Followers

Sunday, 3 November 2019

इंद्रधनुष्य


इंद्रधनुष्य

आज दुपारी पाऊस थांबल्यानंतर बाहेर बसले होते,  ऊन पडलं होतं , सहज वर लक्ष गेलं आणि सुंदर इंद्रधनुष्य नजरेस पडलं . वा , इंद्रधनुष्य खरच मोहक असतं . सुदंर रंगांची आकाशातली निसर्गाने केलेली उधळण .
 तानापीहीनीपाजा .....ही रंगाची नाव लहानपणी  पहिल्यांदा कळल्यावर पाठ करायला मजा येते . एकदा का ती मुखोद्गत झाली की मग अगणित वेळा याची उजळणी केली जाते .....त्या रंगांच्या खडू , क्रेयॉन्स ने  इंद्रधनुष्य कित्तीतरी वेळा काढलं जातं .....धनुष्य म्हंटल की  अर्धचंद्र , महिरप छान यावी लागते . मात्र इंद्रधनुष्य काढायला सोप्प आहे . रंगीत रेघोट्या काढल्या  की झालं आणि त्याचा आकार सुद्धा थोडा बदलला तरी चालतो .

 पाऊस इंद्र पाडतो अस मानतात आपल्याकडे आणि त्यानंतर इंद्रधनुष्य दिसतं म्हणून कदाचित हे नाव ठेवलं असेल तरी मग त्याचा आकार हा नेहमीच्या धनुष्यापेक्षा वेगळा असतो . कधी अर्धचंद्र दिसतो तर कधी नुसती एक रेष , तर कधी  2 ,3 ठिकाणी ही दिसत इंद्रधनुष्य .  त्याची महिरप नसली , अर्धचंद्र नसला तरीही धनुष्य का म्हणतात ?

लहानपणी एखाद्या झाडाची काडी किंवा अगदी खराट्याच्या काडीचाही धनुष्य बाण खेळतात मुलं . अशा केलेल्या धनुष्यातुन बाण कधी सरळ जातो तर कधी तिरपा . कधी दोरी सैल  असल्याने घसरतो  बाण आणि कधी कधी तर तिथेच खाली पडतो . इंद्रधनुष्यातून रंग असे तिथे सगळीकडे आकाशात  पसरावे म्हणून नसेल त्यालाही महिरप , अर्धचंद्र असा साचेबंद आकार ? ..... धनुष्याची कमची जास्त ताण आल्यामुळे जशी कधी कधी मधेच तुटते तसच इंद्रधनुष्यही कधी कधी अर्धचं दिसत .....कधी पूर्ण दिसतं ....कधी एक रेष दिसते तर कधी 3, 4 रंगच दिसतात , कधी काही रंग गडद तर काही धूसर  दिसतात .......कसही दिसो ......ते रंग दिसले की छान वाटत .....आकार कुठलाही असला तरी त्याला आपण सगळे धनुष्यच म्हणणार ......सूर्याच्या रथाला 7 घोडे असतात म्हणून 7 रंग दिसतात अस  कुणीतरी सांगत आणि ते त्यावेळी खरंही वाटत..........जस मग prism , reflection , refraction हे शिकल्या जात तस तस मग या सुंदर विश्वातून आपण थोडे बाहेर यायला लागतो .......पण तरीही पूर्ण बाहेर येत नाहीच .  केव्हाही , अगदी आजही सुदंर इंद्रधनुष्य पाहतांना दिसतं ते सौन्दर्यच.  या सगळ्या rays, prism सारख्या गोष्टी त्यावेळी आठवतही नाहीत .

इंद्रधनुष्य दिसल्यानंतर कधी परत पाऊस पडून ते अर्धवट मिटत कधी पूर्ण दिसेनास होतं तर कधी ढग दाटून आल्यामुळे वातावरण  कुंद होतं ,  कधी ऊन परत पडत कधी नाही , केव्हा केव्हा हवा सुटते , ढग वाहून जातात , आकाश निरभ्र होत . आपण मात्र वाट पाहत राहतो परत इंद्रधनुष्य दिसेल का याची .


कुठलं एखाद काम , इच्छा , स्वप्न जेव्हा पूर्ण होत  ,  मनापासून ज्यावेळी आनंद होतो त्यावेळी त्या आनंदाला रंगीत झालर असते अस म्हंटल्या जात .....त्यावेळी सुद्धा या सप्तरंगांसारख्या सात गोष्टी एकामागोमाग होतात .....रंगाप्रमाणे गेलो आपण तर पहिला तांबडा .....  काही मनाजोग होतं किंवा कशाहीमुळे मनापासून आनंद होतो  , मग त्यामुळे मनात  उत्साह संचारतो ......हा दुसरा रंग , नारिंगी .....सगळ्यांना सांगावं अशी मनात उर्मी निर्माण होते .......पिवळा , सगळ्यांनी कौतुक केल्यावर  खूप छान प्रसन्न  वाटत ....दिल बाग बाग होतं , हा हिरवा ,.....आकाशाला गवसणी घालावी अस  वाटू लागत , तो निळा ,  .....त्यामुळे आत्मविश्वास वाढतो , हा पारवा ,.....यामुळे परत  काम करण्याची स्फुर्ती मिळते ,  तो जांभळा .

असे हे तानापीहिनीपाजा , मनाला आकर्षित करणारे आणि आनंद देणारे . नवीन काम , नवीन स्वन पूर्ण करण्यासाठी मनाला पुनःपुन्हा शक्ती देणारे .  त्याचं ते न संपणार , मनाला आनंद देणार तानापीहीअनीजा हे इंद्रधनुषी चक्र सुरूच राहत .

इंद्रधनुष्यातले रंग हे फक्त पाऊस आल्यावर दिसतात अस नाही . सप्तरंग दिसण्यासाठी आवश्यक असतो तो प्रकाश आणि एक ठराविक angle .  ......पाण्याच्या थेंबात जसे सप्तरंग दिसतात तसेच ते दाराच्या eye hole मधून समोर भिंतीवर पडलेल्या सुर्यकिरणात पण दिसतात . प्रकाशाचा refraction झाल की सप्तरंग दिसणार . साध पाण्यात बोट जरी घातलं तरी ते मोठं दिसतं , आहे त्यापेक्षा वस्तू अजून जवळ दिसते , कधी कधी ती जास्त सुंदरही दिसते . या सगळया मागे विज्ञान जरी असलं तरी पाहतांना जाणवतं ते त्यातलं सौन्दर्य . असे रंग , सौन्दर्य ठिकठिकाणी दिसतात किंबहुना शोधले की सापडतात म्हणू हवं तर . त्यासाठी लागतो तो मनातला प्रकाश आणि पाहण्याचा तो perfect angle .....बस मग काय सगळं जग हे इंद्रधनुषी सप्तरंगांचंच दिसतं .


आपल्याही सर्वांना कणाकणात इंद्रधनुष्य शोधता येवो हीच मनीषा .



#rainbow, #इंद्रधनुष्य



Sunday, 27 October 2019

सुगंध

सुगंध

 सुगंध म्हंटल की आठवतो निरनिराळ्या फुलांचा सुगधं , अत्तर , सुवासिक तेल, निरनिराळ्या साबणाचा सुगंध अजून जर विचार केला तर चंदन , कस्तुरी , केशर असे कितीतरी सुगंध आठवतात .

चंदनाचा जसा सुगंध असतो तसाच तो हळदीलाही असतो .....ओल्या हळदीचा सुगंध फार सुंदर येतो ......जसा कस्तुरी , केशराचा सुगंध सुंदर येतो तसाच जायफळ वेलचीचाही आवडतो ......विचार करायला सुरुवात केल्यावर लक्षात येतंय .....कित्ती प्रकारचे निरनिराळे सुगंध आहेत .

सुगधं म्हणजे आपल्याला आवडणारे जे गंध आहेत ते ......आणि जे आपल्याला आवडत नाहीत ते दुर्गंध ......पटत नाही ?  पहा साधं उदाहरण घ्यायचं तर ऑइलपेंट चा गंध काहींना आवडतो तर काहींना आवडत नाही , तसच पेट्रोल , रॉकेल किंवा सफेदी करतांना येणारा चुन्याचा गंध  कुणाला आवडतो कुणाला नाही . एखाद्याला लसणाच्या फोडणीचा गंध आवडतो , कुणाला शेपू च्या भाजीचा गंध आवडतो ,कुणाला नाही आवडत. प्रत्येकाची आवड निराळी ......व्यक्ती तितक्या प्रकृती , बरोबर न ....कुठल्या गंधाला सुगंध म्हणायच हे त्या त्या  व्यक्तीनुसार ठरतं .


मराठी किती मजेदार भाषा आहे न ......फुलांचा सुगंध , चहा कॉफीचा किंवा कुठला मंद सुगंध हा दरवळतो  , एखाद्या खाद्य पदार्थाचा  घमघमाट सुटतो  , दुर्गंधी पसरते , दर्प येतो . आपण ठरवून टाकलंय दरवळला म्हंटल म्हणजे मंद आवडणारा गंध असणार , घमघमाट सुटला म्हणजे खाद्यपदार्थशी निगडित काही असणार मग तो पूर्वी घरात मसाला कुटल्यानंतर घरभर पसरलेला सुगंध ही असू शकतो . दर्प म्हणजे कुठला तरी उग्र गंध असणार आणि न आवडणारा गंध हा आपली परवानगी न घेता पसरणार . काय ?


यावरून आठवलं ....एकदा मी एका माझ्या UP च्या मैत्रिणीकडे जेवायला गेले होते .....तिच्या घरात जाताच  तिने भाजीला घातलेल्या फोडणीचा सुंदर वास आला .....ती समोर दिसल्याबरोबर मी तिला आपल्या मराठी  हिंदीत म्हंटल ....." क्या बास आ रहा है ....वा " .......ती म्हणाली  "कैसा बास " म्हंटलं " सब्जी के बगारका " ती म्हणाली " आवडला नाही का " म्हंटल , "अग खूप छान आहे , आवडला म्हणून तर म्हंटल " ती म्हणाली " अग मग बास काय म्हणते , खुशबू  म्हण , सुगंध म्हण . खूप हसू येत आजही हे आठवलं की .

सुगंध फक्त फुलांचे , अत्तर किंवा सुवासिकच असतात का ? कधी बाहेर गेलो असतांना कुठेतरी कुणी वरणाला घातलेल्या फोडणीचा , तर कधी कढी चा , तर कुठे पुरणाच्या पोळीचा , कुठे मस्त पावभाजीचा , कुठे पहिल्या वाफेच्या भाताचा ......असे कितीतरी सुगंध येतात आणि त्या वरणाच्या सुगंधवरून आठवण येते एखाद्या आजीची , काकुंची ज्या अस वरण खूप छान करतात , कढीवरून , पुरणाच्या पोळीवरून कुणाला आठवते आई , भातावरून कुणाला आठवत लहाणपणी शेजारच्या काकुकडच जेवण , पावभाजीवरून आठवते एका पार्टीत केलेली धमाल ......अजून कितीतरी ........

प्रत्येक गंधाची आपली अशी एक आठवण  असते .... शिशिर ऋतु संपताना जो एक खाली पडलेल्या वाळलेल्या पानाफुलांचा गंध असतो , शुष्कता असली वातावरणात तरीही ती झाडांना नवीन येणाऱ्या पालवीची नांदी असते . मार्च एप्रिल मध्ये  टप्पू लागणाऱ्या झाडाच्या  त्या पिवळ्या , गुलाबी फुलांचा सुगंध आला की मला नेहमी परीक्षेचा सुगंध येतो . मोगऱ्याचा पहाटे येणारा सुगंध आता शाळेला सुट्टी आहे याची आठवण आणतात ......मग त्या लहानपणी आपल्या शाळा असोत की आत्ता मुलांच्या शाळा . जून जुलै मध्ये मृदगंध जसा पावसाची ,आणि पावसाबरोबर जोडलेल्या  निरनिराळ्या गोष्टींची , अगदी गरम कांदा भजीचीही , कितीतरी  चिंब चिंब भिजलेल्या आठवणीना उजाळा देतो , तसच त्यावेळी घरी आणलेल्या नवीन पुस्तकांचा सुगंध शाळा सुरू होण्याच्या वेळी झालेल्या कितीतरी मजेदार आठवणींची आठवण देतो . संध्याकाळी येणाऱ्या जाई, जुई, पारिजातक यांचे सुगंध गणपती महालक्ष्मी जवळ आल्याची आठवण देतात. नवीन कपड्यांचा  , घराघरातून येणारे चिवडा ,चकली , शंकरपाळे यांचे  सुगंध दसरा दिवाळीची आठवण देतात . बारूदीचा गंध काहींना आवडतो काहींना नाही .....तो गंध दिवाळीची आठवण तर देतोच पण त्याबरोबर जोडल्या असतात कितीतरी दिवाळीतल्या मजेदार आठवणी .  त्यावेळी ती बारूद गोळा करून मग ती पेटवल्यावर होणारा तो जाळ , तो जळका वास , तो भुस्स होणारा आवाज आणि ती करतांना आलेली मजा . काय ....आठवलं न ते बारूद गोळा करण्यासाठी पहाटे उठल्यावर आधीच्या रात्री अर्धवट जळलेले फटाके शोधणं ......

हिवाळ्यात येणारा तो जळक्या रबर tube चा वास कोणीतरी शेकोटी पेटवल्याची जाण देतो .....कुठे कधी त्यावर हलकेच तरंगत येणारा चहाचा सुगंध कुठल्यातरी ट्रिपवर गेलो असतांना पावसात , थंडीत कुडकुडत  टपरीवर घेतलेल्या त्या स्वादिष्ट चहाची आठवण आणि त्याबरोबर अजून काही त्या ट्रिपच्या आठवणी ताज्या करतो .



नुसत्या गंधाने आठवणी ताज्या होतात , जाग्या होतात म्हणू हवं तर ........मग तो आवडणारा गंध असो अथवा नसो , आठवणी जाग्या होतात हे मात्र नक्की .

 अत्तर जस  नेहमी छोट्या कुपीत ठेवलं असतं घट्ट बंद करून तशाच या आठवणी सुद्धा . जसं त्या कुपिच झाकण उघडल्या जातं तसा सुवास  पसरायला सुरुवात होते , झाकण बंद केलं तरी थोडा वेळ तो सुवास जाणवत राहतो , जर तो आपल्या कपड्यांवर लावला तर कितीतरी दिवस जाणवत राहतो . तसच तर आहे आपल्या आठवणींच्या कुपीचंही . प्रत्येक गंधाशी आपली एक आठवण जोडलेली असते . ती आठवण सुगंधी आहे की नाही हेही माहिती असत .  गंध येवो अथवा न येवो आपल्याला आपली ती कुपी कधीही उघडून  अनुभवता येते .

खरचं कित्ती अश्या गंधाच्या कुप्या जमल्या आहेत आपल्या सगळ्यांकडे . कुठली केव्हा उघडावी हेही आपल्या हातात आहे . कुठली उघडली तर मन सुखावणारी संवेदना मिळणार , कुठली मनाला त्रास देणार हेही माहिती आहे , कुठली कुपी मनाला प्रफुल्लित करेल , कुठली स्वर्गीय दुनियेत नेईल , कुठली धुंद करेल, कुठली उदास . कुठली कुपी उघडावी , कुठली सर्वत्र शिंपडावी , कुठली कुणाबरोबर वाटून घ्यावी , कुठली आपल्या एकांतात उघडावी , कुठली केव्हा उघडावी ........ सर्व सर्व काही आपल्याच हातात आहे ......हो न . ठरवा तर मग तुम्ही तुमच्या कुपीचा क्रम .

जाणतेपणी असो अथवा अजाणतेने.......आपण सर्व जी कुठली कुपी उघडू ती सुगंधाचीच असो हीच मनीषा .


#अत्तर  #सुगंध




Monday, 21 October 2019

नाव

नाव

What's in name ........shekespeare ने म्हटलंय...........पण खरंच असं आहे का ?

बाळाचा जन्म होतो न होतो त्याला आशीर्वाद दिल्या जातो .......नाव मोठं करेल हो हा/ ही घरांण्याचं .....बारसं झालं की अजून एक आशीर्वाद मिळतो .........नावाप्रमाणेच होईल  ......किंवा नाव उज्वल करेल ......

बारशाच्या वेळी आई , बाबा किंवा अजून कोणी साजेसं म्हणा किंवा त्यांना आवडतं ते नाव ठेवतात आणि मग त्या नावाने ते बाळ ओळखल्या जाऊ लागत .
काही खोडकर बाळांना जर नाव कृष्णाचं असेल तर लगेच नावातच कृष्ण आहे त्याच्या .....मग खोडकर तर राहीलच ना तो .....असं आईला म्हंटल जातं ......हे आणि असं अजून कितीतरी . आधी कृष्णाच्या बाल लीला जरी म्हणाल्या गेल्या तरी नंतर याच  लीलांना मग कधीकधी कुठेतरी आळा घालण्याचीही वेळ येते .


लहानपणी कौतुकाने नाव ठेवलं जातं आणि मोठं व्हायला लागलं की नावं ठेवली जातात .

एखाद्याला झेंडू म्हंटल जातं तर कुणाला येडपट तर कुणाला झाशीची राणी तर कुणाला hero तर कुणाला काही .........

यातही ठेवलेली नाव ही कधी कौतुक करण्यासाठी असतात तर कधी चिडवण्यासाठी तर कधी उपहास करणारी तर कधी इर्षेने दिली जातात .

सगळ्यात मोठी गंमत ही की कधीही .....म्हणजे अगदी कधीही नाव किंवा नावं ही दुसरी व्यक्तीच ठेवतात .....स्वतः आपण आपलं नाव किंवा आपल्याला नावं कधीच ठेवत नाही .......ना लहानपणी ना मोठेपणी

खरं तर आपण आपलं नाव affidavit करून बदलू शकतो 18 वर्षाचे झाल्यावर , मात्र फार कमी लोक याचा उपयोग करतात ......कदाचित तोपर्यंत एकतर आपण त्या नावाला आपलंसं केलं असतं किंवा ते आवडायला लागलं असतं . खूपदा त्या नावाशी आपलं खूप घनिष्ट असं नातं नकळत जुळलं असतं .......कारण काही असो.

ही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातली अशी गोष्ट आहे जी दुसऱ्यांनी दिलेली असली तरी ती आपली वाटते , त्यावर आपण प्रेम तर करतोच पण गंमत म्हणजे आपलं नाव आपल्यापेक्षा बाकीचेच जास्त वापरतात तरीही आपल्याला राग येत नाही.


लहानपणी ठेवलेली नाव .....म्हणजे छोटू ,चिंगी , बेबी , पिंकी, बाळू , मुन्नी , पिंटू ही आणि अजून अशा प्रकारची नाव तर अशी चिकटतात की ती व्यक्ती आजी , आजोबा झाले तरी बेबी आणि बाळूच राहतात . असं जेव्हाही आपण पाहतो आणि आपल्याला असं नाव नसेल तर फार हसू येत ......पण जर का आपलही असं नाव असेल तर मात्र खूप राग येतो , कोणाचा ?  तर अर्थातच आई बाबांचा , फार सोपं असतं न ते . असो.....
ज्याचं पोळत त्याला कळतं ......
कारण ही नावं चिडवण्याचं एक साधनही असतात .

शेक्सपिअर जर खरंच भेटला तर ,  तर खूप लोक त्याला तुम्ही तुमचे शब्द मागे घ्या असं सांगायला  आंदोलन करतील . आजूबाजूला बघा , राजा नाव असलेला रंक दिसतो , जुई नाव ऐकलं की वाटत छोटी नाजूक मुलगी असेल , भ्रमनिरास होतो , आशा डिप्रेशन मध्ये गेलेली दिसते , तर कधी गणेश बुद्धू असतो , लक्ष्मी गरीब असते तर छोटू मोठ्ठा असतो .....ही विसंगती नेहमी दिसतेच अस नाही तरीही जाणवते खूपदा .

एक जाहिरात आली होती काही दिवसांपूर्वी की आता प्रत्येकाजवळ मोबाईल आहे त्यामुळे त्याला , तिला  त्या no. नी च संबोधण्यात येईल .  प्रत्येक no हा  अद्वितीय असतो , एकासारखा नसे दुसरा   ......नावच नसेल तर त्याबद्दचे अंदाजही बांधल्या जाणार नाहीत आणि भ्रमनिरासही होणार नाहीत , विसंगती आहे असंही वाटणार नाही . असं जर कधी खरंच झालं तर मात्र शेक्सपिअर च म्हणणं खरं होईल ........

नावात काय आहे ?


#williamshakespeare , #what'sinname 

Sunday, 13 October 2019

वाढदिवस

वाढदिवस

वाढदिवस कि जन्मदिवस ........

आपल्याकडे भारतात वाढदिवस साजरा केल्या जातो ......आपण जन्मदिवसाच्या शुभेच्छा कमी वेळा म्हणतो .

पूर्वीपासून  ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्या व्यक्तीला ओवाळून त्या दिवसाची सुरुवात केली जाते ..... देवाचा , घरच्या सगळ्या मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन पुढच्या वर्षाची सुरुवात करायची पद्धत अजून सुरु असली तरी आता birthday , wedding anniversary या शब्दांनाही महत्व आलं आहे .......यावरून आठवलं , एक काकू होत्या , आमच्या घरी नेहमी यायच्या. एक दिवस येतांना केक घेऊन आल्या , कसला विचारलं तर म्हणाल्या , आज आमच्या लग्नाचा birthday आहे . आम्ही लहान होतो , खूप हसलो . आता अस वाटतं , किती निरागसता होती त्यात , लग्नाचा वाढदिवस म्हणायचं होत त्यांना . रम्य ते दिवस , त्यावेळी झालेल्या छोट्या गोष्टींची गम्मत कित्ती दिवस पुरते .


 कुठलीही प्रथा जेव्हा सुरु होते त्यावेळी नक्कीच त्यामागे काही विचार असतो , जो त्या त्या वेळेप्रमाणे , काळाप्रमाणे , त्यावेळेच्या गरजेप्रमाणे , आवडीप्रमाणे किंवा काही सामाजिक बांधिलकी प्रमाणे बरोबरच असतो ........परिस्थितीनुरूप त्यात थोडेफार नंतर बदल होतात .....कधी होतही नाहीत......कधी ते कोणी चालू ठेवतं ,  कुणी सोडून देतं ...........अशाही प्रथा आहेत ज्याचं काही वेळा प्रयोजन काय असावं हा अंदाज येत नाही कारण त्यात परिस्थितीनुरूप बदल झालेले नसतात  .

लहानपणी सगळ्या छोट्या मुलांना वाटतं आपल्या वाढदिवसाला केक आणावी . कुठे पाहिल्यामुळे म्हणा किंवा केक आवडते म्हणून किंवा सजवलेल्या केकच आकर्षण म्हणून म्हणा .....काही घरी मात्र हे केल्या जात नाही .....कारण हेच की ही आपली पद्धत नाही .....आपण दिवा विझवत नाही वगैरे वगैरे .....मुलं छोटी असल्यामुळे त्यांचा हिरमोड होतो.......खरतर प्रत्येक ठिकाणी काही तोडगा निघू शकतो जेणेकरून मुलांचा हिरमोड पण होणार नाही आणि जुन्या लोकांना पण वाईट वाटणार नाही .  जेवढे आयुष्यातले वर्ष संपले तेवढ्या मेणबत्त्या फुंकर मारून विझवून नविन वर्षाची सुरुवात करण्याची पाश्चात्य पद्धत आहे ...... हीच मेणबत्त्या लावण्याची पद्धत थोडी बदलली तर .......म्हणजे जेवढे वर्ष वयाचे संपले तेवढ्या मेणबत्त्या ठेवण्याऐवजी जे वर्ष सुरु होतंय तेवढया ठेवल्या तर ......फुंकर मारुंन विझवायच्या ऐवजी केक वर ठेवून पेटवल्या तर .... तर सगळेच खुश , हो न .

वाढदिवसच नाही तर अशा कितीतरी  ज्या दुसऱ्या धर्मातल्या किंवा प्रांतातल्या , देशातल्या प्रथा आहेत त्या आपण आवडल्या म्हणून आपल्या करू शकतो ......त्यात थोडेफार बदल करून ....... शेवटी प्रथा ही असते काय ......तर एखादा सोहळा , प्रसंग साजरा करण्याची पद्धत जी सारखी सारखी खूप लोकांनी  केली की ती प्रथा म्हणून ओळखल्या जाते .


वाढदिवस वर्षातून एकदा जन्मदिवशी साजरा करतात सगळे . बरोबर न  .  जन्मदिवस जरी वर्षातून एकदाच येत असला तरी वाढदिवस मात्र रोज असतो सगळ्यांचा . कसा ?  बघा ह, बाळ एक दिवसाच असतं , दुसऱ्या दिवशी 2 दिवसाच होत , मग 3 , मग 4 , अस वाढतच जात ......365 दिवसांनी एक वर्षाच होतं . बरोबर न . वाढ आपल्या सर्वांची रोजच होत असते . मग एक वर्षाने वाढदिवस साजरा करण्यामागे कारण काय असू शकेल ?

लहान बाळात होणारी वाढ , बदल हा दिवसागणिक लक्षात येतो नंतर ही वाढ हळू हळू व्हायला सुरुवात लागते . वाढ ही फक्त शारीरीकच नाही तर बौद्धिकही व्हायला सुरुवात होते .

कधी जुने फोटो जर पाहिले तर लक्षात येतो आपल्यालाही तो होणारा बदल . चेहऱ्यात  चेहऱ्यावरच्या भावात होणारा बदल , उंचीत , जाडीत  , वागण्यात होणारा बदल . कपड्यांच्या , वागण्याच्या , केसांच्या style मध्ये होणारा बदल . वाढ फक्त शरीराचीच होत नाही , तर वाढ होते   मित्रांच्या संख्येची , कराव्या लागणाऱ्या अभ्यासाची , विविध उपक्रमांची , मुलांच्या नखऱ्याची सुद्धा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विचारांची . छोटी मुलं सुरुवातीला सगळं सांगितलेलं ऐकतात नंतर सुरू होतात हट्ट ......शिंग फुटले यांना म्हणतो न आपण ...... त्यांचा मेंदू जसा जसा develop होत जातो तसे तसे ते तर विचार करतातच आणि मोठ्यांनाही विचार करायला भाग पाडतात . कधी प्रश्न विचारून तर कधी वाद घालून , कधी हट्ट करून तर कधी त्यांचे एखाद्या विषयावरचे तर्क सांगून . जो तर्क कधी सुचला नसतो ,  तो मुलांच्या सानिध्यात शिकतात आईबाबा . वाढ फक्त लहान मुलांचीच नाही तर मोठ्यांचीही होतच असते .

वाढदिवसाची लहानपणी जेवढ्या उत्साहाने वाट पहिल्या जाते तेवढी मग ती काही वर्षांनी पहिल्या जात नाही . कुठल्याही वयात वाढदिवस साजरा करायला आवडतोच मात्र मधल्या काही वर्षात हे वाट पाहणं कमी होतं . आपण मोठे होतोय , आयुष्यातली वर्ष कमी होतायत ,  अजून किती काय काय करायचं आहे , शिकायचं आहे ,  किती जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत ही जाणीव ते वाट पाहणं कमी करत . थोड्याच दिवसात लक्षात येत , अरे हा आनंद कित्ती छान आहे , मित्रांबरोबर , आपल्या लोकांबरोबर तो दिवस घालवायला किती मजा येते . बाकी सगळं तर सुरूच राहणार आहे त्यातुन मनाला विसावा म्हणजे यातल्या गंमतीचा मिळणारा आनंद. तो मनाला मिळणारा आनंद , ते समाधान परत सुरू  करतो वाढदिवस साजरे करणं .

लहानपणी कोण काय gift देईल याकडे लक्ष असत तर नंतर माझ्या लोकांच्या , मित्रांच्या वाढदिवसाला मी त्यांना कसा आनंद देऊ शकेन , तो त्यांचा दिवस मला किती सुंदर करता येईल या दृष्टीने विचार करणं सुरू होतं . कधी अचानक भेटीचा लाभ , तर कधी surprise पार्टी , कधी आवडता पदार्थ खायला करून घालणं, तर कधी कुठे तरी सहल , कधी नुसतं एकमेकांबरोबर असंख्य गप्पा , तर कधी अजून काही . पूर्वी लहानपणी आज मला काय मिळेल या विचारापासून जी सुरुवात होते ती मग आज मी काय देऊ , काय करू  माझ्या लोकांसाठी  पर्यंत जाते . हीच तर होणारी प्रत्येकाची वाढ आहे .


हाच तर खरा वाढदिवस . जो सगळ्यांचा रोज असतो . रोज भेटणाऱ्या लोकांकडून , मित्रांकडून , घरच्यांकडून , मुलांकडून तसच येणाऱ्या निरनिराळ्या प्रसंगातून आपण शिकत जातो , शरीराची वाढ तर आपोआप होत असतेच मात्र आयुष्यातले  निरनिराळे प्रसंग बुद्धीचा विकास घडवत जातात . बुद्धी जशी जशी विकसित होत जाते तसे तसे आपली विचारांवरची पकड घट्ट व्हायला लागते , विचारांना एक दिशा मिळते . विचार परिपक्व होतात , प्रगल्भ होतात . प्रगल्भ विचार मनाला  , आत्म्याला  उन्नत करायला मदत करतात .

शरीराची वाढ होते ,  बुद्धी विकसित  होते ,
विचार प्रगल्भ होतात आणि  आत्मा उन्नत होतो.

 ज्या ज्या दिवशी मनाला आतून अगदी मनापासून आनंद होईल ,  शांतता मिळेल , समाधान वाटेल तो तो दिवस वाढदिवस , तोच उत्सव .

आपल्या सर्वांना असे वाढदिवस  नेहमी अनुभवता येवो हीच मनीषा .


Saturday, 5 October 2019

खोकला

खोकला


सर्दी आणि खोकला दोघ मित्रच . एकमेकांना सोडून फारसे राहत नाहीत . फरक एवढाच की सर्दीचा त्रास फक्त ज्याला झालीय त्याला होतो मात्र खोकला हा सर्वांना त्रास देतो . ज्याला झालाय त्यालाही आणि ऐकणाऱ्यांलाही ...........दोन्ही साठी रुमाल हातात तयार असावा लागतो ........ जागा मात्र वेगवेगळ्या .

असं म्हणतात की जेव्हा आपण एकटे असतांना कधी हार्ट अटॅक येतोय अस जाणवलं तर खोकलण हा एक त्यावरचा तात्पुरता उपाय आहे .

आता भीती तर वाटत नाहीये न तुम्हाला की खोकल्यावरचे घरगुती उपाय मी सांगेन म्हणून?

खोकला हा काय ब्लॉग लिहिण्याचा विषय आहे  ? नसेलही कदाचित पण सध्या खोकला झालाय मला त्यामुळे तोच विषय म्हणून डोक्यात आला .

 सांगा बर  , खोकला ही एक कला आहे असं नाही वाटत  का तुम्हाला ?

छोटा नातू , आजोबा कसे खो करतात हे करून जेव्हा दाखवतो तेव्हा आजोबा सुद्धा न येणारा खोकला ,  आला आहे असं दाखवून परत खोकलतात आणि हसतात . त्यांची आणि नातवाच्या खोकलण्याची कला ते एकमेकांसमोर सादर करत दोघंही आनंद घेत राहतात आणि असेल आजी , आई , बाबा कुणी अजून तिथे तर सगळेच या खो कलेचा  आनंद घेतात .

कुठे बाहेर गेलो असताना , कुठल्या लग्नात , कार्यात किंवा अजून कुठे जर कुणाचं लक्ष वेधून घ्यायचं असेल तेव्हाही ही खो कलाच कामात येते . येते न ?

कधी फोन वर बोलतांना थोडा वेळ हवा असेल विचार करून उत्तर द्यायला ,त्यावेळीही ही खो कला त्यात  मदत करते . कधी ऐकू आलं नाही हे दाखवायला सुद्धा ही खो कलाच मदतीला घेता येते .....त्याच क्षणाला एकदम जोरात खो कला सादर होते. फोन वर बोलणं थांबवायचं असेल तेव्हाही हीच खो कलेची उबळ पटकन प्रात्यक्षिक देते .

लहान मुलांना शाळेत जायचं नसेल तर पोटदुखी सारखच सांगता येणार हे एक हंमखास पचनी पडणार कारण . सकाळी उठल्यावर खो कला सादर केली की लगेच आई कपाळाला हात लावून बघते , मग थोडी कला अजून सादर केली हात गळ्यावर ठेवून , घसा दुखतोय अस दाखवलं की मोहीम फत्ते झालीच म्हणून समजा . अर्थात ती पण आईच असते , त्यामुळे तिच्या मुलाला ती छान ओळखत असते . खो कला जर या आधी सादर झाली असेल तर लगेच मोहीम फत्ते होत नाही .  काही दुसरा गनिमी कावा करावा लागतो . इतर कुणालाही खो कला फसवू शकते पण आईला नाही . काय ? बरोबर न .

हीच खो कला घरून ऑफिस मध्ये फोन करून , आज ऑफिसला यायला जमणार नाही हे सांगताना सादर करण ही तर आयुष्य जगण्याची एक आवश्यक कला होऊन जाते . हो , सुट्टी मिळणार कधी आणि कशी ? काम तर टेबल वर अमाप असतात , संपता संपत नाहीत , मग हीच कला अशावेळी आधार देते.
बरोबर न . काम आणि आयुष्य यांचा समतोल राखणं आजकाल फार कठीण होत जातंय , कदाचित सगळ्याच गोष्टींचा वेग फार वाढलाय , मग कुठेतरी सुट्टी नावाचा ब्रेक लावला की वेगावर नियंत्रण ठेवायला मदत होते . हो न .

खाकरण हे खोकल्याच पिल्लू .....काही लोकांना सारखं मध्ये मध्ये खांकरण्याची सवय असते . अस करण्यामागे कधी त्यांना होणारा त्रासही असू शकतो तर कधी लक्ष वेधून घेणं हेही असतं , कधी कधी जाणवतं ते   प्रामुख्याने तिथे असणाऱ्या लोकांना स्वतःच्या असण्याची , अस्तित्वाची जाणीव करून दयायचा प्रयत्न करत असतात . घरीसुद्धा कधी कधी आजोबा , बाबा किंवा कुणी वडीलधारी मंडळी मी घरी आलो हे सांगायला हा खाकरण्याचा मार्ग अवलंबतात , मग लगेच आजी किंवा कुणी त्यांना पाणी द्यायला जातात . दिसत न हे चित्र घराघरात . म्हणून तर मला वाटतं की ही एक कला आहे जी खूप वेळा , खूप ठिकाणी , निरनिराळ्या कारणांसाठी सादर केली जाते .

भाषण देतांना , कधी वादविवाद स्पर्धा सुरू असताना , तर कधी एखादया मीटिंग मध्ये विचारलेल्या प्रश्नावर उत्तर द्यायच्या आधी थोडा विचार करायला वेळ घ्यायचा असेल त्यावेळीही ही खो कला मदत करते . पाणी पिता पिता थोडा विचार करायला वेळही मिळतो आणि काय बोलायचं हेही ठरवता येत, बरोबर न ? आपल्या पैकी पुष्कळांना या कलेने कधी न कधी नक्की मदत केली असेल.

आधी रणांगणावर मावळे लढायला जातात , त्यानंतर  थोडे मोठे सरदार , मग अजून मातब्बर सरदार ,  त्यानंतर मग शेवटी  राजा . अशी चढती , उतरती भाजणी कुठल्याही क्षेत्रात असते , मग ते कुठलंही ऑफिस का असेना . तसच ही खो कला सादर करतानाही असाच चढता क्रम वापरण्यात येतो , आधी खाकरण , मग साधा खो खो , मग थोडा मोठा आणि शेवटी खो कलेची उबळ .

असा हा की ही ...... खो कला .......केव्हाही , कुठेही , कधीही आपल्या दिमतीला हजर राहून आपलं उद्दिष्ट साध्य करायला नेहमी तत्पर राहो हीच मनीषा .



Sunday, 29 September 2019

खोगीर

खोगीर

परवा घरासमोरून एक माणूस उंट घेऊन चालला होता . एक छोट्या मुलाला उंटावर बसून चक्कर मारायची होती .  त्याला वर बसवण्यासाठी  त्या उंटाला त्या माणसाने खाली बसवलं आणि उंटाच्या पाठीवर त्या मुलाला बसवलं , पण जसा तो उंट उठायला गेला , तो मुलगा बुदूक पडला. आधी रडला मग परत बसला आणि यावेळी त्याने ती दोरी घट्ट धरली जशी त्या उंट आणणाऱ्या माणसाने सांगितलं तशी . खूप हसत आला छान चक्कर मारून . तो माणूस म्हणाला खोगीर थोडं मोठं आहे न म्हणून हा आधी नीट बसू शकला नाही . .....तो उंट आणि माणूस तर गेले पण हा खोगीर शब्द खूप दिवसांनी ऐकल्यावर माझ्या मनात मात्र घर करून राहिला .

खोगीर म्हणजे घोड्याच्या , उंटाच्या किंवा कुठल्या प्राण्यांच्या पाठीवर घालण्याचे जीन....बरोबर  .....हा शब्द आता जास्त वापरल्या जात नाही .......खोगीर हा शब्द ज्यावेळी प्राण्यांवरून प्रवास करायचे तेव्हा जास्त वापरात होता ......जसे जसे माणूस इंजिन वर चालणाऱ्या वाहनांकडे येत गेला तसे तसे खोगीर हा शब्द मागे पडला ......... आजकाल याचा शब्दप्रयोग फार तर खोगीरभरती इतपत केला जातो........खोगिरभरती म्हणजे नुसत भरलेलं सामान  ज्याची फार कमी वेळा गरज  पडणार आहे ....नुसता भरणा जो कधी कधी नकली किंवा रद्दी असतो ...... जशी कधीकधी एखादया खात्यात  लोकांची भरती  केली जाते ,  त्यावेळी फक्त त्या रिकाम्या जागा भरणं एवढंच उद्दिष्ट असतं .......त्या लोकांची कुवत किंवा क्षमता पाहिल्या जात नाही  . त्यामुळे खात्यातली काम करणार कोणीच नसल्यामुळे काम रखडतात , अशावेळी  हा शब्दप्रयोग नेहमी केल्या जातो .......कोणाला कामच येत नाही इथे , सगळी खोगीरभरती दिसतेय ....... बरोबर न .

खोगीर चा इंग्लिश समानार्थी शब्द  saddle  ......या  भाषेत मात्र खोगीर चा अर्थ फ़क्त प्राण्यांच्या पाठीवरच खोगीर , जीन एवढाच होत नाही तर saddle शब्दाचा अर्थ एखाद्याला कशात तरी अडकवणं , कशाने तरी बांधून ठेवणं , गळ्यात लोढणं टाकणं , काही काम गळ्यात घालणं  किंवा दोषी ठरवणं असाही केल्या जातो .


खोगीर चा इंग्लिश मध्ये अजून एक समानार्थी शब्द आहे  pillion ........हा शब्द जर वापरला तर अजून निराळा अर्थ निघतो यातून .........साधं पाहिलं तर दोन चाकी गाडीवर चालकाच्या मागे बसण्याची जागा .........हेच जर कार किंवा अजून कुठल्या दुसऱ्या मोठ्या वाहनात बसलो तर passenger seat म्हणू आपण यालाच .....बरोबर न .....अशा एकाच वाहनात या passenger सीट एकापेक्षा जास्त असतात .......मात्र जरा अजून विचार केला तर लक्षात येत की pillon  किंवा पॅसेंंजर सीट वर बसणारी व्यक्ती ही परावलंबी असते जस चालक वाहन चालवेल तस जावं  लागतं ........सगळे कंट्रोल हे चालकाच्या हातात असतात ........म्हणजे अगदी समोर येणारी दुसरी गाडी किंवा गड्डा जरी दिसत असला तरी ती व्यक्ती ते चालकाला सांगू शकते पण ते टाळण मात्र चालकच करू शकतो ........समोर स्पीड ब्रेकर दिसला तरी गाडी स्लो चालकाने केली तरच हळू धक्का लागतो नाहीतर मस्त उडते pillion वरची व्यक्ती ........क्वचित अपघातही होतात .......ते टाळण्यासाठी गाडी हळू चालवणं , हेल्मेट  घालणं हे उपाय आहेत तरी स्वतः गाडी चालवणं हा त्यावरचा अजून एक उपाय , बरोबर न ......आता साधंच उदाहरण पहा जेव्हा आपण गाडीत कुणाच्या बाजूला किंवा मागे बसतो त्यावेळी आपलं  लक्ष सारखं कोण कुठून येतंय .....काय करायला हवं याकडेच असतं  ....अथवा ब्रेक लाव , हळू कर स्पीड असे सारखे  सल्ले देत राहते बाजूला बसलेली व्यक्ती चालकाला आणि  अस्वस्थ होते.......अशावेळी चालक हा नवरा आणि बाजूला बसलेली बायको असेल तर मग .......त्या वेळी जे मजेदार संवाद होतात ते लिहिले तर रस्ताच बदलेल आत्तापर्यंत लिहिलं त्याचा ....असो..........चालकांवर विश्वास ठेवून शांतही बसतो  आपण किंवा बस , ट्रेन मधून जातांना काहीच करू शकत नाही म्हणूनही शांत बसतो ......कधी कधी चालकांवर आपला तेवढा विश्वास असतो म्हणूनही निर्धास्त असतो .......मात्र ज्यावेळी चालकावर तेवढा विश्वास नसतो , रस्ता नीट नसतो , आपल्याला त्यावरचे गड्डे , स्पीड ब्रेकर दिसत असतात .....धक्के लागत  असतात त्यावेळी आपली  काळजी वाढत जातेच त्याबरोबर अस्वस्थता सुद्धा .......अशावेळी कधीकधी आपण स्वतः चालवायला बसतो गाडी आणि मग समोर येणारे गड्डे , अडथळे , स्पीड ब्रेकर हे छोटे वाटायला लागतात , त्यातून लीलया गाडी चालवत जातो आपण .......त्यावेळी बसणारे धक्के सुध्दा तेवढे जाणवत नाही .  स्पीड पण त्या रस्त्यासाठी perfect आहे असं वाटत आणि आपण हा रस्ता नीट पार करू असा विश्वास  वाटतो .....हो न .......हे केव्हा तर आपण जेव्हा चालक होतो तेव्हा ........याच कारण एकच ..... आपला स्वतः वरचा विश्वास. असच तर होतं न आयुष्यात सुद्धा , जोपर्यंत निर्णय घेणारा दुसरा असतो , आपण त्या व्यक्तीच्या मागे जात राहतो त्यावेळी जास्त काळजी वाटते ....... जस जसे आपण आपल्या आयुष्यं चे चालक होतो .......निर्णय घेतो ......पडलो तरी आपली जबाबदारी समजून दुसऱ्या कुणाला दोष न देता परत उठतो ......तो विश्वासच या रस्त्यावरून न डगमगता जाण्याचं धैर्य देखील देतो. हे धैर्य आणि  स्वतःवरचा  विश्वास मिळवण्यासाठी सुरुवातीला एखाद्या कुशल चालकाच्या  मागे pillion वर बसून चांगला चालक कसं होता येईल याचं प्रशिक्षणही घ्यायला हवं  .

आपण सर्व कुठेही स्वतःची खोगिरभरती होऊ न देता , कुणाचं saddle न होता ,  pillion वर नेहमी बसून न राहता , स्वतः प्रयत्नशील राहून , गरज पडल्यास कधी कुशल चालकाची मदत घेऊन नंतर स्वतः , स्वतःच्या आयुष्याचे चालक होऊन
 हा आयुष्याचा रस्ता निर्भयपणे , धैर्याने विश्वासाने पार पाडू हीच मनीषा ...



#खोगिरभरती

Sunday, 22 September 2019

पूजा

पूजा

श्रावण संपला , महालक्ष्मी , गणपती सगळं आटोपल ......आज शांत बसले असतांना सहज विचार आला मनात ,  पूज्य भावनेने केली जाते ती पूजा , बरोबर ? तरीही .........आपण कुठलीही पूजा का करतो ? गणपती . , सत्यनारायण असो किंवा ऑफिस मधली दिवाळीतली लक्ष्मीपूजा असो ........एक get together  करायचं म्हणून ......  पूजा करायची परंपरा आहे म्हणून ..... सगळेच करतात म्हणून ..... पूजा केल्याने आपल्याला देव प्रसन्न होईल  म्हणून ....... आपल्या आयुष्यातली संकट संपावीत म्हणून .........सगळ्या समस्यांवर उपाय सुचेल , किंवा सापडेल म्हणून......संकट , समस्या येऊच नयेत म्हणून .........की अजून काही .

पूर्वीच्या आपल्या सगळ्यांच्या पूर्वजांनी .......मग तो कुठलाही धर्म असो .......ती का सुरु केली असावी ........पूजेला , प्रार्थनेला  वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळी नाव आहेत .....अस असलं तरी
 नीट जर पाहिलं तर सगळ्या पूजा , प्रार्थना या थोड्याफार फरकाने  सारख्या आहेत .

पहिली समानता म्हणजे कुठल्याही धर्मात  पूजा किंवा प्रार्थना करतांना सजावट करतात ......कुठे फुलांची , पानांची तर कुठे दिव्यांची , कुठे मेणबत्ती तर कुठे रंगीत सुंदर तलम झालर असलेल्या कापडाची तर कुठे अजून कशाची .

दुसरी अजून एक समान बाब म्हणजे कुठलीही पूजा करतांना गाणी म्हंटतात . त्या त्या धर्मात त्या त्या धर्माच्या संतांनी  शब्दबद्ध केलेली गाणी . ज्यांना कुणी स्तोत्र मंत्र म्हणत कुणी नमाज , तर कुणी नुसतं प्रार्थना ,  carol तर कुणी अजून काही . शीख , इसाई , मुस्लिम लोकांमध्ये तर  वेळेनुसार प्रार्थनेला नाव सुद्धा वेगळी आहेत .  एक मात्र नक्की की कुठल्याही धर्मात कुठल्याही वेळी प्रार्थना , पूजा करतांना काहीतरी म्हणतच ती करतात .

पूजा कशी करावी हे सांगण्या करता गुरुजी , मौलवी , फादर , भन्ते असे धर्मगुरू असतात . ते सांगतील तशी पूजा केली जाते . हे अजून एक साम्य .

या मागे नक्की असे प्रयोजन काय असावे .

घरी रोज जी पूजा , प्रार्थना केली जाते त्यातही हे सगळं जमेल तसं केलं जातं , फक्त ते आपण एकटे करतो , कधी कामाला जायचं असल्याने वेळ कमी असतो आणि प्रत्येकाची प्रार्थना करायची पद्धत त्या व्यक्तीला असलेल्या वेळेनुसार , वयानुसार , त्या त्या व्यक्तीच्या समजुतीनुसार आणि विश्वासाप्रमाणे बदलत जाते .

लहानपणी आई बाबांनी जे कर म्हंटलं ते केलं जातं.........नंतर हळूहळू ती व्यक्ती  स्वतःला जमेल आणि पटेल तसे त्यात बदल करते ......कोणी घरी 5 , 10 , 15 मिनटं ,  1/2 तास बसून पूजा  , प्रार्थना करेल तर कुणी रोज देवळात चर्च, मस्जिद , गुरुद्वारा त जाईल . कुणी नुसता नमस्कार करेल , तर कुणी दिवा लावेल , कुणी आरती करेल,  कुणी फक्त फुल वाहील तर कुणी अजून काही.......कुणी नमस्कार खूप वेळ करेल तर कुणी पटकन एखादा salute मारल्यासारखा , कुणी साष्टांग नमस्कार  , कुणी शांतपणे त्या वास्तूत डोळे बंद करून ध्यान करत बसेल . याचाच अर्थ पूजा कशी ,कधी, केव्हा , कितीवेळ , कितीवेळा ,  कुठे करायची हे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे , तरी हा प्रश्न उरतोच की हे का सुरु झालं असावं .

पूजा मोठ्या प्रमाणात करतांना नातेवाईक , शेजारी लोकांना बोलावलं जात त्यामागे घरातील लहान मोठ्या सर्वांनी एकत्र यावं , आजूबाजूच्या लोकांबरोबर संपर्क वाढवा , मैत्री व्हावी हा हेतू आहे असं जरी मानलं तरी तो तेवढाच होता का ?

पूजा , प्रार्थना करतांना मग ती कुठल्याही धर्माची असो ......त्यात तुम्ही मानता त्या देवाच , गुरूंच , त्या शक्तीच स्मरण करणं हे अपेक्षित असतं .   हिंदु धर्मात देवाला निर्गुण , निराकार संबोधलं गेलं आहे तरी देवांना नाव आहेत निरनिराळी , समोर मूर्ती किंवा नाव असेल तर स्मरण करणं सोपं जातं म्हणून असेल कदाचित . कुणी त्याला ईश म्हणेल , कुणी अल्ला , कुणी वाहे गुरू तर कुणी अजून काही . आपल्याला  कुणाची आठवण ही तर अशीच नाव ऐकल की येते  न .

डोळे बंद करणं हे मन एकाग्र करण्यासाठी असावं . लक्ष विचलित झालं तर स्मरण करणं कठीण जातं . हे सगळं जरी केलं तरी आपले कान , ते ही तर लक्ष विचलित करतात , तसच आजूबाजूला चाललेली चर्चा ......अगदी कुठेतरी दूर रेल्वे ची होणारी announcement सुद्धा ऐकू येते आपल्याला शांत पहाटे.....म्हणूनच कदाचित हा स्तोत्र , गाणी म्हणण्याचा  उपाय तर नसेल त्यावरचा ?


अजून थोडा विचार केला तर असं लक्षात येत की साधं झाडाची फुल गोळा करतांना , दुर्वा तोडतांना दुसरा कुठलाच विचार ती व्यक्ती त्यावेळी करत नसते ......गम्मत म्हणजे एखादे आजोबा किंवा आजी जेव्हा फुल तोडतात तेव्हा ते कधी कधी  एखाद्या दगडावर चढून किंवा भिंतीवरून वाकून त्या फुला पर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतात स्वतःच वय विसरून . सजावट करतांना , फुल रचून ठेवतांना ,  रांगोळी काढतांना , फुलांचा हार करतांना किंवा अजून कुठल्याही प्रकारची सजावट करतांना एक प्रकारचा सात्विक आनंद मिळतो .

 आपण नेहमी पाहतो पूजा , प्रार्थना खूप प्रकारचे लोक तर करतातच पण खूप प्रकारांनी ही ती केल्या जाते .

एकाच घरात , देवळात किंवा अजून कुठे .........एका पेक्षा जास्त लोकांनी एका वेळी प्रार्थना , पूजा जरी केली तरीही प्रत्येकाला आलेले अनुभव , अगदी सारख्या प्रकारच्या  समस्यांवर सुचलेले उपाय  हे ही वेगवेगळे असतात. ते कसे आणि का ?

प्रार्थना करतांना काही स्तोत्र , गाणी किंवा अजून काही लयीत म्हणतांना किंवा कुणी म्हंटलेलं ऐकतांना , एकट्याने अथवा सामूहिक पूजा करतांना मन एकाग्र होत , शांत वाटतं , त्यावेळेपुरत का होईना पण कुठेतरी आतपर्यंत मनातली खळबळ शांत झाल्यासारखं वाटतं . कधी कधी आधी कधी न सुचलेला विचार मनात येऊन मनाला सुखावून जातो . स्वतःच मन शांत करणं हा तर पूजा , प्रार्थना करण्यामागचा हेतू नसेल ?

तरीही अजून एक विचार मनात येतोय .....


अस म्हणतात , जस जेवण तसे विचार . तसंच आपण आजपर्यंत खूपदा वाचलंय जसे  विचार असतील , जशी संगत असेल  तस आयुष्यात घडतं  ,  विचार चांगले असण्यासाठी चांगलं वाचन ,  संगत ,  आचरण ,  जेवण हे आचरणात आणलं तर चांगली कृती करण्याकडे त्या व्यक्तीचा मानसिक कल असेल   आणि  जर वाईट विचार केले , वाईट संगतीत राहील तर तशी कृती करण्याकडे त्या व्यक्तीच्या मनाचा कल  राहिल . बरोबर ?  तर मग वाईट विचार करणारे , वाईट संगतीत असणारे , वाईट कर्म करणारे , हेही तर पूजा करतात . ते का ?


अस म्हणतात शांत मनाने घेतलेले निर्णय सहसा चुकत नाहीत ,  ते वाईट असोत अथवा चांगले .
ते  कसे असावेत आणि का ? हा अजून एक चर्चेचा विषय आहे , असो .

पूजा, प्रार्थना करण्यामागे  मन सबळ करणं , शांत,  एकाग्र करणं हा विचार जर असेल  कदाचित. मन सहजपणे एकाग्र , शांत होत नाही . त्यासाठी  सजावटी पासून ते खूप जणांनी मिळून एकत्र प्रार्थना करण्याचे  विविध उपाय तर सुरू झाले नसतील ? आज पर्यंतच्या झालेल्या संशोधनात मनाच्या वेगापेक्षा कशाचाही वेग जास्त आढळलेला नाही .........मनाच्या वारूला आवरण्याचा ,  त्याला  नियंत्रणात ठेवण्याचा किंवा काही वेळा त्याला अनिर्बंध करून हवे तसे धावू देण्याचा अथवा शांत करण्याचा , समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यासाठी तर पूजा प्रार्थना करणं सुरु झालं नसेल ?

काय वाटतं तुम्हाला ?

Sunday, 15 September 2019

लपंडाव

लपंडाव

लपंडाव हा बालपणी चा खेळलेला पहिला खेळ .......अगदी 3 , 4 महिन्याच्या छोट्या बाळाला कळणारा आणि आनंद देणारा. त्याचा किंवा आपला चेहरा यावर  पदर , ओढणी किंवा रुमाल ठेवला अगदी हात जरी ठेवला की  तो ते बाजूला करणार आणि आपला चेहरा दिसल्यावर ,  त्याच्या चेहऱ्यावर जो निरागस आनंद दिसतो तो केवळ अवर्णनीय .....तसच पडद्याच्या , दाराच्या किंवा भिंतीच्या मागे उभ राहून त्या बाळाकडे पाहून मग परत दारामागे जाणं .....खूप हसत ते बाळ आणि आपण परत कधी तस करतो याची वाट बघत .......अस तर कधी कधी एखाद्या अनोळखी बाळा बरोबर ही करतो आपण कुठे कधी एखाद्या लग्नात , हॉटेल मध्ये , प्रवासात .....वा मजा येते न असा लपंडाव खेळायला .

जसे जसे मग मुलं चालायला शिकतात तस मग आधी घरात नंतर बाहेर अंगणात मग कॉलनीत हा लपंडाव खेळू लागतात ...त्याच्या कक्षा रुंदवतात .......आधी लिंबोणीच्या झाडेमागे खरच चांदोबा लपलाय का हे आईबरोबर शोधायला जाणार बाळ त्याच आईबरोबर लपंडाव खेळून तिला बेजार करू लागत ......कधी लपंडाव खेळतांना तीचा आडोसा म्हणून उपयोग सुद्धा करू लागत जसं कधी मित्रांबरोबर movie ला किंवा  बाहेर जायचं असलं की आईच्या मागे लपून बाबांची परवानगी घ्यायला .

तसं पाहिलं तर लपंडाव हा साधा खेळ . लपलेल किंवा लपवलेलं  शोधण्याचा . तो खरंच कित्ती प्रकारे खेळता येतो . लपाछपी ही घरात , बाहेर तर खेळता येतेच तशी ती वस्तूंची ही करता येते ......मला आठवतं लहानपणी दिवाळीच्या वेळी थोडा फराळ आई नेहमी लपवून ठेवायची..... कुणी पाहुणे एकदम आले तर द्यायला ...... कारण आम्हाला सुट्या असल्याने दिवसभर आमचा फराळ सुरूच असायचा आणि कुणी आलं तर वेळेवर आईची पंचाईत व्हायची . प्रत्येक घरात आई  कुठे कुठे पैसेही लपवून ठेवते . ते कधी कधी कुठेतरी अनपेक्षित जागी आपल्यालाही सापडतात . आता आठवले ते प्रसंग की आईच्या त्या अदृश्य बँकेची कमाल तर वाटतेच तसाच तिचा अभिमानही वाटतो कारण हीच तिची बँक वेळोवेळी जेव्हा कधी पैशांची गरज पडते तेव्हा कामात येते .

लपंडाव हा सुरूच असतो मोठं झालं तरी ...... मित्रांबरोबर तर खेळल्या जातोच हा खेळ . आपण सगळे कुणाबरोबर तरी  एरवी देखील खेळत असतो लपंडाव ....कधी homework झालं नसेल तर शिक्षकांबरोबर , त्यांना आपण दिसणार नाही अशा प्रकारे वर्गात बसायचा  प्रयत्न करतो न ......कधी एखादा एखादा विषय नीट कळत नसेल , आवडत नसेल तर त्या विषयाबरोबर सुदधा लपंडाव खेळतो आपण , ते पुस्तक नजरेआड ठेवून  किंवा वर्गात लक्ष आहे हे भासवून दुसरंच काहीतरी करत राहतो आपण कारण जे शिक्षक शिकवत असतात ते कळत नसतं आणि कधी कधी ते सांगायला लाज वाटते किंवा भीती तर कधी हिम्मत होत नाही  .....हो न. अशा वेळी जर त्या शिक्षकांना आपण सापडलो तर मग काही खैर नसते ..... त्यावेळी वाटत न आपण लपुन जावं किंवा अदृश्य तरी व्हावं आणि सापडूच नये क्लास संपेपर्यंत तरी . असो .

चोर पोलिसांचा लपंडाव नेहमीच सुरू असतो . त्या लपंडावाच्या खेळात चोराला पकडायला बाकी लोक , कधी सापडलेल्या वस्तू , तर कधी चोरी झालेल्या वस्तूही पोलीसांना मदत करतात. त्यात कधी पोलीस लपलेल्या चोराला पकडण्यात यशस्वी होतात कधी नाही . हा खेळ थोडा वेगळा , थोडा सारखा .

लपंडाव बघा कसा खेळल्या जातो , घरातले मोठे लहानांपासून त्यांच्यातले वाद लपवतात . आईबाबा त्यांना असणाऱ्या काळज्या मुलांपासून लपवतात . मुलं कधी कधी घरच्यांपासून त्यांना शाळेत मिळालेली बोलणी , किंवा दिलेली ताकीद लपवतात .......होते तरीही कधी छोटी मिटिंग , आई बाबा आणि शिक्षकांची . काय आहे न  कधीतरी लपवलेलं सापडतच .


मोठे होत गेलो की लपंडाव खेळण्याची पध्दत आणि खेळाडू बदलत जातात .....मनात एक असत , ते लपवून दुसरच काही बोलणं शिकतो आपण ......कधी समोरच्या व्यक्तीला आवडणार नाही म्हणून, कधी वाईट वाटेल , कधी त्या व्यक्तीची काळजी घ्यायची म्हणून तर कधी त्या व्यक्तीची भीती वाटते म्हणून , होतं न अस . हा विचारांचा लपंडाव  असतो  .

जसा आपण दुसऱ्यांबरोबर लपंडाव खेळत असतो तसेच दुसरेही आपल्याबरोबर लपंडाव खेळत असतात .....कधी ते कळत , कधी नाही . आपल्यापासून ही काही गोष्टी , वस्तू दुसरे लपवून ठेवतात , त्याचे विचार लपवतात . ते शोधून त्या व्यक्तीला ओळखणं , परखणं हा सुद्धा एक लपंडावाचा खेळच .....हा पुढे नेहमीच खेळावा लागतो आणि त्यात कौशल्य जर मिळवलं तर पाठीवर धप्पा देऊन दुसऱ्याला आश्चर्यचकित करता येतं .

सगळ्यात जास्त जर कशाचा लपंडाव खेळल्या जात असेल तर तो आहे भावनांचा आणि विचारांचा .......कितीही काळजीत असली व्यक्ती तरी बाहेर तिला ते दाखवणं खूपदा शक्य नसतं .....ज्यांच्या समोर ती काळजी लपवायची गरज नाही असे लोक आजकाल फार कमी वेळा जवळ असतात ......त्यामुळे मग कोणी , कसा आहे विचारलं की मस्त ...असच उत्तर दिल्या जात . कधी कुठल्या , कुणाच्या आनंदाच्या प्रसंगात स्वतःला झालेलं दुःख लपवल्या जातं तर कधी याच्या उलट ही होतं .....कधी आपण लपवतो तर कधी दुसरे . ती व्यक्ती जर जवळचा मित्र अथवा नातेवाईक असेल तर हे जेव्हा कधी त्याला किंवा आपल्याला कळत तेव्हा हक्काने एकमेकांना रागवल्या जातं ..... असे ऋणानुबंध असणं फार भाग्याच .....कधी कुणापासून त्याच आजारपण लपवल्या जात तर कधी अजून काही . काही वेळेला एखाद्या व्यक्तीबद्दल म्हंटल्या जातं की या व्यक्तीच आयुष्य हे "खुली 'किताब" आहे ......अस दुसऱ्यांनी म्हणणं हेच महत्वाचे .

 विचार आणि भावनांचे लपंडाव खेळता खेळता नंतर कधी कधी या खेळाचा कंटाळा यायला लागतो . असं वाटत आता बस्स . आता सगळे बाहेर या . कुणीही लपू नका आणि काहीही  लपवू पण नका . सगळे छान एकत्र बसु , गप्पा मारू , एकमेकांना मनातलं सगळं सांगू . सुख वाटलं की वाढत आणि  दुःख वाटलं की कमी होत जे म्हणतात त्याचा अनुभव घेऊ . ऊन पावसाचा लपंडाव जसा पावसाळ्यात सुरू असतो तसा सुख दुःखाचा आयुष्यात . आपण सर्वच जमेल तेव्हा दुःखाला लपवून सुखाला शोधायचा प्रयत्न करू आणि  दुःखाला पाठीवर धप्पा देऊन आश्चर्यचकित करण्यात यशस्वी होऊ हिच मनीषा .


#लपंडाव

Sunday, 8 September 2019

प्रवास

प्रवास


प्रवास शब्द जरा जड वाटतो न ......म्हणजे पहा ....भटकंती म्हंटल की मजेशीर किंवा उत्साहपूर्ण वाटत पण प्रवास शब्दात एक वजन आहे ......गावाला पोहोचल्यावर किंवा परत आल्यावर जेव्हा कुणी विचारत .....कसा झाला प्रवास .....या एका वाक्यात सगळं येतं म्हणजे अगदी बसायला जागा मिळाली का पासून  ते थेट थकले तर नाही न , काही त्रास तर झाला नाही पासून ते अगदी जेवण नीट झालं न पर्यंत .

आता प्रवास म्हटला की , तो  कधी बस तर कधी आगगाडी तर कधी विमानाने होतो......पूर्वी पायी प्रवास करत तेव्हाचे परत आल्यानंतरचे प्रश्न वेगळे असत  . पायी प्रवास हा कितीतरी दिवस होत असे . त्यात येणाऱ्या अडचणी वेगळ्या असत .....मग झाले प्राण्यावरून प्रवास सुरु ....नंतर जहाज  , बोटी आणि आज विमानापर्यंत मानव येऊन पोहोचला आहे .....आता तर अंतराळात प्रवासाचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे . भारताचे चंद्रायान चंद्रावर पोहोचले. अजून मोठा पल्ला गाठायचा आहे .....तोही होईल .  यावर लिहिलं तर लेखाच्या प्रवासाची दिशा बदलेल.

लहानपणी प्रवास म्हंटल की मजा वाटायची . कुठेतरी जायला मिळणार यातच खूप आनंद व्हायचा . आपण कसे जाणार पासून ,  काय तयारी करायची ,  कशी ..... केव्हा पासून तयारीला सुरुवात करायची यात सगळे अगदी मनापासून हिरीरीने भाग घ्यायचे . ते सगळं ठरवताना सुद्धा एक प्रकारची मजा यायची . हळूहळू जसे आपण मोठे होत गेलो तसे मात्र या प्रवासाचे संदर्भ बदलत गेले.....लहानपणी सुट्ट्यांमध्ये मजेसाठी प्रवास करणारे आपण आधी शिक्षणासाठी आणि नंतर नोकरीसाठी प्रवास करू लागलो आणि मग तो प्रवास म्हणजे मजा हे वाटणं हळूहळू कमी व्हायला लागल आणि हाच जर मुंबईच्या लोकल मधला रोजचा प्रवास असेल तर ......तर तो एखाद दिवशी काही कारणामुळे केला नाही तर जास्त बरं वाटत . त्यातही काही जणांना छान मित्र मिळतात या प्रवासात ......अगदी 2 स्टेशन पर्यंत भेटणारे , किंवा एखाद्या स्टेशन वर किंवा कधी एखाद्या वेळेच्या ट्रेन मध्ये भेटणारे.....कधी कधी तर त्यांची फक्त तोंड ओळख असते पण भेटलं की छान वाटत .......काही जण मात्र अशा प्रवासात देखील भजन गाणी गाऊन .....अशा लोकांचा एक छान ग्रुप तयार करून त्यातही आनंदी राहतात आणि तो प्रवास स्वतःबरोबर दुसऱ्यांचाही तेवढाच आनंदी करतात .

प्रवास हा फक्त वाहनानेच होतो का ? प्रवास हा खूपदा मनाने  करून त्यात सुदधा आनंदी होतो माणूस . बघा तुमचं लहानपण आठवा . त्यावेळी atlas वर वेगवेगळ्या जागा शोधण्याचा खेळ खेळतांना कधी कधी समुद्रातून , पहाड , डोंगरातून , दऱ्यांमधून , नद्यांमधून , रस्त्यांवरून आपल्या बोटांनी केलेला प्रवास........आठवला ? किती वेळा असा प्रवास लहानपणी केलाय. कधीकधी तर अगदी या गावातून त्या गावात ......जिथे जिथे आपले कुणी काका , मामा किंवा अजून कुणी आहे म्हणून तर कधी अगदी कुठे काय छान मिळत , कुठे कशाचा कारखाना आहे हे भूगोलात वाचल्यामुळे वाटणारी उत्सुकता तर कधी कुठे असणाऱ्या सुंदर निसर्गाच्या सानिध्यात जावसं वाटल्यामुळे ते पाहण्याची तीव्र इच्छा ......असा पूर्ण जगाचा प्रवास हा मनाने आणि बोटाने मित्र मैत्रिणी बरोबर कितीतरी वेळा atlas वर लहानपणी केला असेल सगळ्यांनी  ......यातलं वाहन आपलं मन असत , ते बोट आणि मित्र धरून छान प्रवास करून येतं ....काय आठवलं का ?  भूगोल हा विषय फक्त यासाठी च तर जास्त आठवतो .

प्रवास आणि वेग हे दोन शब्द हातात हात घालूनच फिरतात...... मित्रांसारखे . कुठलाही प्रवास असो त्याला वेग हा असतोच , मग तो बैलगाडीतला असो की space shuttle मधला , तरी सगळ्यात जास्त वेग मात्र मनाने केलेल्या प्रवासात असतो .....घरापासून ते चंद्रापर्यंत पोहोचायला एक क्षण पुरेसा असतो .

प्रत्येक प्रवासाला वेग असला तरी तो निरनिराळा असतोच . कुणी पायी येणार असेल तर त्या व्यक्तीला यायला वेळ लागेल हे आपण गृहीत धरतो ....कुणी आगगाडीने , विमानाने किंवा अजून कशाने येणार असेल तर त्या त्या वाहनांनुसार  त्या व्यक्तीला पोहोचायला किती वेळ लागेल हा अंदाज आपण बांधतो . तो अंदाज नेहमी बरोबर येतोच अस मात्र नाही कारण प्रवासात येणाऱ्या आणि माहिती नसणाऱ्या अडचणी , कधी traffic jam तर कधी पाऊस तर कधी अजून काही . हे आराखडे कधी कधी चुकतात.  ते स्वीकारून पुढे जातो माणूस .

थोडा  अजून विचार केला तर जाणवतं , आयुष्य हा सुद्धा तर एक प्रवासच आहे . लहानपणापासून मोठे होईपर्यंतचा प्रवास . कधी निवांत वेळ मिळाल्यावर आठवून बघा . किती दूर आलोय आपण सगळेच . लहानपणी ज्यावेळी हा आयुष्याचा प्रवास सुरु होतो त्यावेळी किती आनंदाने प्रवास सुरु असतो. प्रत्येक नवीन गोष्ट करताना , शिकतांना आनंद मिळतो . हळूहळू या प्रवासात मित्र मिळत जातात . काही दुसरीकडे जातात , काही वेगळ्या वाटेवरून जातात, काहींचा वेग जास्त असल्याने ते पुढे जातात ,काहींचा वेग कमी असल्याने आपण त्यांच्या  पुढे जातो......काही जणांच्या बरोबर जायला आवडत म्हणून वेग वाढवायचा प्रयत्न केला जातो तर काही वेळेला काही जणांसाठी व्यक्ती स्वतःचा वेग कमी करते , बरोबर न . आपल्याबरोबर जे आहेत त्यांच्या बरोबर जाण्यात कधी आनंद मिळतो तर कधी पुढे जाण्याची किंवा वेगळ्या वाटेने जाण्याची इच्छा होते . लहानपणी प्रवास करताना मिळणारा आनंद नंतर मात्र हा आयुष्याचा प्रवास करतांना ........कुणाचा वेग किती आहे ? मग माझा वेग कसा हवा ? किती हवा ?  मी काय केलं तर अजून पुढे जाईन ? कसा जाईन ? कसा पटकन पोहोचेन यावरच मन  विचार जास्त करू लागत आणि प्रवासात पूर्वी लहानपणी मिळणारा आनंद हा नंतर नंतर त्या वेगावर अवलंबून राहू लागतो........ त्यातली मजा कमी होऊन त्यात त्रास जाणवायला लागतो आणि कधी कधी थकवा सुद्धा जाणवतो . अर्थात जो त्यावेळी कधी कधी कळत नाही किंवा पोहोचण्याच्या घाईत .....अस तर होईलच म्हणून त्याकडे खूपदा दुर्लक्ष केल्या जात ....... खूपसे नेहमी बरोबर असणारे लोक मागे पडतात ........त्या वेगाने धावता धावता ज्यावेळी कधी मग बाजूला लक्ष जातं त्यावेळी आपल्या बाजूला अनोळखी लोकं दिसतात ........कधी कोण्या व्यक्तीला ओळखीच्या लोकांसाठी थांबावस वाटतं  तर कधी कुणी एकटच वाटचाल पुढे चालू ठेवत.........त्यावेळी ते आवडत असतं किंवा हवं असतं .......ते त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असत  . आयुष्याचा प्रवास हा सुरू तर राहतो पण त्यातला आनंद मात्र कधी कधी वेगाला बळी जातो . प्रत्येकाचा प्रवास निराळा , प्रवासाचा वेग निराळा .......प्रवासाच्या वाटा निराळ्या ......प्रत्येकाचं शेवटचं ठिकाण ही निराळं .....ते  कधी ,  केव्हा ,  कुठे येईल हे  माहिती नसलं तरी प्रवास हा सुरूच असतो ........चैरेवती चैरेवती  हा संदेश तर सर्वश्रुत  आहे .......माकड ते माणूस हा प्रवास त्याशिवाय साध्य होऊ शकला नसता . थांबला तो संपला .........मात्र कधी कधी नुसता प्रवास करणं हे जास्त समाधान देत . कुठे जायचंय हे ठरलेलं नसताना जेव्हा कधी बाहेर पडते व्यक्ती , त्यावेळी प्रवासात येणाऱ्या सगळया  प्रसंगांना सामोरं जाण , येणाऱ्या अडचणींवर मात करणं हे जास्त सोपं जातं ......याच कारण आपणच स्वतःला देतो .......सगळं ठरवून निघालो नाही न , आता करू adjust. त्यात खरी मजा येते   . सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यावेळचे सर्व प्रसंग एक सुंदर आठवण म्हणून आपल्याबरोबर नेहमी राहतात . ते आठवून कधी हसू येत , कधी झालेला त्रास आठवून परत कुठे जातांना काय लक्षात ठेवायचं याची मनातल्या मनात उजळणी करतो तर कधी स्वतःचा सार्थ  अभिमान वाटतो त्यावेळी आलेल्या  सर्व अडचणीतून मार्ग काढल्याबद्दल ,  त्यातून काय काय शिकलो हे देखील आठवतं ........म्हण आहे न , प्रवासाने शहाणपण येतं , खरंय .  प्रत्येकाने हे मात्र लक्षात ठेवायला हवं  की या आयुष्याच्या प्रवासात जिथे कुठे जायचंय ते नक्की माहिती असो वा नसो  , तिथे पोहोचेपर्यंतचा प्रवास , त्या प्रवासात मिळणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत ,  कुणाच्या बरोबर तर कधी गरज पडल्यास एकट्याने  , स्वतःला पेलणाऱ्या वेगाने करण्याचा प्रयत्न केला तर पोहोचल्यावर मिळणारं  समाधान हे जास्त आनंददायी ठरेल . सर्वांचा हा प्रवास आनंदी , सुखकर आणि समाधानी होवो हीच मनीषा.

Saturday, 31 August 2019

बँक

बँक



आज  बँकेत काम होतं म्हणून गेले होते ........गर्दी होती त्यामुळे थांबले .....वाट बघत होते माझा नंबर कधी येतो .....सहज येणाऱ्या जाणाऱ्यांकडे लक्ष गेलं .......येणारे आपापल्या हातातले  कागद बघत वेगवेगळ्या counter कडे चालले होते  ....कुणाचं फारसं कुणाकडे लक्ष नव्हतं ....  बाहेर जाणारे मात्र एकदा आपापले papers बघून नीट बॅग मध्ये ठेऊन मग जाता जाता आत येणाऱ्यांकडे आणि त्यांच्या हातात काय आहे याकडे बघत होते  .......counter वर बसलेले बँकेचे कर्मचारी या सगळ्या हालचालीं बरोबर काही संबंध नसल्या सारखे स्वतःच्या समोरचे पेपर्स , लोक , print outs आणि computer यात मग्न होते .......कुणी एखादी व्यक्ती ओळख दाखवून काही बोलत होती .....बाकी सगळं काही यंत्रवत सुरू होत ......आवाज होते पण सगळे एक तर विचारलेले प्रश्न , त्यांची उत्तर आणि सगळे व्यवहाराशी संबधित......बाकी आवाज होते ते ठप्प्यांचे , printer चे  , cash counting machine चे बस्स .......अस वाटत होतं की पूर्वी जेव्हा मी कधी बँकेत जायचे त्यावेळी थोडं तरी अवांतर बोलणं हे लोकांमध्ये किंवा तिथल्या कर्मचाऱ्याबरोबर होतांना दिसायचं ...एकतर आजकाल मी किंवा तस पाहिलं तर आपण सगळेच बँकेत फारसं जात नाही ......सगळी काम  online होतात .......मग जायची वेळच येत नाही .......आज माझा नंबर येण्याची वाट बघतांना  मनात विचार आला  की असंच आजकाल सगळ्यांच्याआयुष्यात देखील घडायला लागलाय .......कोण काय करतय याकडे फारस लक्ष नसत .....मी , माझ काम , माझं घर , माझं वेळ , माझं online social network ...... .......होतंय न अस .......जुन्या पिढीला आजही पुस्तकं हातात धरून वाचायला आवडतात  ......whatsapp वर chat करण्यापेक्षा फोन करून बोलायला आवडतं ......नवीन पिढीला मात्र online वाचणं , whatsapp वर chat जास्त सोयीचं वाटतं .....त्यात चूक काहीच नाही........तरी हे मात्र जाणवतंय की कुठेतरी भेटल्यामुळे , भेटायला जातांना केलेल्या प्रयत्नांची व त्यामुळे आलेल्या अनुभवांची भर मात्र आठवणीत पडत नाही ......असो जरा विषयांतर झालं...

बँकेत बसलेले असतांना कितीतरी वेगळे लोक दिसत होते .......कुणी हातात पिशव्या घेऊन आलेले लोक होते ....कदाचित शेतकरी , गावकरी असावेत  , छोटे मोठे व्यवसाय करणारे , काही बायका , काही पुरुष .....कुणी purse , कुणी sling बॅग घेतलेले , कुणी  कोट घालून आलेले तर कुणी मुलं मुली जीन्स टी शर्ट  ........त्यातले जे पिशव्या किंवा साध्या पेहेरावातले होते ते एकमेकांशी आरामात बोलत होते ,  एकमेकांचे नाव गाव विचारत होते , काय काम करतात हे विचारत होते, कुठल्या कामाने इथे आलात पासून थेट घरी कोण असतं इथपर्यंत गप्पा सुरु होत्या ........बाकीचे मात्र शांतपणे आपलं काम आणि आपण बस्स.......
याला कदाचित आजकाल नेहमी अनुभवाला येणारी फसवणाऱ्या लोकांची भीतीही कारणीभूत असू शकते ......

 बँक म्हंटल की त्यातले सगळे व्यवहार हे व्यवसाय आणि पैश्यांसंबंधी असले तरी जर अजून खोलात जाऊन विचार केला तर जाणवतं की जस आपल बँकेत खात असतं तसच खात आपल्या आयुष्याच सुद्धा आहे ........प्रवेश केल्यावर हळूहळू सगळे आपापल्या खात्यात कर्म जमा करत जातात ,  कधी गरज पडल्यास त्या जमा केलेल्या कर्माचा दुसर कुठलं कार्य करायला वापर करतात .......कर्म आणि त्याची देवाण घेवाण सुरू राहते , अगदी शेवटी बाहेर जाईपर्यंत ....जसे बँकेत निरनिराळ्या कामांसाठी निरनिराळ्या काउंटर वर जावं लागतं तसंच इथेही सगळ्यांची काम एका ठिकाणी होत नाहीत .......प्रत्येकाच्या जन्माचा उद्देश निराळा ........जसा बँकेत बदल झालाय तसाच बदल इथेही झालाय ......बँकेतली सगळी काम फारसं न बोलता यंत्रवत होतात तसच काहीस आयुष्यात घडतंय ........आजूबाजूला कोण राहत त्यांच्या बरोबर फारसा संपर्क नसतो ......जो तो स्वतः मध्ये गर्क ........बँकेत जस कोण आपल्यासमोर आहे कोण आपल्यामागे आहे .....कोण बाजूला आहे त्याकडे लक्ष न जाता .......माझं काम पट्कन कसं होईल ......आणि मी माझ्या दुसऱ्या कामाला किंवा जिथे जायचं असेल तिथे लवकर कसा जाऊ शकेन हा विचार करण्यातच  वेळ जातो , हो न.

बँकेत आपण आपल्या खात्यात जसे पैसे जमा करतो तसे आयुष्याच्या खात्यात चांगले कर्म , चांगले मित्र , चांगल्या आठवणी .....चांगले विचार .......हीच खरी ठेव आणि संपत्ती .......हीच संपत्ती अडचणीत मदतीला येते. आपल्या आयुष्याच्या खात्यात चांगले कर्म आणि चांगले लोक जमवायचे तर वेगवेगळ्या लोकांबरोबर बोलल्याशिवाय ,  भेटल्याशिवाय ,  अनुभव घेतल्याशिवाय कोण चांगलं , कोण वाईट हे कळणार कसं ?  स्वतःची काळजी घ्यायला हवीच ......मात्र ते करत असतांना स्वतःभोवतीच कुंपण असही तयार करायला नको की आत काय आहे म्हणजे ती व्यक्ती , ते व्यक्तिमत्व , त्या व्यक्ती मधले गुण , दुर्गुण हे कुणाला दिसूच नयेत .

आपलं शरीर हा एक किल्ला आहे अस जर समजलं तर मेेंदू हा त्याचा किल्लेदार आहे जो  नाक ,  कान , डोळे , तोंड या  दारातून कुणाला आत येऊ द्यायचं , कुणाला बाहेर जाऊ द्यायचं आणि कुणाला नाही हे ठरवू शकतो......म्हणजे गांधीजींचे 3 बंदर जे ज्याचं प्रतीक आहे ते म्हणा हवं तर ...........तसच आत्तापर्यंत आलेल्या अनुभवाने किंवा लहानपणा पासून मिळालेल्या संस्काराने  ,  विचाराने आपल्या भोवती जो एक संरक्षक खंदक तयार झाला आहे त्यामुळे सुद्धा स्वतःच रक्षण करण्यास मदत होते .

आत्मरक्षणाच कुंपण जरूर असावं पण उंच भिंती मात्र नसाव्यात की ज्यामुळे ना त्या व्यक्तीला बाहेरच जग अनुभवता येईल ,  न बाहेरच्या लोकांना ही आतली व्यक्ती दिसेल .........अनोळखी लोकांशी बोलतांना  काळजी घेणं ही आजची गरज आहे मात्र विश्वासाची कमी असल्यामुळे लोक  एकमेकांच्या दूर चालले आहेत हे  नक्की .......... बँकेत  दिसणाऱ्या  अनोळखी लोकांबद्दल जसा संदेह वाटतो ,  विश्वास वाटत नाही तसाच तो रोज भेटणाऱ्या लोकांवरही उरला नाही ......प्रत्येक जण त्यामुळे आत्मकेंद्री होत जातोय .......ही कोंडी फोडण तेवढं सोपं नाही. आपल्या आयुष्याच्या बँकेत चांगले कर्म आणि चांगले लोक जमा करण्याचा प्रयत्न करत राहणं एवढं मात्र आपल्या हाती  आहे...तो तिकडे हिशोब ठेवणारा चित्रगुप्त बसलाय न ......त्याला जेव्हा सामोरं  जायचंय तेव्हा हा संचय तर असायलाच हवा .

 या जग नावाच्या बँकेत आपण सगळे आलो आहोत , प्रत्येकाच्या जन्माचं उदिष्ट निराळं , प्रत्येकाचं  काम निराळं , काउंटर ही निराळं , बाहेर जाण्याची वेळही निराळी ....... बाहेर जायच्या आधी सर्वांना आपापल्या आयुष्याच्या  खात्यात चांगल्या लोकांचा , आठवणींचा , विचारांचा आणि चांगल्या कर्मांचा संचय करता येवो हीच मनीषा .



#चित्रगुप्त

Saturday, 24 August 2019

Long Drive

Long drive


आपण उद्या मस्त long drive ला जाऊ .....

आम्ही काल long drive ला गेलो होतो  .खूप छान वाटलं

एक मस्त long drive वर जाऊन ये मित्रांबरोबर  fresh वाटेल बघ छान.

अशी आणि अनेक अश्या आशयाची वाक्य आपल्या सगळ्यांचीच ओळखीची आहेत , हो न .

Long drive ला कुणी कार ने जाईल तर कुणी स्कुटरवर तर कुणी बाईक तर कुणी सायकल घेऊन तर कुणी पायी ......हसू आलं .....पायी पण जाता येत की long drive ला . आपल डोकं drive करून नेत पायांना......आपण म्हणतोही  पाय नेतील तिकडे गेलो ......काहीच ठरवलं नाही . कार ने किंवा कुठल्याही वाहनाने जातांना पण हेच होतं .....होतं न ...... हा long drive शब्द मात्र जोडला गेला आहे वाहनाला.....असो.

Long drive ला जाण्याचं प्रत्येकाचं कारण निराळं असत .....कधी नुसतच बाहेर फिरायला जाण्यासाठी तर कधी छान वातावरण आहे म्हणून तर कधी घरात बसून कंटाळा आला म्हणून तर कधी मज्जा म्हणून , कधी अशीच चक्कर मारायला तर कधी अजून काही ........वाहन पण वेगवेगळी असतात .....साध्य मात्र एकच असतं .....ते म्हणजे मन प्रफुल्लित करणं , आनंदी करणं , शांत करणं , मोकळं करणं ........आजच्या भाषेत refresh होणं . अहो computer सुद्धा जास्त वेळ काम केलं की कंटाळा करतोच न .....मग hang नावाचा time please घेतो ..... मग refresh बटण दाबलं केलं की परत कामाला लागतो .......ते जस माणसाने तयार केलेलं यंत्र तसे आपणही देवाने तयार केलेले अप्रतिम आणि आजवर कुणीही प्रतिकृती तयार न करू शकलेलं यंत्रच आहोत . माणूस आज खुप  विज्ञान प्रगत झालाय मात्र आजही तंतोतंत माणूस नावाचं यंत्र नाही तयार करू शकला . असो आता यावर लिहिलं तर विषयांतर होईल.

काय लागतं खरच आपल्याला आनंदी व्हायला, प्रफुल्लित व्हायला ......फक्त विचार बदलले की आनंदी होऊ शकतो आपण ......तरीही हे साध्य होणं जरा अवघड जातं .....खरं न .....कितीही कोणी म्हंटल की अरे सकारात्मक विचार कर  , सगळी मरगळ निघून जाईल बघ .....विचार चांगले कर ....बघ तू जे विचार करशील तसच होईल .अशी वाक्य सतत ऐकत आणि ऐकवत असतो आपण एकमेकांना .

एक खूप छान वाक्य मागे माझ्या वाचण्यात आलं .......
refreshment/rest is nothing but change of work ..........कसं आहे की सांगणं सोपं आहे ......करणं तेवढंच अवघड . हो न , अशावेळी हा long drive फार हवा हवासा वाटतो .......कधी एकटं जावसं वाटत तर कधी कोणा बरोबर ......बरोबर कुणाला न्यावं हे पण ती व्यक्ती बरोब्बर ठरवते. कुणाबरोबर संवाद साधला तर मन मोकळं करता येईल , मनाची मरगळ जाईल  , मन प्रफुल्लित होईल , fresh वाटेल  हे पण ज्याचं त्याला ठाऊक असतं. प्रत्येक वेळी एकच व्यक्ती नसते .....खूपदा असते सुद्धा .....ते त्या त्या व्यक्तीवर आणि अर्थात त्या  त्या विषयावर अवलंबून असत . कुणाबरोबर आणि काय बोलायचं हे सुद्धा व्यक्तिप्रमाणे वेगवेगळ असतं .

पायी लांबवर गप्पा मारत फिरत जाण याने जसं मन आनंदी होत ,  तसच हातात सायकल घेऊन पायी लांबवर चालत जाण यात देखील आनंद मिळतो , मन शांत होतं.  गप्पा मारून शांत तर होतच तसच मोकळं ही होत .

स्कुटर किंवा बाईक वर जातांना शांत रस्त्यावर दोन्ही बाजूंना दिसणारी झाड किंवा जातांना  कानाला लागणारा तो  गार वारा ...उडणारी ती ओढणी/पदर..... ओढणीची होणारी ती हवीहवीशी वाटणारी फडफड.......कानाशी होणारा , बोलणारा किंवा बोलणारी यांच्या आवाजाचा नाद ....त्यातून होणारा सुसंवाद ......एखाद्या प्रॉब्लेम वर मिळणारा उपाय .....सुचलेले काव्य किंवा एखादी ओळ सुद्धा मन सुखावून जाते ......मागे किंवा समोर बसलेल्या व्यक्ती चा आवाज ,सहवास ,सुगंध, स्पर्श , न दिसणारी तरीही समजणारी ती नजर..... न दिसणारे तरीही उमगलेले त्याच्या चेहऱ्यावरचे भाव ........ कधी मिश्किल तर कधी समजून घेणारे तर कधी समजावणारे..........हे सगळे मन आकर्षित तर करतातच पण शांत आणि प्रफुल्लित सुद्धा करतात ......ही refreshment फार जरुरी असते ......त्यात जर कधी रिमझिम पाऊस सुरू झाला तर वा .......एकदम राहत फतेह अली खान च आठवतो .......खुशनुमासा .....ये मौसम है जहाँ ......फारच romantic वाटायला लागलय का .....वाटू दे .....त्यातही मजा असते ......

कार मधून जाताना सुद्धा हेच अनुभव येतात ......एक आपलच विश्व असत चार दारांमधलं .....यात बाहेरच्या वाऱ्याला सुदधा शिरकाव नसतो ...... आत असणारा गारवा .....लावलेली आवडती गाणी , मंद दरवळणारा सुगंध आणि सुसंवाद किंवा क्वचित कधी फुटलेला ,  तडकलेला .....तर कधीकधी न थांबवता आलेली खूप वेळेची घुसमट , कधी आर्त स्वर तर कधी न केलेले हट्ट तर कधी समजावणीचा सूर ....तर कधी लाड तर कधी चिडचिड.......कधी कधी तर या आतल्या फक्त स्वतः साठी असणाऱ्या विश्वात बाहेरच्या वाऱ्याला सामील करून घेण्याची फार इच्छा होते आणि मग AC बंद करून खिडक्यांच्या काचा खाली करून हात बाहेर काढून .......चेहऱ्यावर ......
हातावर तो वारा घ्यायला पण solid वाटतं ......हो न ......आणि पाऊस आला तर ........मग परत तेच ......यावेळी एखाद्या वेळी शोभा मुद्गल आठवते बरं  ........घटा सावनकी .......आणि कार पण थोडी जरा speed वाढवते .......imagin करायला लागले का ......अजून वाचायचं आहे पुढे .

पायी फिरायला जातांना सुद्धा वेगळा माहोल असतो  ....एकतर आपण पुष्कळदा रस्त्यावर एकटे नसतो .......का ? ....अहो का काय .....पायी फिरायला घराजवळ जातो ना generally आपण .....असो  .....एकटं रमतगमत जाण हे सुदधा मनाला विसावा , विरंगुळा देत  कुणी बरोबर असेल तर एकमेकांच्या speed adjust करत .....बोलत .....सांगत  .....हाताला धरून तर कधी हात खांद्यावर ठेवून तर कधी गळ्यात हात घालून फिरायला जाण्यात पण आनंद मिळतो .......रस्त्याने जातांना एकमेकांना सांभाळून नेणं अशावेळी दोघेही करत असतात .....ते नकळत होत जातं .......जर रस्ता रिकामा असेल तर एखादया मध्ये आलेल्या दगडाला ठोकर मारून  उडवण .....मग परत त्या दगडापर्यंत पोहोचून कोणी परत ठोकर मारायची यात होणारी त्यांची चुरस.....जी त्या दोघांमध्ये होत असताना त्यांना मिळणारा तो निर्मळ आनंद  ......अस करत करत जेव्हा ........फारच दूर पोहोचलो आपण ......अजून घरी परत पायी जायचंय याच आकलन होऊन खूप हसू येणं  ........इतकं दूर फिरून आल्यावरही त्या थकण्यात पण मिळणारा आनंद ......अवर्णनीय ........
काय झालंय  न असं ......आठवा आठवा असे प्रसंग .......या प्रसंगाची आठवण सुद्धा तुम्हाला long drive वर घेऊन जाईल .

कधी कधी नुसतं एखाद्या आवडत्या जागी एकटं बसलं तरी मन शांत होत , कधी आवडती गाणी ऐकल्याने सुद्धा मन प्रफुल्लित होतं ......यावेळी सुद्धा आपण long drive वरच गेलो असतो ..... यात वाहन आपलं मन असतं जे विचारांवर स्वार होऊन लांब फिरून येतं.

खूप पदर असतात या long drive चे .....
दूर फिरायला जाणं एवढाच याचा मर्यादित अर्थ नसतो. Long drive म्हंटल की आता आठवेल तो मोकळा रस्ता आणि त्याबरोबर मोकळं होत जाणार मन .काय ? बरोबर न .  असच सगळ्यांना नेहमी long drive वर जाण्याची संधी मिळो आणि संधीचा लाभही मिळो हीच मनीषा .



#खुशनुमासायेमौसमहैजहाँ ,  #घटासावनकी 



Saturday, 17 August 2019

कापुसकोंड्याची गोष्ट







कापुसकोंड्याची गोष्ट

ए गोष्ट सांग न .........कापुसकोंड्याची गोष्ट सांगू ? हो ....सांग ......हो सांग काय म्हणतो कापुसकोंड्याची गोष्ट सांगू ...... सांग न लवकर .........सांग न लवकर काय म्हणतो ......कापूसकोंड्याची गोष्ट सांगू ? ......नको सांगू .......नको सांगू काय म्हणतो कापुसकोंड्याची गोष्ट सांगू ? .....बर सांग ......बर सांग काय म्हणतो कापुसकोंड्याची गोष्ट सांगू ?...... पुरे आता .....बस ......पुरे आता .....बस काय म्हणतो कापुसकोंड्याची गोष्ट सांगू ?....


आठवली ? ही गोष्ट आपण सगळ्यांनी लहानपणी ऐकली आहे .......पहिल्यांदा जेव्हा ही गोष्ट आपण ऐकतो  त्यावेळी त्या सांगणाऱ्याचा अस्सा राग येतो न ......पहिल्यांदा त्यातली गम्मत न जाणवता गोष्ट सांगणारा किंवा सांगणारी आपल्याला गोष्ट सांगत नाही आहेत तर बनवतात आहे हे  कळायलाच वेळ लागतो .....आणि कळल्यानंतर राग येतो.....होत न अस .

 त्यातली गम्मत मात्र एकदा कळली की मग मजा येते ........मग शोधू लागतो आपणही कोणालातरी..... ही गोष्ट सांगायला ........ मोठे भाऊ बहिणी असतील तर ते काही दाद लागू देत नाहीत ..... पण छोट्या भावाला ,  बहिणीला किंवा  सुट्टीत आपल्या घरी आलेल्या आपल्या आते , मामे , चुलत भावा बहिणींना ही गोष्टी सांगून चिडवण्यात मजा येते ........कोणी ही गोष्ट एको न एको ......आई बाबा मात्र खूप छान ऐकतात ही गोष्ट आणि काही कळलंच नाही असं दाखवत आपल्या त्या बालिश आनंदात सहभागी सुदधा होतात .


 मला तर या गोष्टी मध्ये फार मजा वाटते .....म्हणजे बघा.......हा खेळ.....हो हा एक प्रकारचा खेळच आहे .......जरी त्यात गोष्ट शब्द असला तरी तो दोघांनी खेळण्याचा खेळच आहे .......गोष्ट सांगू का विचारल्यानंतर  दुसरा खेळाडू त्या संवादातून पुष्कळदा स्वतःला हवं ते बोलू शकतो .....कधी असही होतं की जे एरवी सहजपणे सांगायची हिम्मत होत नाही ते या मजे मजेत सांगून मोकळ होता येत ......जर गोष्ट सांगणारा हा दादा किंवा ताई असेल तर .......मग अगदी तूझा मला राग आलाय , तू मला आवडत नाही , तू दुष्टपणा करतो , तुझे कान ओढीनं , तु दुपारी काय केलं ते मी बाबांना सांगीन ......अजून कितीतरी ......जे त्या दुसऱ्याने परत म्हंटल्यावर त्यातून निघणारा आणि स्वतःवरच उलटणारा अर्थ .....खूप मजा येते पण कधी कधी त्यात धपाटा मिळण्याचा  chance  असतो .... अशीच दुसऱ्याची फिरकी सुद्धा घेता येते ....हा खेळ संपत नाही ..... एकतर एकमेकांचं  रिपीट तरी करावं लागतं खेळात राहायला नाहीतर मग खेळ कसा बंद करावा हा विचार करता करता  दुसरी व्यक्ती मग मजा घ्यायला लागते ......गोष्ट ज्याने सुरू केली त्याला जरी नंतर ती सांगायचा कंटाळा आला तरी  मग ऐकणारा सांगणारा होऊन त्याची फिरकी घेऊ शकतो . त्यासाठी त्यातली गम्मत कळावी लागते .....आणि तो खेळ खूप मजेशीर होतो त्या दोघांसाठी आणि तिथे बाजूला त्यांची मजा ऐकणाऱ्यांसाठी सुद्धा .......जोपर्यंत दोघेही आता खरच पुरे अस म्हणत नाहीत तोपर्यत थांबता येत नाही . एक विस्मरणीय संवाद तर होतोच पण छान अशी नेहमी ओठांवर हसू येईल अशी गोड आठवण कुपीत साठवल्या  जाते .

या गोष्टीमागे हा विचारही असू शकतो का ...की जेव्हा दुसरी व्यक्ती तुमची नक्कल  करते , तुमचीच वाक्य दुसऱ्या कुठल्या संदर्भात परत बोलून तुम्हाला चिडवण्याचा  प्रयत्न करते  .....तुम्ही जे करता तस करून क्वचित शाळेत , कॉलेज ,  office मध्ये किंवा अजून कुठे तुम्ही केलेल्या कामाचं credit घ्यायचा प्रयत्न करते ......त्यावेळी रागावून न जाता  आपल्या मनाची शांतता ठेवून त्या व्यक्तीला ते तस जाणवून न देता तो खेळ त्याच्या कलाने आधी खेळत जाऊन नंतर तो आपल्यासाठी कसा उपयोगी ठरेल हे बघणं  .......कित्ती कठीण वाटतंय न ......राग येतो खरतर अशावेळी फार ......असे प्रसंग आयुष्यात  येणार आहेत ......त्यावेळी कस त्या प्रसंगांना सामोरं जाता येईल ......कसा आपल्या मनाचा शांतपणा टिकवता येईल हे  या खेळातून शिकवण्याचा प्रयत्न तर नसेल ?


कापूसकोंड्याची गोष्ट कोणी आणि कधी रचली असेल ? या मागे काय हेतू असेल ?   या शब्दाची फोड करावी तर कापूस आणि कोंडा ........दोन्ही इतके हलके की वारा तर दूरच ......साधी फुंकर घातली तरी उडणारे  ........बरं कापूस आणि कोंडा तसं पाहिलं तर दोन्ही उपयोगी वस्तू .....कापसापासून तयार केलेल्या वस्त्राने  मनुष्याच्या शरीराचं ऊन वाऱ्यापासून संरक्षण होत तर कोंडा पोटाची भूक भागवतो .......म्हणतात न खायला कोंडा आणि निजेला धोंडा ......अगदी काही जरी नाही मिळालं जेवायला .....कोंडा खाऊन पण मनुष्य आपली भूक भागवू शकतो ........मग ही गोष्ट कापूस कोंड्याची का ?

मनुष्याच्या मूलभूत गरजा .....अन्न , वस्त्र , निवारा यापैकी दोन गरजा पूर्ण करणाऱ्या वस्तूंनी कधीही पूर्ण न होणारी गोष्ट कोणी तयार केली असेल ? का ? निवारा हा एखादया झाडाखाली सुद्धा घेता येतो . वस्त्र मात्र मेहनतीने कापसापासून तयार करावं लागतं .......तसच कोंडा सुद्धा गव्हाचा काढावा लागतो त्यासाठी अगदी गहू पेरण्यापासून मेहनत करावी लागते  .........अन्न आणि वस्त्र या त्यावेळेच्या सगळ्यात मोठया गरजा होत्या . किंबहुना आजही त्याच मूलभूत गरजा आहेत. कशासाठी ?.....पोटासाठी ......असं म्हणतो न आपण नेहमी ...........यासाठी आयुष्यभर मेहनत करावी लागणार हे तेव्हाही माहिती होतं .......आजही हे खरं आहे ........मूलभूत गरजा भागवण्यासाठी मेहनत ही आवश्यक आहे आणि ती सुद्धा आयुष्यभर न संपणारी ..........म्हणून तर या न संपणाऱ्या गोष्टीच नाव कापूसकोंड्याची गोष्ट असं नसेल ? काय वाटतं तुम्हाला ?

कापुसकोंड्याची गोष्ट सांगू ?



#कापुसकोंड्याचीगोष्ट

Friday, 9 August 2019

विचार

विचार

आज विचार करत होते काय लिहावं ? विचार करू लागले आणि करता करता माझं मलाच आता आठवत नाहीये की माझ्या मनात आधी कुठला विचार आला होता ......कशावर लिहावं अस मी ठरवत होते कारण जेव्हा लक्षात आलं की मला ब्लॉग लिहायचा आहे तेव्हा तर मी माझाच कुठला तरी दुसराच  विचार करत होते .

सगळ्यांचच होतं पहा अस .....एखाद्या गोष्टीचा विचार करू म्हंटल तर कधी कधी सुचत नाही ..... कधी कधी एकटे बसले असतो आपण त्यावेळी मुंग्यांची भली मोठी रांग दिसावी तसे विचार सुरु होतात .......एखाद्या पाण्याच्या प्रवाहासारखे वाहत राहतात .....कुठून सुरु होतील आणि कुठपर्यंत जातील काहीच सांगता येत नाही .........

 विचार हे ठरवून येत नाहीत ..... आपोआप येतात ......ते थांबवणं आपल्या हातात असतं हे जेवढं खरं तेवढंच हे ही खर आहे की कधी कधी ते थांबावेसे वाटले तरी आपले प्रयत्न कमी पडतात आणि त्या विचार चक्रात आपण अजून गुंतत जातो ..... विशेषतः कुणाबद्दल , किंवा एखाद्या जुन्या प्रसंगाचा विचार करतांना ........कळत पण वळत नाही .......

हे विचार जेव्हा आपसूक येतात तेव्हा खूपदा असं होतं की विचार करूनही न सुचलेला उपाय किंवा एखादा न मिळालेला धागा सापडतो .......त्यावेळी वाटतं ....अरे हे कित्ती सोपं होतं ...... कसं नाही सुचलं मला आधी

मन शांत असतांना आपण नीट विचार करू शकतो असं जे म्हणतात ते हेच असावं ......म्हणूनच पूर्वीचे लोक  ध्यान करण्यावर भर देत असावेत .

जो विचार पहिल्यांदा मनात येतो ......त्यानंतर एकात एक असे कितीतरी निराळ्या विषयावरचे  विचार येत जातात मनात ........अगदी साधी समोर दिसलेली एक झाडाची सावली सुदधा विचार करायला भाग पाडते ......आणि ती साखळी कुठे पर्यंत जाईल याला काहीच धरबंध नसतो ........

विचार करणं चांगलं ..... विचार चांगले असणं त्याहून चांगलं ......वाईट विचारांचा आपल्या शरीरावर , प्रकृतीवर वाईट परिणाम होतो हे सिद्ध झालंय ,....... ते विचार मनात येतात हे तर खरं .......कितीही ठरवलं तरी सर्व साधारण लोकं असे विचार मनात येण्यापासून स्वतःला परावृत्त करण्यात तेवढे यशस्वी होत नाहीत .......प्रयत्न सगळेच करतात .........देह सर्वांचा सारखाच .....फरक फक्त विचारांचा....


साधं उदाहरण घ्यायचं ......तर आपली जवळची व्यक्ती जेव्हा घरी पोहोचायला उशीर होतो काही कारणाने ......कधी traffic मुळे , कधी मित्रांशी गप्पा मारत बसल्यामुळे, कधी कामामुळे , कधी अजून कुठल्या कारणामुळे .......त्यावेळी का उशीर झाला असेल या बद्दल जे विचार मनात येतात .....ते खूपदा साधे असतात का..........त्यावेळी मनाला सांगितल्या जातं .......असं झालं असेल ......तसं झालं असेल ..... मोठ्याने जरी दुसरं काही बोलल्या गेलं तरी आत खोल मनात मात्र काळजी मुळे खूप वेगळे विचार येतात हो नं .

ध्यान करतांना मन शांत ठेवा .....कुठलाही विचार करू नका असं सगळे म्हणतात ..... हे खरंच करता येतं का ......मन रिकामं ठेवणं इतकं सोपं आहे का .......विचार करायचा नाही .....हा ही एक विचारच आहे नं .

विचार करतोय हे सांगताना  शब्द  पहा किती मजेशीर वापरतो आपण सगळे .....म्हणतो न
विचार चक्र सुरू आहे ...... चक्र जे फिरत राहत .....कधी जोरात तर कधी हळू .......त्यात आपण फसत जातो ......दोरा चक्रात फिरल्या सारखे ........

विचार मंथन ..........कुठलाही मोठा निर्णय घ्यायच्या आधी मनात आलेल्या निरनिराळ्या विचारांना ढवळून  काढून ........मंथन करून शेवटी वर आलेला सुज्ञ विचार .........हे पुष्कळदा करतात सगळे ......अगदी छोटे मोठे कुठलेही निर्णय घेतांना ..........

विचाराधीन ..........काहीतरी विचार करतांना त्यात गुंतून जाणं ......त्या विचाराच्या अधीन होणं .......असं तर कधी कधी छोट्या मुलांनाही पाहतो ....... आपल्यातच गुंग असतात ती मुलं....... कित्येक वेळा तर त्यांना सांगता देखील येत नाही की ते कशाचा विचार करतात आहेत ...... मजा येते त्यावेळी ..... त्यांचे तुटक अर्धे विचार ऐकतांना ........ खूपदा ते खूप काही सांगून जातात ........फक्त ते विचार ऐकण्यासाठी ,  समजण्यासाठी  आपल्याला लक्षपूर्वक ऐकावं लागतं .

विचारवंत .......याचा अर्थ श्रीमंत सारखा वाटतो नं ........श्रेष्ठ विचारांनी परिपूर्ण .......जो विचार करू शकतो आणि दुसऱ्यापर्यंत ते पोहोचवू  शकतो .....मांडू शकतो ....... दुसऱ्यांना पटवून सांगू शकतो ......असा विचारवंत ......मग ते कुठल्याही विषयावर बोलणारे ,सांगणारे असोत ........त्यांच्या विचार करण्यात एक सुसंगती जाणवते ........अर्थात यातही दोन प्रकार आहेत ....... एक जे स्वतःला विचारवंत म्हणवतात .......आणि एक जे जाणवतात .

विचारमग्न ....झालेय न तुम्ही वाचतांना आणि असही वाटतय न की मी विचारी आहे .....jokes apart पण खरंच विचार हे फार प्रगल्भ करतात व्यक्तीला .....विचारी व्यक्तिमत्त्व हे चांगलं  असू शकतं तसच जास्त विचारी असणं हे कधी कधी मनात भीतीला ,  काळजीला दिलेलं आमंत्रण असतं  .....अर्थात ते विचार काय आहेत यावर अवलंबून असत हो न .

विचारधारा हा अजून एक थोडा विचारवंत या शब्दाचाच भाऊ म्हणूया ........ खूपदा हे विचारवंत लोक एकाच विषयाचा वेगळ्या वेगळ्या प्रकारे विचार मांडतात ........मग त्यांचे विचार पटणारे , पाळणारे , त्यांचं ऐकून तसा विचार करणारे असे समाजात वेगवेगळे ग्रुप तयार होतात .......कधी हे विषय सामाजिक बांधीलकीचे असतात तर कधी समाज प्रबोधनाचे तर कधी राष्ट्रसेवेचे तर कधी राष्ट्रहिताचे ........हे विचार कधी कधी समांतर जाता जाता ........ कुठे तरी विलीन होऊन परत समांतर जातात ...... धर्मासाठी , मोक्ष कसा मिळेल यासाठी , business strategy , देशहितासाठी शेतीच्या आधुनिकीकरणासाठी  , पर्यावरण संदर्भी अजून कितीतरी  विविध विषयांवर या चर्चा होतात .......त्यावेळी या निराळ्या असणाऱ्या विचारधारा  समांतर तर जातातच पण कुठली विचारधारा जास्त चांगली यासाठी कधीकधी कलह सुद्धा होतात असो .....हे जरा विषयांतर झालं .

तर .........विचारांती ....... असं वाटतंय .....की ......विचार .......याचा अर्थ जर कुणाला विचारला तर तो विचार करेल .....का विचारलं असेल याने , कुणाला सांगायचंय , कशासाठी हवाय अर्थ आणि मग विचारेल .......का विचारतोय तू असं ........किंवा विचारेल ......का ? कशासाठी ? कुणाला सांगायचंय ? वगैरे   वगैरे .

हा विचार शब्द त्या विचार शब्दापेक्षा वेगळा आहे ......हो नं......ज्यावर आत्ता पर्यंत मी विचार मांडले .......काय बरोबर न .

विचारांती  सर्वांचे विचार आणि विचारधारा चांगल्या आणि फक्त चांगल्या दिशेने वाहोत हीच मनीषा 

Saturday, 3 August 2019

सकाळ

सकाळ

सकाळ या शब्दातच किती प्रसन्नता आहे नं ..........

सकाळ म्हंटल की आठवतो उगवता सूर्य ..... प्रकाश  ......पक्ष्यांची किलबिल ..... ..मंद वारा .....किंचित गारवा ......वेलींवर , पानांवर , फुलांवर , गवंतांवर पडलेले दवबिंदू  .......त्यावर पडलेली सूर्याची कोवळी किरणं .....त्यामुळे दिसणार छोटंसं सप्तरंगी वलय  ........दूरवर थोडंस धुकं .....उडत जाणारे पक्षी ......झाडांवरून उडणारे ......इकडच्या झाडावरून तिकडच्या झाडांवर जाणारे  .......वेगवेगळ्या आवाजात काहीतरी सांगणारे निरनिराळ्या रंगांचे पक्षी ......सकाळी जेवढे पक्षी दिसतात तेवढे एरवी दिवसभरात कधी दिसत नाहीत ........खरंतर सगळे पक्षी वेगवेगळे आवाज करत असतात पण ते एकत्र ऐकतांना इतकं सुंदर वाटत .....त्या आवाजाला पक्ष्यांची किलबिल हे नाव कुणी शोधल कुणास ठाऊक  त्या नावातच सौंदर्य आहे ....हो न ........खूप माणसं एकावेळी बोलली तर त्याला गोंगाट म्हणू  ......किंवा कल्ला .....किंवा गोंधळ .... यापैकी कुठलाही शब्द नाजूक.... छान आवाज असा प्रतीत होत नाही .....

त्या त्या जागेप्रमाणे सकाळ सुद्धा निराळी असते  ........शहरातली सकाळ निराळी ..... गावातली निराळी ......नदीकाठची निराळी .......समुद्रकिनारी निराळी ........पहाडावरची निराळी ......पहाडाच्या पायथ्याशी निराळी ........हे निराळेपण  फार निराळं असतं ........ते सर्व
अनुभवतांना त्याच निराळेपण  भावून जात . ........

घड्याळात किंवा आजकाल मोबाईल मध्ये अलार्म झाला की झाली शहरातली सकाळ  .......मग पटापट सगळ्यांची शाळा किंवा ऑफिस ला जायची तयारी  ...स्वयंपाक ......नाश्ता .... डबे .....आणि धावपळ  .......सुट्टीच्या दिवशी काय तो थोडा आराम .....चहा ....पेपर वाचन ....... आजकाल मोबाईल वाचन  ..........

सकाळी रोज न चुकता फिरायला जाणारी जी जमात असते तिला मात्र अलार्म नको असतो ....आपोआप जाग येते त्यांना .....ते लोक खर तर सकाळ होतांना बघतात .....अनुभवतात ............घरातुन बाहेर पडतांना तसा उजेड नसतो फारसा पण कुठपर्यंत पोहोचल्यावर तांबडं आकाश दिसेल किंवा सूर्य वर येईल .....किरणं दिसतील  अथवा कुठले पक्षी कुठे दिसतील .....तसच कुठल्या शाळेची बस , मुलं कुठे दिसतील ......दिसली नाही तर ......आज मला उशीर झाला की त्याला .....की सुट्टी आहे शाळेला ......एक ना अनेक ......अशी सकाळ रोज अनुभवणं आणि यात सुद्धा वेगवेगळ्या वयातील लोकांच्या, पशु पक्ष्यांच्या सकाळच्या हालचाली निरखत आनंद अनुभवणं या सारख सुख नाही .......पावसाळा असो की उन्हाळा ......इतकी या लोकांना सकाळी एकमेकांना पहायची सवय होते की ते ते लोकं दिसले की किती वाजले असतील याचा अंदाज येतो आणि नाही दिसले तर उशीर कुणाला झाला किंवा का आले नसतील याचा अंदाज बांधून पुढे मार्गक्रमण
करणं या लोकांकडून शिकावं .....

नदीकाठी , समुद्रकाठी सकाळ होतांना पाहायला तर दुरून दुरून लोक येतात ......ती पाहतांना खरच आप , तेज , वायू , पृथ्वी आणि आकाश यांचा जो अप्रतिम संगम ... .मिलाप अनुभवायला मिळतो  .....खरंच तो तसा कुठे अजून मिळत नाही .......त्या जमिनीवर समोर समोर येणाऱ्या  आणि परत हुलकावणी दिल्यासारख्या ..... किनाऱ्याला हात लावून ....आऊट करून परत  दूर जाणाऱ्या लाटा ......पाण्यावर पसरलेली कोवळी किरणं .....त्यामुळे चकचकीत दिसणार पाणी  ..... गार हवेमुळे जाणवणारा तो हवाहवासा वाटणारा गारवा ......निरभ्र आकाश ......त्यात पसरलेला तो सूर्याचा प्रकाश .......त्यामुळे झालेलं तांबडं आकाश किंवा रंगेबिरंगी म्हणूया ......खूप रंगांची उथळण झालेली दिसते पण त्यात प्रामुख्याने तांबडा रंग जास्त असतो म्हणूनच की काय  ..... म्हणतात न .....तांबडं फुटलं .....  अशा ठिकाणी सकाळ होताना ती अनुभवणं ......वा .....पंचमहाभूतांचा तो अवर्णनीय असा एकमेकां च्या सोबत चा विलोभनीय सहवास......तो सहवास आपल्याही मनाला फार प्रसन्न करतो ..... अशी ही अनुभवलेली  सकाळ नंतर कधीही जेव्हा आठवते तेव्हा मन प्रफुल्लित करते ......हा आठवणीतला ठेवा नुसते डोळे बंद करून आठवा ......तिथला तो सुगंध आजही आठवतो .....तो प्रकाश ....ते पाण्यावर उडणारे पक्षी ....तो पाण्याचा आवाज .....ते आकाश .....ते आकाशातले रंग .....तो टरबूजा सारखा दिसणारा मोठ्ठा सूर्य ......पायांवरच ते झुळझुळणार गार पाणी , हवेतली ती छान गुलाबी थंडी.......बंद डोळ्यांना हे सर्व दिसतं आणि मनाला पाण्याचा , हवेचा गारवा देतं .......

खरतर सकाळ ही सगळ्यांसाठी होते .....अगदी डोंगर , नदीकाठी राहणाऱ्यांसाठी ......तसच गावात शहरात .....अगदी कुठेही राहणाऱ्यांसाठी ........पण कुणी ती सकाळ अनुभवत तर कुणी नाही ........कधी कुणाला वेळ नसतो तर कधी किती वाजले या पलीकडे सकाळ या शब्दाला अर्थ नसतो ...... फक्त झोपून उठणं म्हणजे झाली सकाळ .......मुलं उशिरा उठले की आई रागावते न .......झाली यांची सकाळ ......

आजकाल प्रत्येकाची सकाळ मात्र वेगवेगळ्या वेळी होते .....कुणाची सकाळ ही पहाटे 4 वाजता सुरू होते .....तर कुणाची अगदी 10 वाजता सुद्धा होते ........कारण आजकालची जीवन पद्धती  .......

 खरंच सकाळ या शब्दाचा  अर्थ इतकाच मर्यादित आहे की अजून काही अर्थ आहे याचा.....हा शब्द ज्या कुण्या व्यक्तीला पहिल्यांदा सुचला त्याला नक्की काय अभिप्रेत असेल .......

काळ म्हणजे phase ...... आयुष्यातला  टप्पा .....ती वेळ .....मग ती कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यातली असो ......आणि स म्हणजे चांगलं ......जस सकस अन्न , सद्गुण , सदभाव , सदाचार ......तसच सकाळ तर नसेल ......चांगला काळ ...........स काळ

सकाळ म्हणजे नवीन सुरुवात .....असा तर अर्थ अभिप्रेत नसेल ....  . मग ती दिवसाची असो अथवा आपल्या आयुष्यात येणार असलेल्या नविन  स्थित्यंतर बदलाची ......किंवा अजून काही .........

काही अडचण आली तरी स्वतःला किंवा दुसऱ्याला दिलासा देतांना आपण म्हणतो........ आता विचार नको करू ..... सकाळी बघू ......हो न ......कधी कुठल्या कठीण प्रसंगातून एखादी व्यक्ती जात असेल तर .....अरे रात्रीनंतर सकाळ ही होतेच ......ही पण वेळ जाईल ......सगळं ठीक होईल .....तू काळजी करू नको असा धीर देतोच न आपण .…...कधी स्वतःला तर कधी दुसऱ्याला .......ते गाणं आहे न ......फिटे अंधाराचे जाळे ....झाले मोकळे आकाश  .....ते ऐकतांना असं वाटत हाच तर खरा सकाळ शब्दाचा अर्थ आहे .......

सकाळ हा शब्द च नवीन सुरवात या कल्पनेशी जोडला गेलाय ....मग ती सकाळ नव्या दिवसाची असो किंवा कुठल्या सुरू केलेल्या कार्याची किंवा काही कठीण परिस्थिती नंतर येणारी अथवा सहज सुंदर झोप झाल्यानंतर उठल्यावर दिसणारी ......अशी सुंदर सकाळ सर्वांना जीवनात नेहमी अनुभवता येवो हीच मनीषा .......

Saturday, 27 July 2019

रंग

रंग



रंग ......

यावर खरंच काय लिहिणार ......रंग म्हणजे रंग ........अजून काय ........रंगेबिरंगी .....म्हणजे हिरवा , लाल , निळा , पिवळा,  गुलाबी ........आणि अजून कितीतरी रंग ..... ..  अजुन काय बर .......पानी तेरा रंग कैसा ......जिसमे मिलाये वैसा ........रंग माझा वेगळा  ......
 ........असेही म्हणतात ......यातला रंग चा अर्थ  काय आहे ... ...रंग वेगळा म्हणजे  मी लाल,  निळा किंवा हिरवा आहे असा तर नक्कीच नाही ...... मग काय .....

खरतर रंग म्हंटल की आठवतात फुलांचे ....पक्ष्यांचे....फळांचे भाज्यांचे , झाडांचे  ....मासोळ्याचे , फुलपाखरांचे...आकाशाचे ......ताऱ्यांचे , ग्रहांचे , रत्नांचे , दगडांचे ......म्हंटल तर विविध रंगांनी नटलेल्या निसर्गातील सर्व जीव जिवाणूंचे .....किती म्हणून किती नाव लिहावी .....ही list वाढतच जातेय .......तर थोडक्यात रंग हा निसर्गातल्या प्रत्येकाला आहे ......बरोबर .......अजून थोडा विचार केला तर जाणवतं की ....रंग प्रत्येक मानवनिर्मित गोष्टींना  आहे ...... त्यात प्रकर्षांने सर्वाना आवडणारे म्हणजे घरांचे,  गाड्यांचे , कपड्यांचे , लहान मुलांच्या खेळण्यांचे आणि कितीतरी वस्तूंचे निरनिराळे रंग .......

रंग कुठलाही खरं तर छानच असतो ....रंगसंगती जर नीट झाली नसेल तर मात्र तो रंग मनाला भावत नाही ..... मला आवडला नाही हा रंग असं म्हणतो  आपण ..........प्रत्येक ठिकाणी काही ठराविक रंग खुलून दिसतात हे जरी असलं तरी काही रंग हे चांगले ,  काही रंग वाईट असं लोक ठरवून मोकळं होतात  .............कुठला रंग चांगला यावर कधी संवाद किंवा क्वचित वाद सुद्धा  होतात ....... जसं अगदी नेहमीच उदाहरण म्हणजे...... गोरा रंग चांगला .... काळा वाईट ......त्यावरून जगात आजपर्यंत अनेक लोकांवर अन्याय झाले...........racism ही जगातली फार मोठी मानवतेला  लागलेली कीड आहे ......कितीही वरकरणी आव आणला तरी काही लोक स्वतःला superior समजतात ....मात्र  गंम्मत या गोष्टीची वाटते की काही लोक स्वतःमध्ये काही  कमी आहे असं मानतात  ......समजतात ..........खरंतर आपण कितीतरी गोरे नसलेले लोक यशस्वी झालेले पाहिले आहेत पण तरीही खूपदा समाजात रंगावरून टिंगल करणारे लोक दिसतात ....... रंगावरून हिणवल्या जात .....कुणाला तरी कधी कोळसा असही चिडवलं जातं ......त्यावेळी ह्याच कोळश्याची सावरकरांनी अंदमानात केलेली लेखणी आपण विसरतो ......केवढं त्याच मोल.....हाच कोळसा जेव्हा चुलीत किंवा power plant मध्ये वापरल्या जातो तेव्हा अन्न तर तयार होतच तसच लाखो घर प्रकाशात उजळून निघतात ... ...बरोबर न ......... ......दूर कशाला जा ...... आपल्याकडे म्हण प्रचलित आहे....... गोरी सब गुण चोरी .....खरतर  भारतातल्या  समाजात पुष्कळ मुलींची रंग ही खूप मोठी समस्या आहे .....आहे असं म्हणण्यापेक्षा तशी त्यांची मानसिकता तयार केली जाते .......लहानपणा पासून तस सांगितल्या  जात ...............मुलांना याचा त्रास थोडा कमी होतो .....पण होतोच ........रंगापेक्षा गुण महत्वाचे हे शिकवणारी  घर आजही आपल्या समाजात कमी आहेत हे  आपण बघतो ......असो .... जरा विषयांतर झालं ......


कधी कोणी विचारल तुझा आवडता रंग कुठला .....तर एक ,  दोन कधी तिसरा रंग सांगू आपण ...... खरंच असे थोडेच रंग आवडतात का सगळ्यांना......रंग हे सुदधा परिस्थिती प्रमाणे आवडते होतात कधी नावडते होतात ......खरं नाही वाटत .......बघा  ......आपले कुठलेही रंग आवडते असले तरी   flag चे रंग म्हंटल की आपल्याला तिरंग्याचे रंगच आकर्षित  करतात .....हो न ......एकदा  अटारी बॉर्डर वर जाऊन हातात तिरंगा धरून पहा ......त्या
रंगाकडे पाहून किती अभिमान वाटतो ......त्यावेळी त्या पेक्षा कुठलाच दुसरा रंग सुंदर दिसत नाही .......

ज्या काळ्या रंगाला कुठल्याही पवित्र कार्यांत पूर्वी नाकारल्या जात होतं .....त्यावेळी सुद्धा शाळेतल्या पाट्या आणि फळे काळ्या रंगाचेच होते ......त्या फळ्यांना नाही कुणी वाईट म्हंटल ना त्याचा रंग  कधी कुणी बदलला ......बरोबर न ......त्याच कारण कदाचित हे सुद्धा असू शकेल  की काळ्या रंगावर जर पांढऱ्या रंगाने लिहिलं तर ते सगळ्यात मागे बसणाऱ्या विद्यार्थ्याला पण नीट दिसत.....

काळे कपडे सणावाराला घालायचे नाहीत असा दंडक करणारे घरच्या लहान मुलांना तीट ही काळीच लावत ......डोळ्यात काळ काजळ घालणं हे त्यावेळच प्रसाधन   ......

पांढरा रंग हा पावित्र्याचा रंग मानला जातो पण पूर्वी या रंगाचे कपडे घालणं याला सुतकी कपडे घातले अस म्हंटल जायचं ......किती परस्पर विरोधी विचार होते .....एवढंच कशाला जर त्यावेळी कुणी व्यक्ती चांगली नाही हे सांगायचं असेल तर ती व्यक्ती पांढऱ्या पायाची आहे असं म्हटलं जातं होत ......मग पांढरा रंग हा पवित्र की नाही .....हे कदाचित त्यावेळी लोकांना नीटसं ठरवता आलं नसावं .....असो आज या सगळ्या गोष्टींपासून खूप दूर आला आहे समाज ......

रंग म्हंटल की अजून किती वाक्य आठवतात बघा .....आज पावसाचा रंग दिसतोय .....रंगेल माणूस आहे ......रंगीत तालीम सुरू आहे ...........रंग बदलेले दिसतायत .......कधी रंग पालटले कळणार पण नाही ........आज गप्पा मस्त रंगल्या .......रंगरंग करतो बाबा तू .......या वाक्यात रंग म्हणजे नेमकं काय ......
आज निराळाच रंग दिसतोय याचा......यातला रंग म्हणजे .....
रागरंग काही नीट नाही दिसत याचे ......यातला रंग म्हणजे ........मुझे रंग दे या  गाण्यातला रंग म्हणजे ......रंग दे बसंती चोला  यातला ........रंग भरे बादल से रंग चुरा के  यातला ....अशी खूप गाणी आहेत .... .....मजा वाटते न .....आपण जेव्हा विचार करतो तेव्हा कितीतरी दुसरे....... कधी लक्षात न आलेले  पण आपण नेहमीच वापरत असलेले वाक्य प्रयोग मिळत जातात आणि त्यातले विविध अर्थ सुध्दा ... ....हो न ...... ...........wow ......मज्जा वाटते न असा विचार करायला.....गाल रंगतात बरं कधी कधी आणि कधी कधी गुलाबी  होतात गुलाबी स्वप्न पाहतांना .......थंडी सुद्धा गुलाबी असते सुरुवातीला हिवाळ्यात ................खरंच रंग या शब्दात किती रंग आहेत .....किती भाव आहेत ......प्रत्येक वाक्यागणिक रंगाचा रंग बदलत जातो..... म्हणजे  ...अर्थ बदलत जातो ......कधी त्याचा अर्थ परिस्थिती असतो तर कधी मूड .....कधी वाईट सवयी तर कधी अजून काही ......

तरीही रंग म्हंटल की पहिले आठवतात ते सुंदर रंगच .....जे पाहून मन आकर्षित होत मग ते फुलांचे रंग असो की जलचर प्राण्यांचे....... वन्य पशूंचे किंवा  पक्ष्यांचे......इंद्रधनुष्याचे.............सूर्योदय सुर्यास्ताच्या वेळी दिसणाऱ्या सुंदर आकाशाचे ........ रंग या शब्दापासून आज कितीतरी अर्थ मनुष्याने निर्माण केले असले तरी रंग हे रंगवण्यासाठी च असतात ..........काही जग , जगातल्या वस्तू रंगवतील तर काही मन ......काचेची पारदर्शक वस्तू सुंदर दिसते ......तसच रंगीत असे कॅलीडोस्कोप मधले बांगड्याचे तुकडे सुद्धा मनाला फार आकर्षित करतात ........लिलीच्या फुलांचा पांढरा शुभ्र रंग जसा मनाला प्रफुल्लित करतो तेवढाच मोराचा पिसारा मन उल्हसित करतो ........रंगेबिरंगी भरजरी नक्षीकाम केलेली शेरवानी जेवढी मनाला आकर्षित करते तेवढाच आर्मीचा गडद हिरवा रंग या बद्दल एक वेगळं आकर्षण असतं .........त्या रंगाकडे बघतांना त्यात असलेलं शौर्य सुदधा जाणवत ..... ..ते नकळत कुतूहल आणि मनात आदर निर्माण करत ........प्रत्येक रंगाची स्वतःची अशी एक गोष्ट असते ......त्यामागे काही संदर्भ असतात .... ..ते फक्त रंग नसतात तर त्या मागे एक  भावना असते ......कुठे सौन्दर्याची  तर कुठे पराक्रमाची , कुठे शालीनतेची , कुठे गौरवाची , कुठे प्रेमाची , कुठे मातृत्वाची .....ते मातृत्व काळ्या मातीचंही असू शकतं ........अशा रंगीत रंगामध्ये राहायला सर्वांनाच आवडत ....... साधी पतंग किंवा बॉल , खेळणं जरी घ्यायच असेल तरी छोटे मुलं देखील त्यात रंगेबिरंगी असलेली वस्तू  निवडतात  ......बरोबर न .......तसच ......आपण सर्वांनी सुद्धा विविध रंगांनी स्वतःच आयुष्य नटवून ते मनसोक्त जगण्याचा , आनंद घेण्याचा प्रयत्न करायला हवा..........हाती प्रयत्नांचा कुंचला धरून विविध रंग आयुष्यात भरण्यात प्रत्येक जण यशस्वी होवो हीच मनीषा .



#मुझेरंगदे , #कॅलीडोस्कोप , #रंगमाझावेगळा , #सावरकर, 

Saturday, 20 July 2019

पहिला पाऊस

पहिला पाऊस


आज पाऊस आला खूप दिवसांनी .......उन्हामुळे गरम झालेल्या जमिनीचा पाऊस पडून ओली झाल्यावर येणारा गंध .....अहाहा ....त्याला तोडच नाही......कुठलाही सुगंध त्यापुढे फिका पडतो ......मृदगंध .....हा शब्द मनात येताच गार वाटत .....हो न .....तो वारा जाणवतो ...सुगंध दरवळतो मनात ...... या शब्दातच हे सर्व करण्याची किमया आहे ......

आठवा तो लहानपणी शाळेत असतांना चा दिवस ......शाळा एकतर नुकतीच सुरू झालेली असायची किंवा अजून एकदोन दिवस असायचे शाळा सुरू व्हायला ......ज्या दिवशी पहिला पाऊस यायचा त्यादिवशी हमखास सगळी मुलं त्या पावसात भिजत खेळायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुणीही त्या पावसात भिजल्यावर रागवत नसत कपडे खराब झाले तरी ......बरोबर न .....त्यावेळी खरतर मातीला येणारा तो सुगंध आवडत असला तरी फारस काही कळत नव्हतं .....पावसात खेळणं हे प्रामुख्याने ध्येय असायचं ......शाळेतून येतांना जरी पाऊस पडला तरी नुकतीच शाळा सुरू झालेली असल्याने पुस्तक दप्तरात नसायची .....असलीच एखादी वही तर ती रफ असायची त्यामुळे ती ओली होण्याची भीती पण नसायची ......शाळा जवळ असली आणि पायी जर घरी येत असु तर......... मग तर धमाल असायची .......हमखास घरी जायला उशीर व्हायचा ......त्या पावसात दोन हात बाजूला ठेवून चेहरा वर करून पावसाचे तुषार चेहऱ्यावर घेतांना जो आनंद मिळायचा तो अवर्णनीय आहे ........घरी गेल्यावर आई दारात हातात टॉवेल घेऊन असायचीच .....हो  .....आधी बाहेर पायावर पाणी घेऊन पायाला लागलेला चिखल धुवायचा आणि मग तिने दिलेला टॉवेल घेऊन अंघोळीला जायचं .....एवढाच नियम ......आणि अंघोळ करून आल्यावर मिळणार गरम गरम दूध तर कधी गरम सूप आणि त्याबरोबर मिळणार काहीतरी गरमागरम खाण .....वा ......त्यावेळी त्या दुधाला अमृततुल्य चव असायची आणि ते खात पीत असतांना तो आईचा केस कोरडे करण्यासाठी केसातून फिरणारा पदर ......त्यावेळी केस कोरडे करत जा रे .....अस सांगतांना तिच्या आवाजातली ती काळजी .......अर्थात हे सगळं त्यावेळी काही कळत नसे ......पण आता जाणवतं .....आणि ती आठवण मृदगंधा सारखीच दरवळते ...........पहिल्या पावसाची मजाच न्यारी .....
आजही पाऊस पडला त्यावेळी या आठवणी तर आल्याच  ....पण भिजल्यावर लक्षात आलं की अरे आजकाल भिजतांना पूर्वीसारखं बिंधास्त..... मनसोक्त ....भिजत नाही आपण मोठे झाल्यावर ......सर्दी झाली तर , हा ड्रेस खराब होईल , बाहेर आहोत आपण , कुणी पाहिलं तर काय म्हणतील , मुलं शाळेतून यायची वेळ झाली ....जेवायला आज काय करायचं , केस खराब होतील .....मीटिंग ला जायचंय .....एक ना अनेक अशा विविध कारणांनी भिजायचं पुढे ढकलतो आपण आणि मनसोक्त आनंद न घेता तो क्षण तसाच रिकामा राहतो त्यात आठवणी तयारच होत नाहीत .....खरंतर प्रत्येक क्षण आपण जगलो तर कितीतरी आठवणींचे सुंदर डोंगर आपल्या आयुष्यात तयार होतील.....त्यावर कधी निवांत वेळी जाऊन बसतांना परत तो आनंद आपण अनुभवू शकू  ......पण आपणच या सगळ्या गोष्टी दूर सारतो ....वेळ नाही या नावाखाली ......बरोबर न .......

पाऊस पडून गेल्यावर ऊन पडल्यानंतर ....इंद्रधनुष्य दिसतं  ....ते कुठपर्यंत आहे हे पाहायला लहानपणी  दूरपर्यंत जाण आजही मनाला आनंद देत ......मग त्या रस्त्यावरून ते अजून मोठं दिसतं .....ते जमिनीला टेकल्यासारखं दिसतं आहे ......तर कुठे कुठल्या तरी घराच्या गच्चीवरून अजून मोठ्ठ दिसतंय अस मित्रांनी सांगितल्यावर ते बघण्याची धावपळ .......सगळं कसं मनाला आजही आनंद देत .......आजही इंद्रधनुष्य दिसलं ......छान मोठ्ठ .....

बागेतली सर्व झाडं छोटी मोठी पावसात न्हाहून निघालेली होती .......जसं लहान बाळ अंघोळ झाल्यावर दिसतं तस .....एकदम फ्रेश ......पावसाचं पाणी पिऊन टवटवीत झालेली ती झाड , पान वाऱ्यावर डोलत होती .......त्यावर पडणाऱ्या उन्हामुळे अस वाटत होतं जसा हिरवा प्रकाश पसरला आहे .......पानावरुन हळूहळू घसरत खाली पडणारे पाण्याचे थेंब ......काही पानांवर तर काही कळ्या आणि फुलांवर थांबलेले ते पाण्याचे थेंब पाहून .......लहानपणी ची आठवण झाली ........त्यां थेंबांना एकमेकांकडे नेण्यासाठी बोटाने करून दिलेली वाट आठवली .............ते थेंब मोठे होत जाऊन मग खालच्या पानावर तो मोठा थेंब पडणं पाहायला किती मजा यायची .....व्वा .........आणि नंतर तिथून मग अजून खाली जात जात हळूच मग त्यांचं एक पाण्याची धार होत खाली जाण ....ते बघण्यात होणारा आनंद .....फाटकाच्या लोखंडी ग्रिल वर मोत्यांच्या माळे सारखे दिसणारे  लटकलेले ते पाण्याचे थेंब ......तो एक एक थेंब हळूच बोटावर घेऊन हाताच्या मध्ये ते कसे गोळा होतात हे पाहण्याची मजाच न्यारी ......अहा .....पहिल्या पावसाने स्वतः बरोबर किती आठवणी आणल्यात  ......पाऊस थांबल्यावर ..... परत ते पाण्यात  फिरायला जाण .....पाण्यात कागदाची नाव तयार करून त्यांची शर्यत लावणं .....त्या मागे फिरत फिरत जाण ......ती नाव ओली होऊन बुडली तर परत दुसरी तयार करून आणणं  ......रस्त्यावर कुठेतरी सांडलेल्या पेट्रोल किंवा डिझेल च्या थेंबात दिसणारे सप्तरंग पाहणं ......त्याला काडीने हलवून परत ते दिसतात का ते पाहणं ......ते पसरवून मोठं करण्याचा प्रयत्न करणं ...........खुपसणी चा खेळ खेळणं .......तो खेळ फक्त  पावसाळ्यातच खेळायला मिळायचा .....तो खेळतांना दूर दूर पर्यंत जाण्यात जी मजा येत असे ती अवर्णनीय .....    आठवणींचा खजिनाच सापडला अस वाटतय आज .......पहिला पाऊस आला की या सगळया आठवणी तर येतातच पण पुन्हा ते सगळं करण्याची प्रबळ इच्छा पण मनाला देतात  ......सगळं जग हिरवं झाल्याचा भास होतो ......हिरवा प्रकाश पसरतो  ....मनाला टवटवीत करतो ......कुठली नवीन झाड लावावी हे विचार पण मनात यायला सुरुवात होते  ......उन्हाळ्यात करपलेली , मलूल झालेली झाडं परत मूळ धरू लागतात  ......खरंच पहिला पाऊस फक्त पहिल्यांदा बरसलेलं पाणीच नसतं तर अगदी शेतकऱ्यांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांच्या मनाला एक नवीन पालवी फुटण्यास प्रोत्साहित करणार अमृत असतं...... अस अमृत प्रत्येकाच्या आयुष्यात ते आनंदाचे क्षण परत परत आणून सर्वांचं आयुष्य प्रफुल्लित करो हीच मनीषा .



#कागदाचीनाव  , #मृदगंध  , #पहिला पाऊस

Sunday, 14 July 2019

पु ल एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व

पु ल एक अष्टपैलू व्यक्तिमत्व

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे

या नावापेक्षा खरंतर सगळे मराठी वाचक ओळखतात ते पुलंना ......पुल म्हंटल की कसं अगदी कुणीतरी आपल्या जवळच्या व्यक्तीबद्दल बोलतोय अस वाटत ....हो न ....मला तर खूपदा वाटत आलय की हा एक पूल आहे ज्यावरून जातांना कितीतरी मनाला भावणारी ,  विरंगुळा देणारी , मनोरंजन करणारी , विविध भाव मनात जागवणारी विहंगम दृश्य दिसतात.........

या विषयावर कदाचित खूप लोकांनी आणि खूप वेळा लिहिलं असेल.... मी जे लिहितेय ते मला दिसलेले पु ल ....जे सुरुवातीला बटाट्याची चाळ यातून मला पहिल्यांदा भेटले .......पुस्तकांची नावं काय काय लिहावी .....वाचली तर खुप पण आज जेव्हा या विषयावर लिहू म्हंटल तर विचार आला .......त्यांनी फक्त पुस्तकच लिहिलीत का ? ......आपण सगळे पुलंना लेखक म्हणूनच ओळखतो का ? ....  .पुलंच लिखाण समृद्ध तर होतच पण ते वाचतांना जाणवतो तो त्यातला अप्रतिम निरीक्षण करू शकणारा माणूस .....मग ते खाद्य भ्रमंती असो किंवा पर्यटन .....एखाद्या गावातलं वर्णन असो , शहरातल असो किंवा परदेशातील ......निरीक्षण शक्ती  अफाट आणि ते लिहिण्याची भाषा जेवढी समृद्ध तेवढीच मिश्किल सुद्धा .....त्यातल्या कोट्या असोत किंवा कोपरखळ्या ......कुणालाही न दुखवता विनोद कसा करावा ही खूप मोठी त्यांनी सर्वांना दिलेली एक शिकवण आहे........

विनोदी लिखाण जरी त्यांनी जास्त केलेलं असलं तरी त्यांनी जे 1970 च्या emergency मध्ये लिहिले ते काही लेख माझ्या वाचण्यात आले .....त्यावेळच्या सरकारला दिलेल्या कोपरखळ्या....त्यातली बोचणारी भाषा हे पण ते लिहू शकतात आणि ते पण इतक्या सक्षमपणे .....त्यावेळच्या सरकारला न घाबरता केलेलं ते लिखाण वाचून तर त्यांच्याबद्दलचा आदर अजूनच वाढतो ......

अजूनही मी लिहितेय ते लेखनाबद्दल .......कारण इतकं अफाट आणि अचाट करणार लेखन आहे की किती लिहावं तेवढं कमीच .....त्यात विविधताही तेवढीच .....असो .....तर असे हे पूल जेव्हा गुळाचा गणपती सारखे चित्रपट काढतात ....चित्रपटात भूमिका तर करतातच पण विविध चित्रपटांचे दिग्दर्शन करतात ...... गाण्यांना चाली देतात .......नाटककार सुद्धा होतात ........वक्तृत्वा चे कितीतरी सफल एकपात्री प्रयोग करतात  ......हे सगळं करत असतांना त्या त्या प्रत्येक भूमिकेशी समरस होऊन ती ती कला किती चांगल्या प्रकारे सफल होऊ शकेल या साठी प्रयत्न करतात ......विचार करा .....एखाद काम जर चांगलं करता येत असेल कुठल्याही व्यक्तीला ........तर ती व्यक्ती generally तेच काम आयुष्यभर करते ..........त्यात ते त्या व्यक्तीला आवडणारी कला असो अथवा कुठला व्यवसाय असो.....किंवा एखादा कलाकार ठराविक प्रकारच्या चित्रपटात काम करणं असो ......जी गोष्ट आपण यशस्वीरीत्या करू शकतो त्यात बदल करणं हे फारस कुणी करतांना दिसत नाही .......पण पुलंच्या आयुष्याचा जर आलेख पहिला तर जाणवतं की  ........  ही व्यक्ती त्या त्या क्षेत्रात उंच पोहोचल्यावर ते क्षेत्र सोडून दुसऱ्या क्षेत्रात जाऊन पण परत तेवढ्याच उंचीवर जाऊ शकते........... आणि ते सोडून परत तिसऱ्या क्षेत्रात परत तशीच उंची गाठू शकते .... .......मला तर ते पाहून खूपदा असा भास होतो ......टारझन जसा आपण चित्रपटात बघतो न .....एका झाडाची फांदी सोडून दुसऱ्या झाडाची फांदी पकडून त्या दुसऱ्या झाडावर जातो मग तिसऱ्या .....अशा अनेक झाडांवर लीलया जातो  आणि परतीचा प्रवास पण तेवढ्याच लीलया करतो आणि नंतर जमिनीवर पण तेवढयाच सहजतेने आणि आत्मविश्वासाने  चालतो......तस वाटत हे  ......हो न ......एक वाक्य वाचलं होतं मागे मी  ......एखाद काम कुणीही मनुष्य जर चांगलं यशस्वीरीत्या करू शकतो तर तो कुठलंही काम तेवढच चांगलं करू शकतो  ....केवळ तेवढा प्रयत्न किंवा अभ्यास ती व्यक्ती लक्षपूर्वक करत नाही किंवा ते काम करायला तेवढा वेळ देत नाही ..... .....बरोबर न ..... आपल्याला सगळ्यांना वाटतं की मला हेच जमत बाबा.....ते कसं जमेल ?.....मला येणार नाही ......मी कधी केलंच नाही ते .....कसं करू .......जमेल का मला ............आणि हेच केवळ हेच विचार आपल्याला मागे खेचतात ......माणसाचा मेंदू म्हणतात फक्त 10 % च वापरतो प्रत्येक माणूस स्वतःच्या आयुष्यात .....या लोकांना मात्र पाहिलं की प्रश्न पडतो आपण किती वापरत असू ?.........किती किती वेगवेगळी काम करत गेले असे लोक ..........पूल जेव्हा बंगाली शिकण्यासाठी शांतिनिकेतन मध्ये राहिले ते लिखाण वाचतांना त्यावेळचे त्यांचे अनुभव , त्यांची त्या वयातली निरीक्षण शक्ती अचंबित करते ..  .

खरंच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व हा शब्द पण अपुरा वाटतो अशा व्यक्तींबद्दल लिहितांना ...... आयुष्य पूर्ण जगणं म्हणतात ते कदाचित यालाच .......त्यांना शेवटी शेवटी बरं नसतांना घेतलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हंटल होत की सकाळी उठल्यावर मला हात पाय हलवता येतात....मला दिसतंय ,बोलता येतंय न .....मग आजचा दिवस माझा .....ज्यादिवशी झोपेतून उठल्यावर यापैकी मला एकही काम करता येणार नाही त्यादिवशी मीच राहणार नाही तर मग विचार का करायचा ......प्रत्येक दिवस नवा .....उठल्यावर आज काय करु असा विचार करण्यापेक्षा.... मी काय काय करू आज .....दिवस तर सुरू झाला .........चला ....वा असे विचार ते व्हील चेअर वर होते तेव्हाचे ........तर मग जेव्हा ते सगळं लेखन , वाचन , नाटक ,  गाणी करू शकत होते त्यावेळी त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांसाठी तर ते नक्कीच उत्साह आणि चैतन्याचा झरा असावेत ......

मला दिसलेले , भावलेले आणि उमगलेले असे हे पुल ......पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे .........एक आवडतं अष्टपैलू व्यक्तिमत्व .




#अष्टपैलूव्यक्तिमत्त्व , #गुळाचागणपती , #बटाट्याचीचाळ , #शांतिनिकेतन, #पुरुषोत्तमलक्ष्मणदेशपांडे , #पुलदेशपांडे 

Wednesday, 26 June 2019

पहाड

पहाड

पहाड म्हंटलं की डोळ्यासमोर येतो सुंदर हिरवळ असलेला मोठ्ठा डोंगर ........तसंच पहाड म्हंटल की नदी तर येणारच ......आणि सूर्योदय तसंच सूर्यास्त सुद्धा.......

लहानपणी हंमखास हे चित्र सगळ्यांनी काढलं असेल ........

एक मोठ्ठा पहाड ......त्याला  तांबडा रंग द्यायचा........त्यातून डोकावणारा अर्धा सूर्य .........कधी कधी त्याला नाक डोळे पण असायचे बरं .........पहाडाच्या पायथ्याशी वाहणारी नदी ......ती निळी .......आजूबाजूला हिरवं गवत .....1 द दुसरं झाड .....ते पण नारळाचं आणि एक कौलारू झोपडी ......त्याला 1 दार आणि एक खिडकी........घराला पायवाट ...... थोडी झुडूप.....त्यावर छोटी रंगीत फुलं ........काय ......आठवलं नं .......हे चित्र प्रत्येकाच्या मनात कसं छापलेलं आहे ........

पहाड म्हंटल की हे जसं आठवतं तसचं मोठ्ठ काहीतरी हे पण मनात येतं .....मग ते काहीही असो .........

पहाडासारखा माणूस म्हंटल की डोळयांसमोर येतं ते धिप्पाड व्यक्तिमत्व ........

पहाडासारखा आवाज म्हंटला.........की काही जणांना आठवेल त्यांच्या बाबांचा , कुण्या काकांचा आवाज.......... जो ऐकल्यावर कदाचित लहानपणी भीती वाटली असेल आणि मग  काही काळानंतर त्या व्यक्तीला ओळखायला लागल्यावर आदर सुद्धा..................

अशा आवाजाची जशी जरब असते तसंच तो आवाज ऐकायला पण आवडतो बरं .........जसं शास्त्रीय संगीत गाणाऱ्याचा आवाज जर पहाडीअसेल तर तो मधुर जरी नसला तरी ऐकावासा वाटतो .....त्यात तल्लीन होतो आपण ..........आणि तो पहाडी आवाज  जर भीमसेन जोशींचा असेल  तर......त्यांची गायलेली भक्तिसंगीत ही लहानपणापासून सगळ्यांनीच ऐकली आहेत .......ती दुसऱ्या कुणी गायली तर मनाला तेवढी भावत नाहीत .....हो नं ......

पहाडी आवाज हा तसा पुरुषांचा जास्त प्रमाणात असतो पण पहाडी आवाजात काही स्त्रियांनी गायलेली   गाणी पण खूप लोकप्रिय आहेत ........... इला अरुण , उषा  उत्तुप , यांची गाणी ......

असेच अजून कितीतरी गायक आहेत .......पण त्यावर लिहीलं तर विषयांतर होईल ..........

पहाडासारखा आधार म्हंटला की कोणी आपल्या जवळच्या व्यक्ती चा आपल्याला अगदी नेहमी .........आणि  कुठल्याही परिस्थितीत  मिळणारा भक्कम आधार......

आधार जो देतो त्याला या गोष्टींची तेवढी जाणीव नसते ......कदाचित ती व्यक्ती ते स्वतःच कर्तव्य म्हणून करत असते.......पण जी व्यक्ती तो आधार घेत असते तिला तो आधार नेहमी जाणवत असतो ................कधी तो व्यक्त केल्या जातो तर कधी गृहीत धरल्या जातो .......काही वेळा मात्र तो गमावल्या नंतर त्याची जाणीव होते .......असो .....

लहानपणी एक खेळ खेळतात सगळी मुलं ,...........

नदी कि पहाड .....आठवलं ......

या खेळात........ ज्याच्यावर राज्य आहे ....... ती व्यक्ती नदीत उभी असते आणि जी कोणी व्यक्ती  नदीत असेल तिला out करू शकते पण एकदा का दुसरी व्यक्ती पहाडावर चढली की मग मात्र ती तसं करू शकत नाही.......

हे खेळातून दिलेलं ज्ञान तर नसेल ........जो पर्यंत वाहत्या प्रवाहात ......मग तो प्रवाह कुठलाही असो ......आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर  असो ........जो पर्यंत ती व्यक्ती भक्कम असा आधार , किंवा पक्का असा निर्धार करत नाही तोपर्यंत ती या आयुष्याच्या खेळातून बाद होऊ शकते ......म्हणजे मनाने खचू शकते किंवा तिला कुणी अडवू शकतं किंवा त्या मार्गाने जाण्यापासून परावृत्त करू शकतं .......पण एकदा का ती पहाडावर चढली ........तिने पक्का निर्धार केला .........की मग मात्र तीला कुणी काही करू शकत नाही ........ध्येयापासून परावृत्त करू शकत नाही ..........मार्गात अडथळे आणू शकत नाही .......ती आयुष्याच्या या पहाडावरून त्या पहाडावर सहज रित्या प्रवास करत  जाते आणि यशस्वी होते........... बाद होत नाही ......कधी येतो एखादा असाही प्रवाह आयुष्यात की त्यात ती out होते पण परत प्रयत्न करून ती पहाडावर चढू शकते ............आयुष्याचा नदी की पहाड खेळ सुरूच राहतो .......

असा तर अर्थ नसेल .....?