Followers

Sunday, 4 October 2020

फुलपात्र




फुलपात्र



आज फुलपात्र  शब्द वाचण्यात आला . फार दिवसांनी वाचला . हा शब्द आजकाल फारसा बोलण्यातही येत नाही आणि वाचण्यातही . पूजेच्या वेळी मात्र कधी कधी आपण सगळे फुलपात्र शब्द वापरतो . त्याचं कारण कदाचित तीर्थ किंवा जल हे फुलपात्रात आहे म्हणायला छान वाटतं , हो ना ? एरवी आपण सगळे त्याला ग्लास , पेला , प्याला असच म्हणतो . कधी mug , कप असंही म्हणतो , पण फुलपात्र ?  ते आपण फक्त पूजेच्या वेळीच वापरतो . असो


फुलपात्र हे सहसा चांदी किंवा तांब्याच असतं .  पेला हा मात्र कशाचाही असू शकतो , हो म्हणजे स्टीलचा , पितळेचा , अल्युमिनियम चा , चांदीचा , सोन्याचा. त्याचप्रमाणे  आपल्या मनात ग्लास ची प्रतिमा ही  काचेचीच असते . त्याचे आकार निरनिराळे असू शकतात पण तो असतो मात्र काचेचाच . 


प्याला शब्दात , तो  छोटा , कमी उंचीचा असणार , जुन्या वेळचा वापरात असणारा असं प्रतीत होतं . तसच त्या शब्दातुन अजून दुसराही एक अर्थ निघतो आणि त्याच बरोबर आठवतं ते.     ' राम गणेश गडकरी ' यांचं ' एकच प्याला ' हे नाटक '.  तोही शब्द फारसा कुणी रोजच्या व्यवहारात बोलत नाही .  बरोबर ? 


चषक म्हटलं की तो  कधी काचेचा असेल तर कधी सोन्याचांदीचा तर कधी दुसऱ्या कुठल्या धातूचा . तो नाजूक असणार  , उंच असणारं तसंच त्यावर नाजूक नक्षीकाम असणार हेही लगेच मनात येत  . संस्कृत बोलतांना किंवा लिहितांना मात्र ' चषके औषधं अथवा जलं अस्ति । '   इतर वेळी चषक म्हंटल की अरेबियन नाईट्स च्या गोष्टी आठवतात . ती उंच लांब कलाकुसर केलेली रत्नजडित सुरई सुद्धा आठवते . त्याचप्रमाणे आठवतो कुठल्यातरी स्पर्धेत जिंकलेला चषक , काय ? 


Cup किंवा Mug  म्हंटल की तो सिरॅमिक चा असणार हे मनात उमटतं . आजकाल प्लास्टिक आणि कागदाचे ही कप असतात . ' World Cup '  देखील आठवतो काहीवेळेस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉफी किंवा चहाची लगेच आठवण येते .   एक वाक्य नेहमी ऐकिवात येतं , ' This is my cup of tea '  किंवा  This is not my cup of tea '  एखादी आवडणारी , जमणारी अथवा न आवडणारी ,  न जमणारी कुठलीही गोष्ट दर्शवतांना हा शब्दप्रयोग नेहमी केल्या जातो . हा झाला इंग्रज इथे आल्यानंतरचा इ . स . 1800 नंतरचा वाक्यप्रयोग . इ.स. 1800 च्या आधी चहा ,  cup , glass , mug हे शब्द नसले तरी पेला होताच की आपल्याकडे . त्यामुळे  ' पेल्यातलं वादळ ' हा शब्दप्रयोग खूप आधीपासून साहित्यात दिसतो . पेल्यातलं वादळ पेल्यातच शमणार असलं तरी त्याचा बागुलबुवाही तयार करता येतो ,  असो  .  


आशावादी आणि निराशावादी कोण आहेत हे ठरवण्याचा छोटा प्रयोग आपण सर्व जाणतोच . खरचं पेला अर्धा भरलेला आहे किंवा अर्धा रिकामा आहे , इतक्याच उत्तराने हे ठरवता येतं ?  


' मंगेश पाडगावकर '  म्हणतात


पेला अर्धा सरला आहे

असं सुद्धा म्हणता येत;

पेला अर्धा भरला आहे

असं सुद्धा म्हणता येत!


सरला आहे म्हणायचं

कि भरला आहे म्हणायचं?

तुम्हीच ठरवा!


आता पेला म्हंटला की त्यात काहीतरी असणारच . पेला रिकामा कधीच नसतो . त्यात कधी पाणी असेल , तर कधी सरबत तर कधी अजून काही . काही द्रव नसेल तरी हवा तरी असतेच असते . 


पेला कशाचा आहे म्हणजे , काचेचा , कुठल्या धातूचा , कागदाचा किंवा अजून कशाचा हे जेवढं महत्त्वाच तेवढंच पेल्यात काय आहे , पेला कुणाच्या हातात आहे  हे ही महत्वाच . त्यात चमचा आहे की straw . चमचा नुसताच ठेवलाय की खाली  तळाला काही उरलं आहे जे चमचा  फिरवून द्रवात मिसळायच आहे , ते एकजीव होणार  आहे की नाही हेही महत्त्वाच .  यावरून पारशी समाजाची आणि  दुधात साखर एकजीव करण्याची गोष्ट आठवली . जसा चमचा का ठेवलाय हे महत्वाचं तसच straw देखील . ती Straw फक्त छान दिसण्यासाठी ठेवलीय की त्याने आतला द्रव प्यायचा आहे ? ती सजवलेली आहे , छत्री , लिंबू , मोसंबी , संत्र , पुदिना  किंवा कुठल्या फळांनी की साधी आहे ?  पेल्यातल्या द्रवात  गोडवा आहे ? आंबटगोड आहे ? खारट आहे ? की तुरट ? गरम आहे की थंड ? फेसळलेलं पेय आहे ?  की ज्याचा फेस जास्त आणि पेय कमी अस आहे ? फेस आपोआप कमी होणार आहे ? की फुंकर घालावी लागणार आहे ? बुडबुडे हळूहळू फुंकर घालत ते फोडायची मजा घ्यायची इच्छा आहे ? की तसच पाहायला आवडतंय ? पेल्यातला द्रव हे  नारळाचं पाणी , साधं पाणी आहे ?  तृष्णा घालवणार आहे ?  की पोट भरणार आहे ? की मनाला मदमस्त करणार आहे ? अबब कित्ती हे प्रश्न ?  


पेला अर्धा भरायचा की पूर्ण भरायचा ? उतू जाऊ द्यायचा की एकही थेंब सांडू न देता प्यायचा ? की भरलेला पेला दुसऱ्याला देऊन रिकामा करून परत भरायचा ? त्यातला आतला द्रव प्यायचा ? की हातातल्या  straw ने फूररर करून वर आलेले बुडबुडे उडवत थोडी मजा अनुभवायची  की  चमच्याने  घोळून सगळं एकजीव करायचं  की त्यात  छोटंसं वादळ निर्माण करायचं  ?  तृष्णा भागवायची ? की काय करायचं ?  




पेला कशाने भरायचा ?  किती भरायचा ? ओतप्रोत भरून सांडू द्यायचा की काय करायचं ?  हे तर सगळं  आपल्याच हातात आहे म्हणजे  आपल्या मनात ही शक्ती आहे .   पेला जर अर्धा भरलेला असेल किंवा अर्धा रिकामा  झाला असेल तरीही तो परत आपल्याला पूर्ण भरता येऊ शकतो हेच आपण सगळे विसरतो . हो ना ?

आयुष्याच्या फुल्ल पात्रात जे काही आपल्या वाट्याला आलंय त्यात सकारात्मक विचार चमच्याने घोळून तो प्याला की mug तक्रारींची कपात होऊन तो पेला मनाला समाधान तर देईलच तसच त्यातला गोडवा प्रयत्नांच्या    straw ने शोषून घेतांना चषक जिंकल्याचा आनंदही देईल ,

 काय वाटतयं ?








#फुलपात्र  , #मंगेशपाडगावकर , #CupOfTea  , #एकचप्याला  #रामगणेशगडकरी