आहे की काय ? घाबरू नका , तस काहीही करायचा माझा मानस नाही . त्यामुळे ब्लॉगच नाव वाचून तुमचा असा  ग्रह झाला असेल तर तो ताबडतोब बदला . 


आता हा ब्लॉग लिहिण्याचा विचार माझ्या मनात येण्याचं कारण काय म्हणाल तर त्याच झालं असं ,  की माझ्या शाळेच्या whatsapp group वर एकाने ' दुर्बिणीतून दिसणारे आकाशदर्शन  , ग्रह तारे , या विषयावर त्याचे अनुभव सांगितले . त्याला धन्यवाद देताना दुसऱ्या एकाने  ग्रह या शब्दांचा खेळ सुंदर रित्या मांडला आणि मग बाकीचेही या खेळात सामील झाले .  ते मजेदार संभाषण अस झालं .......



Thanks for sharing information on "Aakash" and "Graha" considering our "AaGrah".


With your lucid explainations you  gave us a feeling as if we are on "ParaGraha".


We have made a "NiGraha" that we will learn this from you.


लगेच दुसऱ्याने त्यावर लिहिलं .....


When will we get your "AnuGraha" ?


त्यावर पुढचा म्हणतो ......


अशा meetings चा करु या मनात संग्रह!!!


त्यावर पुढची post आली .....


अशा meetings आणि आपला नको बाबा संधिविग्रह....


तेव्हा फार मजा वाटली आणि या विषयावर लिहावंसं वाटलं .


विज्ञानाच्या भाषेत अवकाशात तार्‍यांभोवती फिरणारा अस्वयंप्रकाशित गोळा म्हणजे ग्रह हो ना ? मात्र हा शब्द व्यवहारात इतक्याच अर्थाने आपण सर्व वापरत नाही .  


साहित्यिक भाषेत ' ग्रह ' या शब्दाचे दोन अर्थ होतात , एक अवकाशातला आणि दुसरा   समज  , धारणा , समजूत , कल्पना , भावना , मत इत्यादी .  वाक्यात ग्रहाचा अर्थ हा सकारत्मक घेतला तर समज होईल आणि नकारात्मक घेतला तर गैरसमज सुद्धा होऊ शकतो . आपण त्या शब्दाबद्दल काय ग्रह करून घेतला आहे त्यावर ते अवलंबून आहे , बरोबर ना ? जस कधी एखाद्याच्या आयुष्यात जेव्हा फार अडचणी येत असतात तेव्हा म्हणतात  ग्रह फिरले  , दुसरं काय ? तसेच जेव्हा काही वेळा एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात सफलता मिळत असते तेव्हाही हेच म्हणतात , ग्रह फिरले , अजून काय ?  हो ना ? असो . 


ग्रह या शब्दाला जोडून अनेक शब्द निर्माण झाले आणि त्याबरोबरच निर्माण झाले  त्यांचे अनेक अर्थ . 


वरील संभाषणात असणारे आग्रह , निग्रह , संग्रह , परग्रह , अनुग्रह , संधीविग्रह तर आहेतच , अजूनही  अनेक आहेत . काही त्यातील आपल्या सर्वांना माहिती आहेत . काहींचा आपण व्यवहारात उपयोग करतो तर काही थोडेफार विस्मृतीत गेले म्हंटल तरी वावगं ठरणार नाही . 



या शब्दांचे अर्थ आणि उपयोग बघतांना मजा येते  . जसं आग्रह हा दुसऱ्याला करतात तर निग्रह हा स्वतः स्वतःसाठी करायचा असतो . एका अक्षराने अर्थात कित्ती फरक पडतो .  संग्रह हा अनेक गोष्टींचा करता येतो .  संग्रह हा आपल्याला आपल्या सवडी , आवडी प्रमाणे करता येतो तेच अनुग्रह मात्र कुणाचा तरी घ्यावा लागतो . अनुग्रह मिळणं  हे त्या अनुग्रह देणाऱ्याच्या इच्छेवर अवलंबून असत . बरोबर ना ? 



परग्रह म्हणजे दुसरा ग्रह  मात्र कधी कधी कुणी व्यक्ती जरा वेगळी वागत असेल किंवा पेहराव जरा 'हटके ' असेल तर म्हणतात ना , हा परग्रहावरून आलेला दिसतोय . 


उपग्रह हा परग्रहा सारखाच दुसरा एक शब्द . ग्रहांभोवती फिरणारा ,  तो उपग्रह .   एक व्यक्ती जेव्हा कुण्या दुसऱ्या व्यक्ती च्या मागे मागे सारखी फिरत असेल  , जसं मुलं  छोटी असतांना  आईच्या मागे  मागे , तिच्या आजूबाजूला फिरत असतात  अथवा लहान भाऊ किंवा बहीण मोठ्या दादा/ताईच्या  मागे मागे फिरतात  तेव्हाही हा शब्द वापरला जातो . हा झाला शब्दाचा सकारत्मक प्रयोग मात्र हेच एखाद्या ऑफिस मधील किंवा कुठल्या राजकीय गटातील चित्र असेल तर या शब्दाचा होणारा प्रयोग हा नकारात्मक अथवा उपहासात्मक असतो , असो .


अजून एक नेहमी ऐकिवात येणारा शब्द ग्रहण . ग्रहण म्हणजे पडलेली सावली , त्यामुळे झालेला अंधःकार मग ते सूर्य चंद्राचं असो वा आयुष्यात आलेलं सावट . त्यालाही आपण ग्रहणच म्हणतो , बरोबर ना ?  पण ग्रहण चा अजून एक अर्थ आहे , घेणे , स्वीकार करणे , धारण करणे जसं पाणीग्रहण , अर्थग्रहण . अगदी अन्नग्रहण सुद्धा . पाणी ग्रहणाचेही दोन अर्थ होतात , एक म्हणजे पाणी घेणे अथवा पिणे आणि दुसरा अर्थ लग्न करणे . 


ग्रहणीय हा अजून एक ग्रहण सारखाच  शब्द  . याचाही अर्थ  घेणें ,  स्वीकारणें , ताबा घेणें ,  पकडणें असाच होतो . ग्रहण करण्यायोग्य ते ग्रहणीय . 



प्रतिग्रह हाही शब्द स्वीकार करणे , ग्रहण करणे या अर्थी वापरल्या जातो . कुणी दिलेली वस्तू घेणे या साठीही हा शब्दप्रयोग केल्या जातो .


कुग्रह .....जो ग्रह पत्रिकेत त्या व्यक्तीसाठी चांगला नाही तो . 


अवग्रह ....S S S स्वर लांबवण्यासाठी वापरतात तो . 


ग्रहस्वर— कुठल्याही गीताच्या प्रारंभाचा  जो स्वर असतो त्याला ग्रहस्वर म्हणतात . 



उरोग्रह हा अजून एक नवीन शब्द कळला . उर शब्द आपल्या सर्वांना माहिती आहे . फुप्फुस आणि हृदय हे अवयव उरात असतात.  त्या उराशीं संबंधित असलेल्या विकृतिला उरोग्रह म्हणतात म्हणजे आजकालच्या आपल्या सोप्या भाषेत heart किंवा lungs चे आजार . 

 


गलग्रह हा अजून एक शब्द . आयुष्यात ओढवलेले संकट जे टळण कठीण आहे . कुणी गळा धरणं किंवा दाबण या अर्थीही हा शब्दप्रयोग होतो . घश्यात कफ   होऊन श्वास गुदमरणे या अर्थीही हा शब्द उपयोगात येतो . गलग्रह चा गम्मत वाटणारा अजून एक अर्थ म्हणजे मासोळीचा काटा . 


दहावा ग्रह असा अजून एक मजेदार शब्दप्रयोग होतो .  हा शब्द पूर्वी जावयाला उद्देशून म्हंटल्या जात असे .  



विग्रह


विग्रह म्हणजे युद्ध ,  लढाई , 

 भांडण. याचा दुसराही एक अर्थ एकनाथी भागवतात आहे तो म्हणजे  परमात्म्याचा अंश ,  स्थूलदेह ,  शरीर .  त्यात लिहिलंय 


'ब्रह्मांड तो विराटदेहो । त्याचा मुख्य भाग विग्रहो ! 


विग्रह शब्दाचा ' हा ' अर्थ कळला तेव्हा खरच या शब्दाबद्दल असणारा माझा ग्रह बदलला . 



परिग्रह चा अर्थ होतो  परिवार ,  लवाजमा ,  आश्रित लोक ,  खटला , कुटुंब  . त्याचप्रमाणे परिग्रह  याचा अजून एक अर्थ होतो  कोणत्याहि वस्तूचा ताबा किंवा कबजा घेणें. जस जमीन, पाणी यांचा परिग्रह . तसेच याचे अनेक अर्थ होतात जसे  घेणें ,  स्वीकारणें ,  गोळा करणें; जमविणें .  पसारा .  या वेगळ्या अर्थांची उदाहरणे एकनाथी भागवत आणि ज्ञानेश्वरीत आहेत  



जो निर्द्वंद्व निरभिमान पहा हो । त्यास समूळ मिथ्या निजदेहो । तेथ देहसंबंधें परिग्रहो । उरावया ठावो मग कैंचा । 


सडे जे देखिले । ते ध्यानकासे लाविले । परिग्रही घातले । तरिया वरी ।' 


आणि


समर्थु आपला खोडा । शिसें वाहवी जैसा होडा । तैसा भुंजौनि जो गाढा । परिग्रहो ।' 


संदर्भाप्रमाणे अर्थ बदलत जातो . शब्द एकच मात्र श्लोकांप्रमाणे अर्थ वेगवेगळा होतो . 


परिग्रह शब्दाला ' अ ' लावला की शब्द होतो अपरिग्रह .  अपरिग्रह म्हणजे लोभ सोडणे. याचा अर्थ आपल्या मालकीच्या पण गरजेपेक्षा अधिक असलेल्या कोणत्याही गोष्टीचा शारीरिकरित्या , मानसिकरित्या व भावनिकरित्या त्याग करणे. यामुळे व्यक्तीला साधे आयुष्य जगण्यात मदत होते . 


प्रग्रह असाही एक शब्द आहे . याचा अर्थ लगाम असा होतो .


आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु ।

बुद्धिं तु सारथिं विद्धि मनः प्रग्रहमेव च ।।


हा श्लोक उपनिषदात आहे . आत्म्याला रथी म्हंटल आहे .  शरीराला रथ , बुद्धीला सारथी आणि मनाला  लगाम म्हंटल आहे .

मन हे सारथी असलेल्या बुद्धीच्या दिशेनं खेचलं गेलं किंवा मनानं बुद्धीचं ऐकायचं ठरवलं – ते बुद्धीच्या नियंत्रणाखाली आलं तर जीवनाचा रथ योग्य मार्गावरून दौडत राहील. उलट मनानं इंद्रियांचं ऐकलं तर हा रथ चुकीच्या मार्गाने जाऊ शकतो . 


अबब  , कित्ती हे शब्द न त्याचे विविध अर्थ .  काही साधे , मजेदार  तर काही गहन अर्थाचे . काही शब्द मनात हसू निर्माण करतात , काही राग तर काही भीती . काही  अंतराळातील सफर घडवतात ,  ज्ञान देतात , तर  काही आयुष्य कसे जगावे याची शिकवण देतात .  या शब्दांचे व्यक्तिप्रमाणे ,  संदर्भानुसार तसेच आपापल्या झालेल्या अथवा केलेल्या  ग्रहाप्रमाणे अर्थ  बदलत जातात . 


ज्ञानाने शब्द समजतात तर अनुभवाने शब्दांचे अर्थ . तुम्हाला काय वाटत ? 









 











 













Saturday, 22 May 2021

महाराणी येसूबाई

 महाराणी येसूबाई




संभाजी महाराज लिहिल्यावर प्रकर्षाने वाटलं राणी येसूबाईंबद्दल लिहावं . महाराणी येसूबाई यांची ओळख संभाजी राजांच्या पत्नी इतकीच बहुतांशी लोकांना माहिती आहे . त्यांच्याबद्दल इतिहासात फारश्या नोंदी आढळत नाहीत  . 


येसूबाईंच्या आयुष्याचा आढावा घेतांना त्यांचं आयुष्य roller coaster सारखं होतं हे जाणवतं . वयाच्या लहानपणी अगदी 6,7 वर्षांच्या असतांना त्यांचा शंभुराजांबरोबर  विवाह झाला .  जिजाऊंच्या मायेच्या सावलीत  त्यांची मानसिक , राजकीय जडण घडण झाली . 



 निरनिराळे लहान मोठे प्रसंग , वादळं त्यांच्या आयुष्यात येतच राहिले . त्यातून त्या शिकत गेल्या आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व फुलत गेलं . खरंच , काय आणि किती कंगोरे लिहावे या व्यक्तिमत्वाचे . 


संभाजीराजे आग्र्याहून सुखरूप गडावर परत येण्यासाठी त्यांच्या मृत्यूची सगळीकडे पसरवलेली बातमी खरी वाटावी म्हणून शिवाजीराजांनी त्यावेळी केलेलं हे  नाटक असलं तरी त्यात होरपळल्या येसूबाई . कोवळ्या वयात त्यांना तसं जीवन  अल्पकाळासाठी का होईना ,  जगावं लागलं . 



त्यांच्यातल्या कुशल ,कर्तृत्ववान स्त्रीला शिवाजी राजांनी ओळखल्या मुळेच   जिजाऊंनंतर शिक्के कट्यारीचा मान त्यांनी येसूबाईंना दिला .  मिळालेल्या शिक्के कट्यारीच्या आनंदावर  , शिवाजीराजांच्या विश्वासाला पात्र ठरल्याच्या अभिमानावर ,   कर्तृत्वावर मात्र सोयरबाईंच्या सवतेपणाच , असूयेच सावट नेहमीच राहिलं . याची जाणीव त्यांना होती तरी कधीही त्याबद्दल  तक्रार न करता त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं . 


कितीतरी वेळा त्यांना असंख्य  लोकांच्या टोचणाऱ्या नजरांचा सामना शांतपणे करावा लागला .  संभाजीराजे दिलेरखानाच्या गोटात जाणं असो अथवा सोयराबाईंनी राजरामांना झुकतं माप  मिळावं म्हणून  केलेल्या असंख्य छोट्यामोठ्या क्लुप्त्या . घरचे शाल जोडीतले अहेर आणि राजकीय डावपेच सर्वांचा सामना त्यांनी शांतपणे ,  धिटाईने तसेच चातुर्याने केला .  



संभाजीराजे  छत्रपती झाले . 9 वर्षांच्या कारकिर्दीतला त्यांचा  बहुतांशी  वेळ युद्धात , राजकीय डावपेच खेळण्यात आणि स्वराज्य मजबूत करण्यात गेला  . औरंगजेबाने शिवाजीमहाराज गेल्यानंतर स्वराज्य गिळण्यासाठी परत मुसंडी मारली होती . ती नेस्तनाबूत करण्यासाठी संभाजीराजे प्राणपणाने लढत होते . त्यात खूप मोठी साथ होती ती येसूबाईंची . ते गडावर नसतांना न्यायव्यवस्थेपासून ते महसूल गोळा करण्यापर्यंत , या सर्व बाजू येसूबाईंनी समर्थपणे सांभाळल्या . त्यांच्या कर्तुत्वाचा , गुणांचा सार्थ गौरव संभाजीराजांनी येसूबाईना    ' श्री सखी राज्ञी  जयति ' ही राजमुद्रा देऊन केला . 



औरंगजेबाच्या लोकांनी दगा करून संभाजीराजांना  पकडल्या  नंतरच्या दिवसात येसूबाईंची कसोटी लागली . इतक्या सगळ्या वाईट बातम्या गडावर येत असतांना धैर्याने परिस्थितीला सामोरं जाणं तसच संभाजीराजांना सोडवण्यासाठी जमतील ते प्रयत्न करण्याचे निर्णय घेण या सगळ्या दिव्यातून जातांना त्यांना मनाने किती कणखर राहावं लागलं असेल याची कल्पना न केलेलीच बरी . 


त्यावेळी येसूबाईंनी घेतलेले  महत्वाचे 2 निर्णय यांनी तर  इतिहासाला अस एक वळण दिलं जे कदाचित त्यांनी ते निर्णय घेतले नसते तर मिळालं  नसतं . 



 संभाजीराजांना आता सोडवून आणणं कठीण आहे हे लक्षात येताच त्यांनी राजरामांना छत्रपती म्हणून घोषित केलं . अगदी 3 , 4 वर्षे वयाच्या मुलांना गादीवर बसवून राज्यकारभार केल्याची कितीतरी उदाहरणे इतिहासात आहेत . असा निर्णय त्याही घेऊ शकल्या असत्या . त्यांच्या मुलाला गादीवर बसवून राज्यकारभार त्या करू शकल्या असत्या .  पुत्रप्रेमापोटी अथवा सत्ता आपल्या हातात कशी राहील हा विचार न करता राज्य रक्षणासाठी केलेला तो एक फार महत्वाचा निर्णय होता  .  हा निर्णय औरंगजेबाला ,  लढाई न करता संभाजीराजांना कैद करूनही हरल्याची भावना जाणवून देणारा होता .  याचा पडसाद असाही उमटला की  नविन छत्रपती घोषित केल्यामुळे जो औरंगजेबाच्या कैदेत आहे तो आता राजा नाही .   स्वराज्याचा राजा आजही राज्यात लोकांबरोबर आहे .  हा लोकांना दिलेला विश्वास तर होताच तसच स्वराज्याची मोगलांबरोबर लढाई संपलेली नाही , ती सुरूच राहणार , असा तो औरंगजेबाला इशारा आणि दिलेला  'शह '  होता.


आता चवताळून औरंगजेब रायगडावर जोरदार हल्ला करेल ही जाणीव असल्याने येसूबाईंनी  दुसरा निर्णय घेतला आणि अजून एक  ' शह  ' औरंगजेबाला दिला . येसूबाईंनी  राजासहित राजधानीच रायगडावरून हलवली . स्वराज्याच्या पार टोकाला              ' जिंजीला ' राजधानी हलवून स्वराज्याच्या राजांबरोबरच  राजधानीही मोगलांपासून सुरक्षित ठेवण्यात त्या यशस्वी झाल्या . 


येसूबाईंनी बांधलेल्या अटकळीनुसार मोगलांनी रायगडाला धडक मारली . तब्बल 6 महिने मोजक्या लोकांसह त्यांनी गड झुंजवला . नंतर मात्र गडावर पांढरे निशाण लावून स्वतःच्या 7 , 8 वर्षाच्या मुलाला ' शिवाजींना घेऊन त्यांनी मोगलांच्या छावणीत प्रवेश केला . मोगलांनी गड काबीज केला तेव्हा त्यांना त्यात मिळाल्या त्या येसूबाई आणि शिवाजी . छत्रपती तर दुसऱ्या गडावरून , राजधानी जिंजीतून राज्यकारभार करत होते . 


येसूबाई या संभाजीराजांच्या पत्नी आणि शिवाजीराजांच्या स्नुषा होत्या . ज्यांनी नेहमीच पहिला विचार स्वराज्याचा  , हा आदर्श येसूबाईंसमोर ठेवला होता .  येसूबाईंनी घेतलेल्या या 2 महत्वाच्या निर्णयांनी इतिहासाला कलाटणी मिळाली आणि शिवाजी महाराजांच्या हिंदवी  स्वराज्याला पुढची वर्ष . 


येसूबाईंसाठी यानंतरची  वर्ष फार कठीण होती  . मोगलांच्या छावणीत  एका महाराणी आणि युवराजाला राहणं किती कठीण गेलं असेल ?   मुलाचं शिवाजी असलेलं नावं  औरंगजेबाने शिवाजीराजांवरच्या रागामुळे        ' शाहू '  केलं . मात्र संभाजीराजांच्या वेळी  केलेली चूक परत करण्याची हिंमत त्याने   केली नाही .  येसूबाई आणि शाहू महाराज यांची मोगलांच्या छावणीबरोबर फार फरपट झाली मात्र त्यांना हातही लावण्याची हिम्मत मोगलांनी केली नाही  . शाहू महाराजांना औरंगजेबाने सर्व प्रकारचे शिक्षण  दिले मात्र  संस्कार होते येसूबाईंचे . खूपवेळा शाहू महाराजांनी आणि येसूबाईंनी इस्लाम धर्म स्वीकारावा म्हणून प्रयत्नही झाले पण ते फार जिकरीचे करण्याची चूक मोगलांनी केली नाही . 


औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर वाटाघाटी होऊन  शाहू महाराजांना मोगलांनी स्वराज्यात परत पाठवले त्यासाठी ओलीस राहिल्या ,           ' येसूबाई ' . मुलगा स्वराज्यात जाऊ शकला या आनंदाच्या विचारावर पुढची वर्ष त्यांनी मोगलांच्या कैदेत काढली . 

पुढे अजून वाटाघाटी होऊन 10 वर्षांनी त्या स्वराज्यात परतल्या . येसूबाई तब्बल 29 वर्ष मोगलांच्या कैदेत होत्या . परत आल्यावर त्या राजकारणात जास्त सक्रिय नसल्या तरी  शाहू महाराज आणि ताराबाईंनी दत्तक घेतलेले राजे यामध्ये त्यांनी  स्वराज्याच्या कल्याणासाठी समेट घडवून आणला . थोडं सुख , शांती त्यांच्या आयुष्यात आली पण फारच थोड्या अवधीसाठी . जेमतेम एक वर्ष . 





येसूबाई या शिवाजीराजांना शोभणाऱ्या सून , संभाजीराजांच्या पावलावर पाऊल ठेऊन चालणाऱ्या पत्नी होत्या . लहानपणापासून निरनिराळ्या कठीण तसच दुःखद  प्रसंगांना सामोरं जाण्यामुळेच की काय त्या मनाने कणखर होत गेल्या असाव्यात . त्यांनी  पूर्ण आयुष्य   स्वराज्यासाठी समर्पित केलं  . संभाजीराजांसारख्या   कर्तृत्ववान , वादळासारख्या झंझावाती व्यक्तीबरोबर संसार करणारी व्यक्तीही तेवढीच कर्तृत्ववान होती .  स्वराज्यासाठी  कर्तव्यनिष्ठा , समर्पण आणि त्यागाच्या परकाष्ठेची सीमा ओलांडणार हे  व्यक्तिमत्त्व .  ज्या व्यक्तीच्या गुणांना शिवाजी महाराजांनी ओळखलं , त्या व्यक्तीची , त्या गुणांची ,  त्या कर्तुत्वाची  इतिहासकारांनी मात्र  पुरेशी   दखल घेतल्याचं  इतिहास वाचतांना फारस जाणवतं नाही म्हणून केलेला हा अल्पसा लेखनप्रपंच . 

Sunday, 2 May 2021

संभाजीराजे

 संभाजीराजे



व्यक्ती आणि कृती या संदर्भातील हे दुसरं व्यक्तिमत्त्व ,  ज्याबद्दल लिहिण्याचा एक छोटासा प्रयत्न .

संभाजी राजे हा शब्द ऐकला की खरंच काय येतं मनात ? आदराची भावना , बरोबर ना ? त्या उत्तुंग व्यक्तीमत्वाला नतमस्तक होतो आपण . त्यांचा जीवनपट डोळयांसमोरून झरकन जातो . त्यांचं आईशिवाय असणार बालपण , जिजाऊंनी त्यांच्यावर केलेली मायेची पाखरण , त्यांना निरनिराळ्या प्रसंगातून मिळालेले राजकारणाचे धडे . शिवाजी महाराजांनी लहानपणापासून त्यांना दिलेले शिक्षण ,  शारीरिक कवायती पासून ते घुड्सवारी पर्यंत . तसेच भाषा , अर्थव्यवहार  राजकारणी डावपेच आणि इतरही   . एक एक प्रसंग डोळ्यांसमोर जेव्हाही येतो , नेहमी असच वाटतं , इतक्या लहान वयात कस केलं असेल त्यांनी ? या वयात तर साधं भाजी आणायलाही आपण मुलांना पाठवत नाही त्या वयात संभाजी राजांना शिवाजी महाराजांनी मिर्झा राजे जयसिंगांकडे ओलीस म्हणून पाठवले ? धन्य ते वडील आणि धन्य तो पुत्र . 


  














संभाजीराजांचा पूर्ण जीवनपट हा आत्ताच्या भाषेत बोलायचं तर सुरुवातीपासून शेवट पर्यंत चित्तथरारक आहे . मिर्झा राजे जयसिंगांकडे ओलीस म्हणून राहणं असो की वडिलांबरोबर आग्राहुन सुटका अगदी शिवाजी महाराज गेल्यानंतर अण्णाजी पंत आणि बाकी लोकांनी केलेली बंडाळी मोडून काढणं . कुठलीही गोष्ट सहजासहजी न मिळणे हे जाणवतं . तस पाहिलं तर एका छत्रपती चा मुलगा  . मात्र छत्रपतींचा मुलगा असूनही प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांनी केलेली प्रामाणिक आणि जीवापाड धडपड .  ती करण्यातच त्यांचं खूप आयुष्य  खर्ची पडलं , मग ते त्यांच्यावर आलेलं 'गोदावरी' नावाचं बालंट असो की अपमानित झाल्यामुळे रागाच्या भरात घेतलेलं दिलेर खानाला जाऊन मिळण्याचा निर्णय  . यातले काही निर्णय हे शिवाजी राजांची रणनीती होती असंही सांगितलं जातं , असो तो ऊहापोह करणं या लेखाच उद्दीष्ट नाही . त्यांचं चरित्र  वाचतांना जाणवते ती प्रत्येक ठिकाणी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा .  

असे कितीतरी प्रसंग आहेत की जे वाचतांना त्यांच्या मनाची होणारी तडफड जाणवते . मग ते दिलेर खानाकडून आल्यावर 'राजे तुम्ही चुकलात ' म्हणून शिवाजी राजांनी त्यांच्याकडे पाठ फिरवणं असो की त्यावेळेच्या परिस्थितीत नाईलाजाने  स्वतःच  स्वतःला राजा म्हणून घोषित केल्यावर सोयराबाईंना नजरकैदेत ठेवाव लागण .  ज्या पुतळाबाईंनी त्यांच्यावर अखंड , अविरत अशी माया केली त्या सती जातांना असहाय्य होऊन पाहणं अथवा राजरामांनी 'मलाही तुम्ही कैदेत ठेवणार का ' हे विचारल्यावर वाटणारं  दुःख   . प्रत्येक ठिकाणी जाणवते ती त्यांनी दुसऱ्यांच्या मनाला जपण्याची केलेली धडपड . स्वतःला त्रास झाला तरी तो न दाखवता कसोशीने केलेली अंमलबजावणी , मग ती वयक्तिक कर्तव्याची असो अथवा राजकीय . 



रणांगणात तसेच इतर प्रसंगात निरनिराळे  निर्णय घेतांना , घेतलेला निर्णय अंमलात आणतांना  जाणवलेली धडाडी आणि दृढनिश्चयी वृत्ती.   स्वतःच्या लोकांना प्रेरित करून जंजिऱ्याचा समुद्र बुजवुन सिद्धी पर्यंत पोहोचण्याची असो अथवा अवघे 9 वर्षाचे असतांना  कुणाला न कळत रायगडावर पोहोचण्यासाठी केलेली आग्रा ते रायगड ही  पायपीट .  बटूसारखे  नुसते वेषांतरच नाही तर संध्या , पूजा सगळं आत्मसात करून , त्याचं पालन करणं .  नाटक बेमालूम होणं  आवश्यक नाहीतर   पकडल्या जाण्याची भीती . काय आणि किती प्रसंग आहेत .  लिहावं तेवढं कमी . हे सर्व आठवतांना एक मात्र नेहमी जाणवतं , शिवाजीराजांना लोकांची जी साथ मिळाली ती मिळायला संभाजी राजांना फार कष्ट करावे लागले . शिवाजीराजांना घरची फारशी काळजी कधी करावी लागली नाही . ती बाजू जिजाऊंनी सांभाळली .  या बाबतीत मात्र संभाजींना घरचे कलह , राजकीय आंतरिक  बंडाळी तसेच बाहेरचे औरंगजेबाला सामील होणारे सरदार या सगळ्या बाजू सांभाळायला तारेवरची कसरत करावी लागली .


संभाजी राजांच्या हयातीत जी एकजूट साध्य झाली नाही ती त्यांच्या बलिदानाने साध्य झाली . त्यानंतर कितीतरी वर्ष महाराष्ट्र ने झुंज दिली , एकवेळ तर अशी आली की दिल्ली देखील काबीज केली . बरोबर ना ? पण हे सर्व होण्यासाठी संभाजी राजांना सर्वोच्च बलिदान द्यावे लागले . जर त्यावेळी एकजूट असती ,  छोट्या जहागिरीची इच्छा बाळगून त्यावेळच्या सरदारांनी औरंगजेबाला साथ दिली नसती  तर आज कदाचित महाराष्ट्राचा  इतिहास अजून काही निराळा असता . असो . 


दूरदर्शनवर मागे संभाजी serial झाली . ती फक्त त्यांच्या लढाया आणि रणनीती यावर आधारित नव्हती तर त्यांच्या आयुष्यातल्या निरनिराळ्या प्रसंगात त्यांना काय वाटलं असेल हेही त्यात शोधायचा , त्यांच्या मनाचा ठाव घेण्याचाही प्रयत्न त्या serial मध्ये  केला गेला  .  त्यांच्या स्वभावाचे निरनिराळे कंगोरे दाखवण्याचाही तो एक प्रयत्न होता .  ती serial बघतांना पुष्कळदा जाणवलं की आपल्या प्रत्येकातही एक संभाजी असतो , ज्याला खूपदा आजूबाजूच्या आपल्याच लोकांबरोबर स्वतःला सिद्ध करण्यासाठी लढा द्यावा लागतो . कधी स्वतःच चुकत नसल तरी ते  दुसऱ्याला पटवून देण्यात शक्ती  खर्च करावी लागते . कधी न आवडलेला निर्णय स्वीकारावा लागतो . आवडत नसतांनाही कुणा दुसऱ्याच्या चांगल्यासाठी ते करावं लागतं . कुणी दुय्यम वागणूक देत आहे हे जाणवून अपमानित वाटलं तरी ते नातेसंबंध टिकवण्यासाठी स्वतःला समजवाव लागतं . कधी कुठली व्यक्ती , तिचं वागणं हे चुकीचं आहे हे माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्याचा मार्ग अवलंबावा लागतो , एक ना अनेक . 


संभाजीराजांच व्यक्तिमत्त्व फार उत्तुंग आहे यात काही वादच नाही . त्याबद्दल वाचतांना , जाणते अजाणतेपणी जाणवलेला हा एक कोपरा  खूप जणांना त्यांच्या अजूनच जवळ घेऊन जातो . काही प्रसंग वाचतांना कधी कधी आपणही कुठेतरी अनुभवलेले , आपल्यावर आलेले छोटे मोठे प्रसंग आठवतात आणि त्यावेळी त्यांच्या मनाची झालेली घालमेल मनाला स्पर्शून जाते .  आपणही कधी स्वतःलाच सिद्ध करण्यासाठी केलेली धडपड  त्यावेळी चटकन डोळ्यांसमोर येते आणि ते उत्तुंग व्यक्तिमत्त्व आपल्या फार परिचयाचं आहे असं जाणवतं . तुमचा अनुभव काय सांगतो ? 



#संभाजीराजे# 

Sunday, 18 April 2021

व्यक्ती आणि कृती

 व्यक्ती आणि कृती



श्रीराम



आज पहिल्यांदाच व्यक्ती आणि कृती या  विषयावर लिहायला घेतलंय .   जेव्हा व्यक्ती आणि कृती या विषयी लिहावं अस वाटलं तेव्हा असंही वाटलं की जशी नवीन काही सुरुवात करतांना आपण जसा  देवाला नमस्कार करतो  किंवा काही खायला जरी केलं तरी आधी आपण बाप्पाला नेवेद्य दाखवतो ना  तसच आधी एखादा लेख लिहून बघावा म्हणून देवाचं नाव घेतलं .       ' श्रीराम '  इतक मोठं व्यक्तिमत्त्व .  हे म्हणजे एखाद्या वाफेतल्या पाण्याच्या अणु ने समुद्रबद्दल लिहिण्यासारखं आहे . समुद्र जसा अथांग तसच या व्यक्तिमत्वाचे पैलू अथांग . ते पूर्णतः कळणं हेही कठीण आणि ते हा लेख लिहिण्याचं उद्दिष्टही नाही . 


कुणी साधं " श्रीराम " जरी म्हंटल तरी पटकन , ' जय श्रीराम ' किंवा ,  " जयराम जय जय राम " हे तोंडात येत . देवांची नाव मुलांना ठेवण्याची पद्धत पूर्वी जास्त होती .  त्याच कारणही हेच असावं की एकतर दिवसभरात  देवाचं नाव आपोआप घेतल्या जाईल आणि दुसरं म्हणजे मुलांबरोबर बोलतांना अपशब्द उच्चारले जाणार नाहीत . देवाचं नाव घेतलं की आपसूकच मेंदूला , जिभेला , मनाला तशा सूचना जातात . बरोबर न . 


कुठलीही व्यक्ती आपल्या लक्षात राहण्याचं कारण नक्की काय असतं ? का ती आपल्याला आवडते किंवा आवडत नाही ? खूपदा याच उत्तर लगेच मिळत नाही . आज जेव्हा मी श्रीराम हा शब्द लिहिला तेव्हा पहिले काय काय पटकन आठवलं मला ?  चेहऱ्यावरचा शांत भाव . जरी आपण बघतो ती देवांची चित्र "राजा रवी वर्मा "  यांनी काढलेली असली तरी ती सगळी चित्र पाहिल्यावर आपल्या मनातला देव अजून निराळा आहे असं कधी वाटलच नाही  . 


पुढचा त्यांचा गुण आठवतो तो त्यांची पितृभक्ती . वडिलांनी दिलेलं वचन पाळण्यासाठी पत्करलेला वनवास . वनवास पत्करतांना वारसाहक्काने मिळालेल्या राज्याचा , ऐश्वर्याचा त्याग करणं ही साधीसुधी गोष्ट नाही . आज आपल्या आजुबाजुला कित्ती लोक आपण बघतो जे थोडया थोडक्या स्वार्थासाठी सुद्धा एखाद काम करायला कधी हो तर कधी नाही म्हणतात . इथे तर संपूर्ण राज्य , ऐश्वर्य , सुखसोयी , पूर्ण परिवार त्याग करण्याचा प्रश्न होता .सामान्य व्यक्ती जो विचारही करू शकत नाही तो विचारच नाही तर जबाबदारीने त्याच आचरण करणं हे मनाला फार भावतं आणि त्यामुळे  देवत्वही जाणवतं . 


मनाला भावतं ते त्यांचं पत्नीवरच प्रेम .  सीतेच अपहरणानंतर  झालेल्या पराकोटीच्या दुःखानंतर तिला सोडवण्यासाठी तयार केलेली युद्धनीती . त्यात मग कधी केलेली  कुणाबरोबरची मैत्री तर कधी युद्ध तर कधी अजून काही रणनीती . तसा विचार केला तर अपहरण झाल्यावर ते रावणाबरोबर लढण्यासाठी सैन्य आयोध्यहून मागवू शकले असते .    हनुमानाची भेट झाल्यावर तर ते फारच सोपं होतं. अशोकवनात निरोप द्यायला न जाता हनुमंत अयोध्येला गेले असते . ते त्यांनाही काहीच कठीण नव्हतं . भरताने ते पाठवलेही असते . तो स्वतःही आला असता . येऊ शकला असता . रामांच्या वनवासाच्या 14 वर्षात भरत त्यांच्या पादुका गादीवर ठेऊन त्याचा सेवक म्हणूनच राज्यकारभार करत होता हे तर श्रीरामांनाही ठाऊक होतं . तरीही हे त्यांनी केलं नाही . का ? असा प्रश्न लहानपणी पडायचा . असो .  काही वर्षांपूर्वी एक चर्चा ऐकली होती ,  की ते सगळे वानर खरंच इतके शूर होते का ? की त्यांनी रावणाच्या सैन्याचा बिमोड करावा ?  काही ठराविक  अंगद , सुग्रीव सारखे वानर सोडले तर बाकी सर्व साधारण वानर होते मग  इतक्या प्रचंड आणि बलवान सैन्याचा सामना त्यांनी कसा केला  ? त्याच उत्तर एकच , सामान्य वानरांच्या सेनेच नेतृत्व असामान्य नेता करत होता . 


या व्यक्तिमत्वात सगळ्यात प्रकर्षाने जाणवणारा स्वभाव म्हणजे त्याची सत्यासाठी लढण्याची वृत्ती , वचन पाळण्यासाठी केलेली पराकाष्ठा . ते आपल्यासारखे साधारण लोक करू शकत नाही . त्यामुळे त्या व्यक्तिमत्वाची भक्ती करणाऱ्यांमध्ये भक्तीबरोबरच आदरही तेवढाच ओसंडून वाहतो . म्हणूनच त्यांना  , "सत्यवचनी राम " " निश्चयाचा महामेरू " , "एकपत्नीव्रता " मर्यादा पुरुषोत्तम अस कितीतरी विशेषणांनी संबोधल्या जातं . 


व्यक्ती  कृती करत असते आणि कृती व्यक्ती घडवत असते . एखाद्या व्यक्तीच व्यक्तिमत्त्व तेव्हाच उजागर होतं जेव्हा ती काहीतरी वेगळं करत असते . श्रीरामांच्या बाबतीत तस वागणारी , कृती करणारी कुणीही व्यक्ती त्याकाळातही  नव्हती ना आज आहे . रामराज्य हे या युगात तर एखाद मृगजळ असावं तसं आहे . असो .


एखाद्या व्यक्तीचा आदर्श ठेवणं , त्याच्या पावलावर पाऊल टाकून चालणं हे सर्व  अशक्यप्राय आहे हे जाणवतं ,  त्या व्यक्तिमत्वाला नतमस्तक होऊन देवत्व बहाल केलं जातं  . बरोबर ना . 


आपण नक्की कशाला नतमस्तक होतो ? व्यक्तीला ? की कृतीला ? अर्थात त्या व्यक्तीच्या कृतीला , त्या कृतीमागच्या विचारप्रक्रियेला  आणि कृतीमुळे व्यक्तीला .  

काय वाटतं तुम्हाला ? 


#रामनवमी# , #व्यक्ती# , #व्यक्तिमत्त्व#