Followers

Sunday, 28 June 2020

वाद संवाद

वाद संवाद

The real in us is silent , acquired is talkative ...Said khalil Gibran

हे वाक्य एका ठिकाणी लिहिलेल वाचलं , आवडलं .  खूप छान वाटतं न वाचायला पण बोलल्याशिवाय राहवत नाही आपल्या सगळ्यांना . बर जे बोलायचं असतं ते पटकन बोलतो का आपण ? तर नाही ,  जो मुद्दा मांडायचा आहे त्यावर पोहोचायला पण खूप मोठी प्रस्तावना केल्याशिवाय सांगण्यात काय गम्मत असही वाटतं , हो न .

बोलता येणं हे मनुष्याला मिळालेलं वरदान आहे . स्वतःला काय वाटत , काय म्हणायचं आहे हे  दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं हाही एक मनाला विसावा देणारा व्यायाम आहे . व्यायाम म्हंटलं न मी ? हो व्यायामच . जसं शारीरिक  व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहायला मदत होते तशीच मदत बोलल्याने , आपल्याला काय म्हणायचं आहे हे दुसऱ्यांना सांगितल्याने होते , खरं न ? कुणी बोलायला नसेल , किंवा कुणी आपलं ऐकणारा नसेल , कुणाला आपण सांगितलेलं काही  पटतच नाही , कुणी आपलं ऐकतच नाही अस त्या व्यक्तीला वाटत असेल तर  त्याच मन तेवढ सुदृढ राहत नाही ,  बरोबर .

कुणाबरोबर तरी संवाद साधावा अस वाटणं ही सर्वांची गरज आहे आणि संवादात वाद समाविष्ट आहे हे तर आपण सगळ्यांनी गृहीतच धरलंय त्यामुळे वाद जास्त वेळा होतात , संवाद कमी वेळा . होत न अस . चारजण जमले असतांना सगळे बोलू लागतात आणि मग सुरू होते आधी माझं ऐक ची race . मी बोलतो तू फक्त हु म्हण . असो तर ही race जशी सुरू होते तस मग सुरू होतं तुझं बरोबर की माझं बरोबर ही race .

वादे वादे जायते तत्वाबोध: ।

वाद केल्याने चांगले तत्वविवेचन होऊन ज्ञानवर्धन होते

 यातला वाद आणि आपण सगळे एकमेकांबरोबर घालतो तो वाद फार निराळे आहेत  हो न ?




कधी छोट्या मुलांनी त्यांना न पटलेली गोष्ट का करायची अस विचारलं की मोठे म्हणतात जास्त प्रश्न विचारू नको , जे सांगितलं ते कर , वाद घालू नको .  त्यामुळे त्यांची जिज्ञासा तर मारली जाते आणि त्याबरोबर लुप्त होतं ज्ञान . प्रत्येक गोष्ट करण्यामागे काही कारण असतं .  ते ज्ञान जर पुढे गेलंच नाही तर लोप पावणारच . असो  .

कुठलीही व्यक्ती वाद घालतांना तिला काय वाटतंय ते दुसऱ्यांना सांगत असते  कान बंद करून . मात्र संवाद करतांना कान , डोळे आणि मेंदू या सगळ्यांचा उपयोग त्या व्यक्ती करत असतात . संवाद करतांना Eye contact ही तेवढाच महत्वाचा असतो . बरोबर न .

संवाद करता करता गाडी कधी वादाच्या दिशेकडे जाते हे लक्षात येत नाही .

संवाद म्हणजे विविध प्रकारचे विचार, माहिती, कल्पना, भावना आणि जाणिवांचे आदान- प्रदान . तसेच संवाद म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे किंवा अनेकांकडे आपले म्हणणे अनुरूप माध्यमांव्दारा पोचवणे.

संवाद म्हणजे अशा आदान- प्रदानाची, अनुरूप माध्यमांव्दारे आपले म्हणणे पोहचविण्याचे कलाशास्त्र आणि कौशल्य .

वाद घालण्याचे कौशल्य लवकर आत्मसात होत मात्र संवाद करण्याचं कौशल्य हे शिकावं लागतं . ते आत्मसात करण्यासाठी मेहनत करावी लागते . संगीतातही वादी संवादी स्वर असतात . तिथे मात्र वाद जास्त महत्वाचा असतो , राजाच म्हणा न आणि संवादी हे त्याचे मंत्री . एखाद्या रागाची चाल स्पष्ट करण्यासाठी संवादी स्वर वादी स्वरांना मदत करतात याउलट बोलतांना वादापेक्षा संवाद जास्त महत्वाचा असतो .  जसे संगीतात राग शिकतांना वादी संवादी स्वर लिहून , लक्षात ठेवून , पाठ करून , संगीत शिकायला सुरुवात केली जाते तशीच सुरुवात बोलण शिकतांना वाद आणि संवाद यांचेही स्वर लिहून मिळाले , पाठ करता आले आणि शिकता आले तर ?

तर वाद , संवाद कसा छान होईल  याची दिशा स्पष्ट करतील . हो न ? मंत्र्यांच काम राजाला मदत करणं हेच तर आहे , काय वाटतं तुम्हाला ?





##वादसंवाद, #वादेवादेजायतेतत्वाबोध:,