Followers

Saturday, 31 August 2019

बँक

बँक



आज  बँकेत काम होतं म्हणून गेले होते ........गर्दी होती त्यामुळे थांबले .....वाट बघत होते माझा नंबर कधी येतो .....सहज येणाऱ्या जाणाऱ्यांकडे लक्ष गेलं .......येणारे आपापल्या हातातले  कागद बघत वेगवेगळ्या counter कडे चालले होते  ....कुणाचं फारसं कुणाकडे लक्ष नव्हतं ....  बाहेर जाणारे मात्र एकदा आपापले papers बघून नीट बॅग मध्ये ठेऊन मग जाता जाता आत येणाऱ्यांकडे आणि त्यांच्या हातात काय आहे याकडे बघत होते  .......counter वर बसलेले बँकेचे कर्मचारी या सगळ्या हालचालीं बरोबर काही संबंध नसल्या सारखे स्वतःच्या समोरचे पेपर्स , लोक , print outs आणि computer यात मग्न होते .......कुणी एखादी व्यक्ती ओळख दाखवून काही बोलत होती .....बाकी सगळं काही यंत्रवत सुरू होत ......आवाज होते पण सगळे एक तर विचारलेले प्रश्न , त्यांची उत्तर आणि सगळे व्यवहाराशी संबधित......बाकी आवाज होते ते ठप्प्यांचे , printer चे  , cash counting machine चे बस्स .......अस वाटत होतं की पूर्वी जेव्हा मी कधी बँकेत जायचे त्यावेळी थोडं तरी अवांतर बोलणं हे लोकांमध्ये किंवा तिथल्या कर्मचाऱ्याबरोबर होतांना दिसायचं ...एकतर आजकाल मी किंवा तस पाहिलं तर आपण सगळेच बँकेत फारसं जात नाही ......सगळी काम  online होतात .......मग जायची वेळच येत नाही .......आज माझा नंबर येण्याची वाट बघतांना  मनात विचार आला  की असंच आजकाल सगळ्यांच्याआयुष्यात देखील घडायला लागलाय .......कोण काय करतय याकडे फारस लक्ष नसत .....मी , माझ काम , माझं घर , माझं वेळ , माझं online social network ...... .......होतंय न अस .......जुन्या पिढीला आजही पुस्तकं हातात धरून वाचायला आवडतात  ......whatsapp वर chat करण्यापेक्षा फोन करून बोलायला आवडतं ......नवीन पिढीला मात्र online वाचणं , whatsapp वर chat जास्त सोयीचं वाटतं .....त्यात चूक काहीच नाही........तरी हे मात्र जाणवतंय की कुठेतरी भेटल्यामुळे , भेटायला जातांना केलेल्या प्रयत्नांची व त्यामुळे आलेल्या अनुभवांची भर मात्र आठवणीत पडत नाही ......असो जरा विषयांतर झालं...

बँकेत बसलेले असतांना कितीतरी वेगळे लोक दिसत होते .......कुणी हातात पिशव्या घेऊन आलेले लोक होते ....कदाचित शेतकरी , गावकरी असावेत  , छोटे मोठे व्यवसाय करणारे , काही बायका , काही पुरुष .....कुणी purse , कुणी sling बॅग घेतलेले , कुणी  कोट घालून आलेले तर कुणी मुलं मुली जीन्स टी शर्ट  ........त्यातले जे पिशव्या किंवा साध्या पेहेरावातले होते ते एकमेकांशी आरामात बोलत होते ,  एकमेकांचे नाव गाव विचारत होते , काय काम करतात हे विचारत होते, कुठल्या कामाने इथे आलात पासून थेट घरी कोण असतं इथपर्यंत गप्पा सुरु होत्या ........बाकीचे मात्र शांतपणे आपलं काम आणि आपण बस्स.......
याला कदाचित आजकाल नेहमी अनुभवाला येणारी फसवणाऱ्या लोकांची भीतीही कारणीभूत असू शकते ......

 बँक म्हंटल की त्यातले सगळे व्यवहार हे व्यवसाय आणि पैश्यांसंबंधी असले तरी जर अजून खोलात जाऊन विचार केला तर जाणवतं की जस आपल बँकेत खात असतं तसच खात आपल्या आयुष्याच सुद्धा आहे ........प्रवेश केल्यावर हळूहळू सगळे आपापल्या खात्यात कर्म जमा करत जातात ,  कधी गरज पडल्यास त्या जमा केलेल्या कर्माचा दुसर कुठलं कार्य करायला वापर करतात .......कर्म आणि त्याची देवाण घेवाण सुरू राहते , अगदी शेवटी बाहेर जाईपर्यंत ....जसे बँकेत निरनिराळ्या कामांसाठी निरनिराळ्या काउंटर वर जावं लागतं तसंच इथेही सगळ्यांची काम एका ठिकाणी होत नाहीत .......प्रत्येकाच्या जन्माचा उद्देश निराळा ........जसा बँकेत बदल झालाय तसाच बदल इथेही झालाय ......बँकेतली सगळी काम फारसं न बोलता यंत्रवत होतात तसच काहीस आयुष्यात घडतंय ........आजूबाजूला कोण राहत त्यांच्या बरोबर फारसा संपर्क नसतो ......जो तो स्वतः मध्ये गर्क ........बँकेत जस कोण आपल्यासमोर आहे कोण आपल्यामागे आहे .....कोण बाजूला आहे त्याकडे लक्ष न जाता .......माझं काम पट्कन कसं होईल ......आणि मी माझ्या दुसऱ्या कामाला किंवा जिथे जायचं असेल तिथे लवकर कसा जाऊ शकेन हा विचार करण्यातच  वेळ जातो , हो न.

बँकेत आपण आपल्या खात्यात जसे पैसे जमा करतो तसे आयुष्याच्या खात्यात चांगले कर्म , चांगले मित्र , चांगल्या आठवणी .....चांगले विचार .......हीच खरी ठेव आणि संपत्ती .......हीच संपत्ती अडचणीत मदतीला येते. आपल्या आयुष्याच्या खात्यात चांगले कर्म आणि चांगले लोक जमवायचे तर वेगवेगळ्या लोकांबरोबर बोलल्याशिवाय ,  भेटल्याशिवाय ,  अनुभव घेतल्याशिवाय कोण चांगलं , कोण वाईट हे कळणार कसं ?  स्वतःची काळजी घ्यायला हवीच ......मात्र ते करत असतांना स्वतःभोवतीच कुंपण असही तयार करायला नको की आत काय आहे म्हणजे ती व्यक्ती , ते व्यक्तिमत्व , त्या व्यक्ती मधले गुण , दुर्गुण हे कुणाला दिसूच नयेत .

आपलं शरीर हा एक किल्ला आहे अस जर समजलं तर मेेंदू हा त्याचा किल्लेदार आहे जो  नाक ,  कान , डोळे , तोंड या  दारातून कुणाला आत येऊ द्यायचं , कुणाला बाहेर जाऊ द्यायचं आणि कुणाला नाही हे ठरवू शकतो......म्हणजे गांधीजींचे 3 बंदर जे ज्याचं प्रतीक आहे ते म्हणा हवं तर ...........तसच आत्तापर्यंत आलेल्या अनुभवाने किंवा लहानपणा पासून मिळालेल्या संस्काराने  ,  विचाराने आपल्या भोवती जो एक संरक्षक खंदक तयार झाला आहे त्यामुळे सुद्धा स्वतःच रक्षण करण्यास मदत होते .

आत्मरक्षणाच कुंपण जरूर असावं पण उंच भिंती मात्र नसाव्यात की ज्यामुळे ना त्या व्यक्तीला बाहेरच जग अनुभवता येईल ,  न बाहेरच्या लोकांना ही आतली व्यक्ती दिसेल .........अनोळखी लोकांशी बोलतांना  काळजी घेणं ही आजची गरज आहे मात्र विश्वासाची कमी असल्यामुळे लोक  एकमेकांच्या दूर चालले आहेत हे  नक्की .......... बँकेत  दिसणाऱ्या  अनोळखी लोकांबद्दल जसा संदेह वाटतो ,  विश्वास वाटत नाही तसाच तो रोज भेटणाऱ्या लोकांवरही उरला नाही ......प्रत्येक जण त्यामुळे आत्मकेंद्री होत जातोय .......ही कोंडी फोडण तेवढं सोपं नाही. आपल्या आयुष्याच्या बँकेत चांगले कर्म आणि चांगले लोक जमा करण्याचा प्रयत्न करत राहणं एवढं मात्र आपल्या हाती  आहे...तो तिकडे हिशोब ठेवणारा चित्रगुप्त बसलाय न ......त्याला जेव्हा सामोरं  जायचंय तेव्हा हा संचय तर असायलाच हवा .

 या जग नावाच्या बँकेत आपण सगळे आलो आहोत , प्रत्येकाच्या जन्माचं उदिष्ट निराळं , प्रत्येकाचं  काम निराळं , काउंटर ही निराळं , बाहेर जाण्याची वेळही निराळी ....... बाहेर जायच्या आधी सर्वांना आपापल्या आयुष्याच्या  खात्यात चांगल्या लोकांचा , आठवणींचा , विचारांचा आणि चांगल्या कर्मांचा संचय करता येवो हीच मनीषा .



#चित्रगुप्त

Saturday, 24 August 2019

Long Drive

Long drive


आपण उद्या मस्त long drive ला जाऊ .....

आम्ही काल long drive ला गेलो होतो  .खूप छान वाटलं

एक मस्त long drive वर जाऊन ये मित्रांबरोबर  fresh वाटेल बघ छान.

अशी आणि अनेक अश्या आशयाची वाक्य आपल्या सगळ्यांचीच ओळखीची आहेत , हो न .

Long drive ला कुणी कार ने जाईल तर कुणी स्कुटरवर तर कुणी बाईक तर कुणी सायकल घेऊन तर कुणी पायी ......हसू आलं .....पायी पण जाता येत की long drive ला . आपल डोकं drive करून नेत पायांना......आपण म्हणतोही  पाय नेतील तिकडे गेलो ......काहीच ठरवलं नाही . कार ने किंवा कुठल्याही वाहनाने जातांना पण हेच होतं .....होतं न ...... हा long drive शब्द मात्र जोडला गेला आहे वाहनाला.....असो.

Long drive ला जाण्याचं प्रत्येकाचं कारण निराळं असत .....कधी नुसतच बाहेर फिरायला जाण्यासाठी तर कधी छान वातावरण आहे म्हणून तर कधी घरात बसून कंटाळा आला म्हणून तर कधी मज्जा म्हणून , कधी अशीच चक्कर मारायला तर कधी अजून काही ........वाहन पण वेगवेगळी असतात .....साध्य मात्र एकच असतं .....ते म्हणजे मन प्रफुल्लित करणं , आनंदी करणं , शांत करणं , मोकळं करणं ........आजच्या भाषेत refresh होणं . अहो computer सुद्धा जास्त वेळ काम केलं की कंटाळा करतोच न .....मग hang नावाचा time please घेतो ..... मग refresh बटण दाबलं केलं की परत कामाला लागतो .......ते जस माणसाने तयार केलेलं यंत्र तसे आपणही देवाने तयार केलेले अप्रतिम आणि आजवर कुणीही प्रतिकृती तयार न करू शकलेलं यंत्रच आहोत . माणूस आज खुप  विज्ञान प्रगत झालाय मात्र आजही तंतोतंत माणूस नावाचं यंत्र नाही तयार करू शकला . असो आता यावर लिहिलं तर विषयांतर होईल.

काय लागतं खरच आपल्याला आनंदी व्हायला, प्रफुल्लित व्हायला ......फक्त विचार बदलले की आनंदी होऊ शकतो आपण ......तरीही हे साध्य होणं जरा अवघड जातं .....खरं न .....कितीही कोणी म्हंटल की अरे सकारात्मक विचार कर  , सगळी मरगळ निघून जाईल बघ .....विचार चांगले कर ....बघ तू जे विचार करशील तसच होईल .अशी वाक्य सतत ऐकत आणि ऐकवत असतो आपण एकमेकांना .

एक खूप छान वाक्य मागे माझ्या वाचण्यात आलं .......
refreshment/rest is nothing but change of work ..........कसं आहे की सांगणं सोपं आहे ......करणं तेवढंच अवघड . हो न , अशावेळी हा long drive फार हवा हवासा वाटतो .......कधी एकटं जावसं वाटत तर कधी कोणा बरोबर ......बरोबर कुणाला न्यावं हे पण ती व्यक्ती बरोब्बर ठरवते. कुणाबरोबर संवाद साधला तर मन मोकळं करता येईल , मनाची मरगळ जाईल  , मन प्रफुल्लित होईल , fresh वाटेल  हे पण ज्याचं त्याला ठाऊक असतं. प्रत्येक वेळी एकच व्यक्ती नसते .....खूपदा असते सुद्धा .....ते त्या त्या व्यक्तीवर आणि अर्थात त्या  त्या विषयावर अवलंबून असत . कुणाबरोबर आणि काय बोलायचं हे सुद्धा व्यक्तिप्रमाणे वेगवेगळ असतं .

पायी लांबवर गप्पा मारत फिरत जाण याने जसं मन आनंदी होत ,  तसच हातात सायकल घेऊन पायी लांबवर चालत जाण यात देखील आनंद मिळतो , मन शांत होतं.  गप्पा मारून शांत तर होतच तसच मोकळं ही होत .

स्कुटर किंवा बाईक वर जातांना शांत रस्त्यावर दोन्ही बाजूंना दिसणारी झाड किंवा जातांना  कानाला लागणारा तो  गार वारा ...उडणारी ती ओढणी/पदर..... ओढणीची होणारी ती हवीहवीशी वाटणारी फडफड.......कानाशी होणारा , बोलणारा किंवा बोलणारी यांच्या आवाजाचा नाद ....त्यातून होणारा सुसंवाद ......एखाद्या प्रॉब्लेम वर मिळणारा उपाय .....सुचलेले काव्य किंवा एखादी ओळ सुद्धा मन सुखावून जाते ......मागे किंवा समोर बसलेल्या व्यक्ती चा आवाज ,सहवास ,सुगंध, स्पर्श , न दिसणारी तरीही समजणारी ती नजर..... न दिसणारे तरीही उमगलेले त्याच्या चेहऱ्यावरचे भाव ........ कधी मिश्किल तर कधी समजून घेणारे तर कधी समजावणारे..........हे सगळे मन आकर्षित तर करतातच पण शांत आणि प्रफुल्लित सुद्धा करतात ......ही refreshment फार जरुरी असते ......त्यात जर कधी रिमझिम पाऊस सुरू झाला तर वा .......एकदम राहत फतेह अली खान च आठवतो .......खुशनुमासा .....ये मौसम है जहाँ ......फारच romantic वाटायला लागलय का .....वाटू दे .....त्यातही मजा असते ......

कार मधून जाताना सुद्धा हेच अनुभव येतात ......एक आपलच विश्व असत चार दारांमधलं .....यात बाहेरच्या वाऱ्याला सुदधा शिरकाव नसतो ...... आत असणारा गारवा .....लावलेली आवडती गाणी , मंद दरवळणारा सुगंध आणि सुसंवाद किंवा क्वचित कधी फुटलेला ,  तडकलेला .....तर कधीकधी न थांबवता आलेली खूप वेळेची घुसमट , कधी आर्त स्वर तर कधी न केलेले हट्ट तर कधी समजावणीचा सूर ....तर कधी लाड तर कधी चिडचिड.......कधी कधी तर या आतल्या फक्त स्वतः साठी असणाऱ्या विश्वात बाहेरच्या वाऱ्याला सामील करून घेण्याची फार इच्छा होते आणि मग AC बंद करून खिडक्यांच्या काचा खाली करून हात बाहेर काढून .......चेहऱ्यावर ......
हातावर तो वारा घ्यायला पण solid वाटतं ......हो न ......आणि पाऊस आला तर ........मग परत तेच ......यावेळी एखाद्या वेळी शोभा मुद्गल आठवते बरं  ........घटा सावनकी .......आणि कार पण थोडी जरा speed वाढवते .......imagin करायला लागले का ......अजून वाचायचं आहे पुढे .

पायी फिरायला जातांना सुद्धा वेगळा माहोल असतो  ....एकतर आपण पुष्कळदा रस्त्यावर एकटे नसतो .......का ? ....अहो का काय .....पायी फिरायला घराजवळ जातो ना generally आपण .....असो  .....एकटं रमतगमत जाण हे सुदधा मनाला विसावा , विरंगुळा देत  कुणी बरोबर असेल तर एकमेकांच्या speed adjust करत .....बोलत .....सांगत  .....हाताला धरून तर कधी हात खांद्यावर ठेवून तर कधी गळ्यात हात घालून फिरायला जाण्यात पण आनंद मिळतो .......रस्त्याने जातांना एकमेकांना सांभाळून नेणं अशावेळी दोघेही करत असतात .....ते नकळत होत जातं .......जर रस्ता रिकामा असेल तर एखादया मध्ये आलेल्या दगडाला ठोकर मारून  उडवण .....मग परत त्या दगडापर्यंत पोहोचून कोणी परत ठोकर मारायची यात होणारी त्यांची चुरस.....जी त्या दोघांमध्ये होत असताना त्यांना मिळणारा तो निर्मळ आनंद  ......अस करत करत जेव्हा ........फारच दूर पोहोचलो आपण ......अजून घरी परत पायी जायचंय याच आकलन होऊन खूप हसू येणं  ........इतकं दूर फिरून आल्यावरही त्या थकण्यात पण मिळणारा आनंद ......अवर्णनीय ........
काय झालंय  न असं ......आठवा आठवा असे प्रसंग .......या प्रसंगाची आठवण सुद्धा तुम्हाला long drive वर घेऊन जाईल .

कधी कधी नुसतं एखाद्या आवडत्या जागी एकटं बसलं तरी मन शांत होत , कधी आवडती गाणी ऐकल्याने सुद्धा मन प्रफुल्लित होतं ......यावेळी सुद्धा आपण long drive वरच गेलो असतो ..... यात वाहन आपलं मन असतं जे विचारांवर स्वार होऊन लांब फिरून येतं.

खूप पदर असतात या long drive चे .....
दूर फिरायला जाणं एवढाच याचा मर्यादित अर्थ नसतो. Long drive म्हंटल की आता आठवेल तो मोकळा रस्ता आणि त्याबरोबर मोकळं होत जाणार मन .काय ? बरोबर न .  असच सगळ्यांना नेहमी long drive वर जाण्याची संधी मिळो आणि संधीचा लाभही मिळो हीच मनीषा .



#खुशनुमासायेमौसमहैजहाँ ,  #घटासावनकी 



Saturday, 17 August 2019

कापुसकोंड्याची गोष्ट







कापुसकोंड्याची गोष्ट

ए गोष्ट सांग न .........कापुसकोंड्याची गोष्ट सांगू ? हो ....सांग ......हो सांग काय म्हणतो कापुसकोंड्याची गोष्ट सांगू ...... सांग न लवकर .........सांग न लवकर काय म्हणतो ......कापूसकोंड्याची गोष्ट सांगू ? ......नको सांगू .......नको सांगू काय म्हणतो कापुसकोंड्याची गोष्ट सांगू ? .....बर सांग ......बर सांग काय म्हणतो कापुसकोंड्याची गोष्ट सांगू ?...... पुरे आता .....बस ......पुरे आता .....बस काय म्हणतो कापुसकोंड्याची गोष्ट सांगू ?....


आठवली ? ही गोष्ट आपण सगळ्यांनी लहानपणी ऐकली आहे .......पहिल्यांदा जेव्हा ही गोष्ट आपण ऐकतो  त्यावेळी त्या सांगणाऱ्याचा अस्सा राग येतो न ......पहिल्यांदा त्यातली गम्मत न जाणवता गोष्ट सांगणारा किंवा सांगणारी आपल्याला गोष्ट सांगत नाही आहेत तर बनवतात आहे हे  कळायलाच वेळ लागतो .....आणि कळल्यानंतर राग येतो.....होत न अस .

 त्यातली गम्मत मात्र एकदा कळली की मग मजा येते ........मग शोधू लागतो आपणही कोणालातरी..... ही गोष्ट सांगायला ........ मोठे भाऊ बहिणी असतील तर ते काही दाद लागू देत नाहीत ..... पण छोट्या भावाला ,  बहिणीला किंवा  सुट्टीत आपल्या घरी आलेल्या आपल्या आते , मामे , चुलत भावा बहिणींना ही गोष्टी सांगून चिडवण्यात मजा येते ........कोणी ही गोष्ट एको न एको ......आई बाबा मात्र खूप छान ऐकतात ही गोष्ट आणि काही कळलंच नाही असं दाखवत आपल्या त्या बालिश आनंदात सहभागी सुदधा होतात .


 मला तर या गोष्टी मध्ये फार मजा वाटते .....म्हणजे बघा.......हा खेळ.....हो हा एक प्रकारचा खेळच आहे .......जरी त्यात गोष्ट शब्द असला तरी तो दोघांनी खेळण्याचा खेळच आहे .......गोष्ट सांगू का विचारल्यानंतर  दुसरा खेळाडू त्या संवादातून पुष्कळदा स्वतःला हवं ते बोलू शकतो .....कधी असही होतं की जे एरवी सहजपणे सांगायची हिम्मत होत नाही ते या मजे मजेत सांगून मोकळ होता येत ......जर गोष्ट सांगणारा हा दादा किंवा ताई असेल तर .......मग अगदी तूझा मला राग आलाय , तू मला आवडत नाही , तू दुष्टपणा करतो , तुझे कान ओढीनं , तु दुपारी काय केलं ते मी बाबांना सांगीन ......अजून कितीतरी ......जे त्या दुसऱ्याने परत म्हंटल्यावर त्यातून निघणारा आणि स्वतःवरच उलटणारा अर्थ .....खूप मजा येते पण कधी कधी त्यात धपाटा मिळण्याचा  chance  असतो .... अशीच दुसऱ्याची फिरकी सुद्धा घेता येते ....हा खेळ संपत नाही ..... एकतर एकमेकांचं  रिपीट तरी करावं लागतं खेळात राहायला नाहीतर मग खेळ कसा बंद करावा हा विचार करता करता  दुसरी व्यक्ती मग मजा घ्यायला लागते ......गोष्ट ज्याने सुरू केली त्याला जरी नंतर ती सांगायचा कंटाळा आला तरी  मग ऐकणारा सांगणारा होऊन त्याची फिरकी घेऊ शकतो . त्यासाठी त्यातली गम्मत कळावी लागते .....आणि तो खेळ खूप मजेशीर होतो त्या दोघांसाठी आणि तिथे बाजूला त्यांची मजा ऐकणाऱ्यांसाठी सुद्धा .......जोपर्यंत दोघेही आता खरच पुरे अस म्हणत नाहीत तोपर्यत थांबता येत नाही . एक विस्मरणीय संवाद तर होतोच पण छान अशी नेहमी ओठांवर हसू येईल अशी गोड आठवण कुपीत साठवल्या  जाते .

या गोष्टीमागे हा विचारही असू शकतो का ...की जेव्हा दुसरी व्यक्ती तुमची नक्कल  करते , तुमचीच वाक्य दुसऱ्या कुठल्या संदर्भात परत बोलून तुम्हाला चिडवण्याचा  प्रयत्न करते  .....तुम्ही जे करता तस करून क्वचित शाळेत , कॉलेज ,  office मध्ये किंवा अजून कुठे तुम्ही केलेल्या कामाचं credit घ्यायचा प्रयत्न करते ......त्यावेळी रागावून न जाता  आपल्या मनाची शांतता ठेवून त्या व्यक्तीला ते तस जाणवून न देता तो खेळ त्याच्या कलाने आधी खेळत जाऊन नंतर तो आपल्यासाठी कसा उपयोगी ठरेल हे बघणं  .......कित्ती कठीण वाटतंय न ......राग येतो खरतर अशावेळी फार ......असे प्रसंग आयुष्यात  येणार आहेत ......त्यावेळी कस त्या प्रसंगांना सामोरं जाता येईल ......कसा आपल्या मनाचा शांतपणा टिकवता येईल हे  या खेळातून शिकवण्याचा प्रयत्न तर नसेल ?


कापूसकोंड्याची गोष्ट कोणी आणि कधी रचली असेल ? या मागे काय हेतू असेल ?   या शब्दाची फोड करावी तर कापूस आणि कोंडा ........दोन्ही इतके हलके की वारा तर दूरच ......साधी फुंकर घातली तरी उडणारे  ........बरं कापूस आणि कोंडा तसं पाहिलं तर दोन्ही उपयोगी वस्तू .....कापसापासून तयार केलेल्या वस्त्राने  मनुष्याच्या शरीराचं ऊन वाऱ्यापासून संरक्षण होत तर कोंडा पोटाची भूक भागवतो .......म्हणतात न खायला कोंडा आणि निजेला धोंडा ......अगदी काही जरी नाही मिळालं जेवायला .....कोंडा खाऊन पण मनुष्य आपली भूक भागवू शकतो ........मग ही गोष्ट कापूस कोंड्याची का ?

मनुष्याच्या मूलभूत गरजा .....अन्न , वस्त्र , निवारा यापैकी दोन गरजा पूर्ण करणाऱ्या वस्तूंनी कधीही पूर्ण न होणारी गोष्ट कोणी तयार केली असेल ? का ? निवारा हा एखादया झाडाखाली सुद्धा घेता येतो . वस्त्र मात्र मेहनतीने कापसापासून तयार करावं लागतं .......तसच कोंडा सुद्धा गव्हाचा काढावा लागतो त्यासाठी अगदी गहू पेरण्यापासून मेहनत करावी लागते  .........अन्न आणि वस्त्र या त्यावेळेच्या सगळ्यात मोठया गरजा होत्या . किंबहुना आजही त्याच मूलभूत गरजा आहेत. कशासाठी ?.....पोटासाठी ......असं म्हणतो न आपण नेहमी ...........यासाठी आयुष्यभर मेहनत करावी लागणार हे तेव्हाही माहिती होतं .......आजही हे खरं आहे ........मूलभूत गरजा भागवण्यासाठी मेहनत ही आवश्यक आहे आणि ती सुद्धा आयुष्यभर न संपणारी ..........म्हणून तर या न संपणाऱ्या गोष्टीच नाव कापूसकोंड्याची गोष्ट असं नसेल ? काय वाटतं तुम्हाला ?

कापुसकोंड्याची गोष्ट सांगू ?



#कापुसकोंड्याचीगोष्ट

Friday, 9 August 2019

विचार

विचार

आज विचार करत होते काय लिहावं ? विचार करू लागले आणि करता करता माझं मलाच आता आठवत नाहीये की माझ्या मनात आधी कुठला विचार आला होता ......कशावर लिहावं अस मी ठरवत होते कारण जेव्हा लक्षात आलं की मला ब्लॉग लिहायचा आहे तेव्हा तर मी माझाच कुठला तरी दुसराच  विचार करत होते .

सगळ्यांचच होतं पहा अस .....एखाद्या गोष्टीचा विचार करू म्हंटल तर कधी कधी सुचत नाही ..... कधी कधी एकटे बसले असतो आपण त्यावेळी मुंग्यांची भली मोठी रांग दिसावी तसे विचार सुरु होतात .......एखाद्या पाण्याच्या प्रवाहासारखे वाहत राहतात .....कुठून सुरु होतील आणि कुठपर्यंत जातील काहीच सांगता येत नाही .........

 विचार हे ठरवून येत नाहीत ..... आपोआप येतात ......ते थांबवणं आपल्या हातात असतं हे जेवढं खरं तेवढंच हे ही खर आहे की कधी कधी ते थांबावेसे वाटले तरी आपले प्रयत्न कमी पडतात आणि त्या विचार चक्रात आपण अजून गुंतत जातो ..... विशेषतः कुणाबद्दल , किंवा एखाद्या जुन्या प्रसंगाचा विचार करतांना ........कळत पण वळत नाही .......

हे विचार जेव्हा आपसूक येतात तेव्हा खूपदा असं होतं की विचार करूनही न सुचलेला उपाय किंवा एखादा न मिळालेला धागा सापडतो .......त्यावेळी वाटतं ....अरे हे कित्ती सोपं होतं ...... कसं नाही सुचलं मला आधी

मन शांत असतांना आपण नीट विचार करू शकतो असं जे म्हणतात ते हेच असावं ......म्हणूनच पूर्वीचे लोक  ध्यान करण्यावर भर देत असावेत .

जो विचार पहिल्यांदा मनात येतो ......त्यानंतर एकात एक असे कितीतरी निराळ्या विषयावरचे  विचार येत जातात मनात ........अगदी साधी समोर दिसलेली एक झाडाची सावली सुदधा विचार करायला भाग पाडते ......आणि ती साखळी कुठे पर्यंत जाईल याला काहीच धरबंध नसतो ........

विचार करणं चांगलं ..... विचार चांगले असणं त्याहून चांगलं ......वाईट विचारांचा आपल्या शरीरावर , प्रकृतीवर वाईट परिणाम होतो हे सिद्ध झालंय ,....... ते विचार मनात येतात हे तर खरं .......कितीही ठरवलं तरी सर्व साधारण लोकं असे विचार मनात येण्यापासून स्वतःला परावृत्त करण्यात तेवढे यशस्वी होत नाहीत .......प्रयत्न सगळेच करतात .........देह सर्वांचा सारखाच .....फरक फक्त विचारांचा....


साधं उदाहरण घ्यायचं ......तर आपली जवळची व्यक्ती जेव्हा घरी पोहोचायला उशीर होतो काही कारणाने ......कधी traffic मुळे , कधी मित्रांशी गप्पा मारत बसल्यामुळे, कधी कामामुळे , कधी अजून कुठल्या कारणामुळे .......त्यावेळी का उशीर झाला असेल या बद्दल जे विचार मनात येतात .....ते खूपदा साधे असतात का..........त्यावेळी मनाला सांगितल्या जातं .......असं झालं असेल ......तसं झालं असेल ..... मोठ्याने जरी दुसरं काही बोलल्या गेलं तरी आत खोल मनात मात्र काळजी मुळे खूप वेगळे विचार येतात हो नं .

ध्यान करतांना मन शांत ठेवा .....कुठलाही विचार करू नका असं सगळे म्हणतात ..... हे खरंच करता येतं का ......मन रिकामं ठेवणं इतकं सोपं आहे का .......विचार करायचा नाही .....हा ही एक विचारच आहे नं .

विचार करतोय हे सांगताना  शब्द  पहा किती मजेशीर वापरतो आपण सगळे .....म्हणतो न
विचार चक्र सुरू आहे ...... चक्र जे फिरत राहत .....कधी जोरात तर कधी हळू .......त्यात आपण फसत जातो ......दोरा चक्रात फिरल्या सारखे ........

विचार मंथन ..........कुठलाही मोठा निर्णय घ्यायच्या आधी मनात आलेल्या निरनिराळ्या विचारांना ढवळून  काढून ........मंथन करून शेवटी वर आलेला सुज्ञ विचार .........हे पुष्कळदा करतात सगळे ......अगदी छोटे मोठे कुठलेही निर्णय घेतांना ..........

विचाराधीन ..........काहीतरी विचार करतांना त्यात गुंतून जाणं ......त्या विचाराच्या अधीन होणं .......असं तर कधी कधी छोट्या मुलांनाही पाहतो ....... आपल्यातच गुंग असतात ती मुलं....... कित्येक वेळा तर त्यांना सांगता देखील येत नाही की ते कशाचा विचार करतात आहेत ...... मजा येते त्यावेळी ..... त्यांचे तुटक अर्धे विचार ऐकतांना ........ खूपदा ते खूप काही सांगून जातात ........फक्त ते विचार ऐकण्यासाठी ,  समजण्यासाठी  आपल्याला लक्षपूर्वक ऐकावं लागतं .

विचारवंत .......याचा अर्थ श्रीमंत सारखा वाटतो नं ........श्रेष्ठ विचारांनी परिपूर्ण .......जो विचार करू शकतो आणि दुसऱ्यापर्यंत ते पोहोचवू  शकतो .....मांडू शकतो ....... दुसऱ्यांना पटवून सांगू शकतो ......असा विचारवंत ......मग ते कुठल्याही विषयावर बोलणारे ,सांगणारे असोत ........त्यांच्या विचार करण्यात एक सुसंगती जाणवते ........अर्थात यातही दोन प्रकार आहेत ....... एक जे स्वतःला विचारवंत म्हणवतात .......आणि एक जे जाणवतात .

विचारमग्न ....झालेय न तुम्ही वाचतांना आणि असही वाटतय न की मी विचारी आहे .....jokes apart पण खरंच विचार हे फार प्रगल्भ करतात व्यक्तीला .....विचारी व्यक्तिमत्त्व हे चांगलं  असू शकतं तसच जास्त विचारी असणं हे कधी कधी मनात भीतीला ,  काळजीला दिलेलं आमंत्रण असतं  .....अर्थात ते विचार काय आहेत यावर अवलंबून असत हो न .

विचारधारा हा अजून एक थोडा विचारवंत या शब्दाचाच भाऊ म्हणूया ........ खूपदा हे विचारवंत लोक एकाच विषयाचा वेगळ्या वेगळ्या प्रकारे विचार मांडतात ........मग त्यांचे विचार पटणारे , पाळणारे , त्यांचं ऐकून तसा विचार करणारे असे समाजात वेगवेगळे ग्रुप तयार होतात .......कधी हे विषय सामाजिक बांधीलकीचे असतात तर कधी समाज प्रबोधनाचे तर कधी राष्ट्रसेवेचे तर कधी राष्ट्रहिताचे ........हे विचार कधी कधी समांतर जाता जाता ........ कुठे तरी विलीन होऊन परत समांतर जातात ...... धर्मासाठी , मोक्ष कसा मिळेल यासाठी , business strategy , देशहितासाठी शेतीच्या आधुनिकीकरणासाठी  , पर्यावरण संदर्भी अजून कितीतरी  विविध विषयांवर या चर्चा होतात .......त्यावेळी या निराळ्या असणाऱ्या विचारधारा  समांतर तर जातातच पण कुठली विचारधारा जास्त चांगली यासाठी कधीकधी कलह सुद्धा होतात असो .....हे जरा विषयांतर झालं .

तर .........विचारांती ....... असं वाटतंय .....की ......विचार .......याचा अर्थ जर कुणाला विचारला तर तो विचार करेल .....का विचारलं असेल याने , कुणाला सांगायचंय , कशासाठी हवाय अर्थ आणि मग विचारेल .......का विचारतोय तू असं ........किंवा विचारेल ......का ? कशासाठी ? कुणाला सांगायचंय ? वगैरे   वगैरे .

हा विचार शब्द त्या विचार शब्दापेक्षा वेगळा आहे ......हो नं......ज्यावर आत्ता पर्यंत मी विचार मांडले .......काय बरोबर न .

विचारांती  सर्वांचे विचार आणि विचारधारा चांगल्या आणि फक्त चांगल्या दिशेने वाहोत हीच मनीषा 

Saturday, 3 August 2019

सकाळ

सकाळ

सकाळ या शब्दातच किती प्रसन्नता आहे नं ..........

सकाळ म्हंटल की आठवतो उगवता सूर्य ..... प्रकाश  ......पक्ष्यांची किलबिल ..... ..मंद वारा .....किंचित गारवा ......वेलींवर , पानांवर , फुलांवर , गवंतांवर पडलेले दवबिंदू  .......त्यावर पडलेली सूर्याची कोवळी किरणं .....त्यामुळे दिसणार छोटंसं सप्तरंगी वलय  ........दूरवर थोडंस धुकं .....उडत जाणारे पक्षी ......झाडांवरून उडणारे ......इकडच्या झाडावरून तिकडच्या झाडांवर जाणारे  .......वेगवेगळ्या आवाजात काहीतरी सांगणारे निरनिराळ्या रंगांचे पक्षी ......सकाळी जेवढे पक्षी दिसतात तेवढे एरवी दिवसभरात कधी दिसत नाहीत ........खरंतर सगळे पक्षी वेगवेगळे आवाज करत असतात पण ते एकत्र ऐकतांना इतकं सुंदर वाटत .....त्या आवाजाला पक्ष्यांची किलबिल हे नाव कुणी शोधल कुणास ठाऊक  त्या नावातच सौंदर्य आहे ....हो न ........खूप माणसं एकावेळी बोलली तर त्याला गोंगाट म्हणू  ......किंवा कल्ला .....किंवा गोंधळ .... यापैकी कुठलाही शब्द नाजूक.... छान आवाज असा प्रतीत होत नाही .....

त्या त्या जागेप्रमाणे सकाळ सुद्धा निराळी असते  ........शहरातली सकाळ निराळी ..... गावातली निराळी ......नदीकाठची निराळी .......समुद्रकिनारी निराळी ........पहाडावरची निराळी ......पहाडाच्या पायथ्याशी निराळी ........हे निराळेपण  फार निराळं असतं ........ते सर्व
अनुभवतांना त्याच निराळेपण  भावून जात . ........

घड्याळात किंवा आजकाल मोबाईल मध्ये अलार्म झाला की झाली शहरातली सकाळ  .......मग पटापट सगळ्यांची शाळा किंवा ऑफिस ला जायची तयारी  ...स्वयंपाक ......नाश्ता .... डबे .....आणि धावपळ  .......सुट्टीच्या दिवशी काय तो थोडा आराम .....चहा ....पेपर वाचन ....... आजकाल मोबाईल वाचन  ..........

सकाळी रोज न चुकता फिरायला जाणारी जी जमात असते तिला मात्र अलार्म नको असतो ....आपोआप जाग येते त्यांना .....ते लोक खर तर सकाळ होतांना बघतात .....अनुभवतात ............घरातुन बाहेर पडतांना तसा उजेड नसतो फारसा पण कुठपर्यंत पोहोचल्यावर तांबडं आकाश दिसेल किंवा सूर्य वर येईल .....किरणं दिसतील  अथवा कुठले पक्षी कुठे दिसतील .....तसच कुठल्या शाळेची बस , मुलं कुठे दिसतील ......दिसली नाही तर ......आज मला उशीर झाला की त्याला .....की सुट्टी आहे शाळेला ......एक ना अनेक ......अशी सकाळ रोज अनुभवणं आणि यात सुद्धा वेगवेगळ्या वयातील लोकांच्या, पशु पक्ष्यांच्या सकाळच्या हालचाली निरखत आनंद अनुभवणं या सारख सुख नाही .......पावसाळा असो की उन्हाळा ......इतकी या लोकांना सकाळी एकमेकांना पहायची सवय होते की ते ते लोकं दिसले की किती वाजले असतील याचा अंदाज येतो आणि नाही दिसले तर उशीर कुणाला झाला किंवा का आले नसतील याचा अंदाज बांधून पुढे मार्गक्रमण
करणं या लोकांकडून शिकावं .....

नदीकाठी , समुद्रकाठी सकाळ होतांना पाहायला तर दुरून दुरून लोक येतात ......ती पाहतांना खरच आप , तेज , वायू , पृथ्वी आणि आकाश यांचा जो अप्रतिम संगम ... .मिलाप अनुभवायला मिळतो  .....खरंच तो तसा कुठे अजून मिळत नाही .......त्या जमिनीवर समोर समोर येणाऱ्या  आणि परत हुलकावणी दिल्यासारख्या ..... किनाऱ्याला हात लावून ....आऊट करून परत  दूर जाणाऱ्या लाटा ......पाण्यावर पसरलेली कोवळी किरणं .....त्यामुळे चकचकीत दिसणार पाणी  ..... गार हवेमुळे जाणवणारा तो हवाहवासा वाटणारा गारवा ......निरभ्र आकाश ......त्यात पसरलेला तो सूर्याचा प्रकाश .......त्यामुळे झालेलं तांबडं आकाश किंवा रंगेबिरंगी म्हणूया ......खूप रंगांची उथळण झालेली दिसते पण त्यात प्रामुख्याने तांबडा रंग जास्त असतो म्हणूनच की काय  ..... म्हणतात न .....तांबडं फुटलं .....  अशा ठिकाणी सकाळ होताना ती अनुभवणं ......वा .....पंचमहाभूतांचा तो अवर्णनीय असा एकमेकां च्या सोबत चा विलोभनीय सहवास......तो सहवास आपल्याही मनाला फार प्रसन्न करतो ..... अशी ही अनुभवलेली  सकाळ नंतर कधीही जेव्हा आठवते तेव्हा मन प्रफुल्लित करते ......हा आठवणीतला ठेवा नुसते डोळे बंद करून आठवा ......तिथला तो सुगंध आजही आठवतो .....तो प्रकाश ....ते पाण्यावर उडणारे पक्षी ....तो पाण्याचा आवाज .....ते आकाश .....ते आकाशातले रंग .....तो टरबूजा सारखा दिसणारा मोठ्ठा सूर्य ......पायांवरच ते झुळझुळणार गार पाणी , हवेतली ती छान गुलाबी थंडी.......बंद डोळ्यांना हे सर्व दिसतं आणि मनाला पाण्याचा , हवेचा गारवा देतं .......

खरतर सकाळ ही सगळ्यांसाठी होते .....अगदी डोंगर , नदीकाठी राहणाऱ्यांसाठी ......तसच गावात शहरात .....अगदी कुठेही राहणाऱ्यांसाठी ........पण कुणी ती सकाळ अनुभवत तर कुणी नाही ........कधी कुणाला वेळ नसतो तर कधी किती वाजले या पलीकडे सकाळ या शब्दाला अर्थ नसतो ...... फक्त झोपून उठणं म्हणजे झाली सकाळ .......मुलं उशिरा उठले की आई रागावते न .......झाली यांची सकाळ ......

आजकाल प्रत्येकाची सकाळ मात्र वेगवेगळ्या वेळी होते .....कुणाची सकाळ ही पहाटे 4 वाजता सुरू होते .....तर कुणाची अगदी 10 वाजता सुद्धा होते ........कारण आजकालची जीवन पद्धती  .......

 खरंच सकाळ या शब्दाचा  अर्थ इतकाच मर्यादित आहे की अजून काही अर्थ आहे याचा.....हा शब्द ज्या कुण्या व्यक्तीला पहिल्यांदा सुचला त्याला नक्की काय अभिप्रेत असेल .......

काळ म्हणजे phase ...... आयुष्यातला  टप्पा .....ती वेळ .....मग ती कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यातली असो ......आणि स म्हणजे चांगलं ......जस सकस अन्न , सद्गुण , सदभाव , सदाचार ......तसच सकाळ तर नसेल ......चांगला काळ ...........स काळ

सकाळ म्हणजे नवीन सुरुवात .....असा तर अर्थ अभिप्रेत नसेल ....  . मग ती दिवसाची असो अथवा आपल्या आयुष्यात येणार असलेल्या नविन  स्थित्यंतर बदलाची ......किंवा अजून काही .........

काही अडचण आली तरी स्वतःला किंवा दुसऱ्याला दिलासा देतांना आपण म्हणतो........ आता विचार नको करू ..... सकाळी बघू ......हो न ......कधी कुठल्या कठीण प्रसंगातून एखादी व्यक्ती जात असेल तर .....अरे रात्रीनंतर सकाळ ही होतेच ......ही पण वेळ जाईल ......सगळं ठीक होईल .....तू काळजी करू नको असा धीर देतोच न आपण .…...कधी स्वतःला तर कधी दुसऱ्याला .......ते गाणं आहे न ......फिटे अंधाराचे जाळे ....झाले मोकळे आकाश  .....ते ऐकतांना असं वाटत हाच तर खरा सकाळ शब्दाचा अर्थ आहे .......

सकाळ हा शब्द च नवीन सुरवात या कल्पनेशी जोडला गेलाय ....मग ती सकाळ नव्या दिवसाची असो किंवा कुठल्या सुरू केलेल्या कार्याची किंवा काही कठीण परिस्थिती नंतर येणारी अथवा सहज सुंदर झोप झाल्यानंतर उठल्यावर दिसणारी ......अशी सुंदर सकाळ सर्वांना जीवनात नेहमी अनुभवता येवो हीच मनीषा .......