Followers

Sunday, 30 August 2020

वर्तुळ

वर्तुळ


आज बागेत काम करतांना थकून  एका पायरीवर बसले असतांना चाळा म्हणून सहज हातातली काडी मातीत फिरवत होते . थोड्यावेळाने लक्षात आलं , अरे मी तर  गोल , त्रिकोण , चौकोन , षटकोन असे सगळे भूमितीतले आकार काढते आहे . शाळेत असतांना  compass , स्केल , divider वापरून भूमितीत सगळ्या diagram काढणं हा माझा खूप आवडीचा अभ्यास .  एक वर्तुळ  ,  त्यात त्रिकोण तर कधी चौकोन , आयताकार , benzene रिंग , tangent , secant , वेगवेगळ्या अंशाचे कोन  , perpendicular , वा खूप दिवसांनी त्या सगळ्या ची आठवण झाली . 

भूमितीतच नाही तर चित्रकला शिकतांनाही सुरुवातीला  गोल , चौकोन , त्रिकोण हेच मूळ आकार काढून रंग भरायला आपण सर्व शिकतो . बरोबर ना ? प्रत्येक आकाराचा संबंध हळूहळू दिसणाऱ्या आजूबाजूच्या वस्तूंबरोबर जोडला जातो . 

त्रिकोण म्हंटल की दिसतो डोळ्यांपुढे डोंगर , एखादी मस्त पावसाळ्यात हिरवीगार झालेली टेकडी , पेपरचे तयार केलेले बाण जे दोन हातात धरून बरोब्बर नेम धरून वर्गात दूर बसलेल्या मित्रांवर झुउउऊ करून फेकायचे असतात ते . आठवले ? तर कधी आठवतात छान ग्रिल केलेले चीज sandwich , कधी बरमुडा ट्रँगल ही आठवतो . बरमुडा ट्रँगल बरोबर जोडल्या गेलेल्या गूढ आणि रम्य कथा हेही या आकर्षणाच मूळ असतं . प्रत्येक आकार हा निरनिराळी आठवण देऊन जातो . बरोबर ना ?  

चौकोन  म्हंटला की आठवतात शंकरपाळे ,  शाळेतला फळा . त्यावर  काढलेली चित्रही . शाळेतले डेस्क , त्यावर खडूने , पेनने काढलेली चित्र , नांव , हो ना ? त्यात खाली लपवून  वर्ग सुरू असतांना खाल्लेली चोकोनी डब्यातली भाजी पोळी .  चित्रकलेच्या वर्गात पहिल्यांदा काढलेलं घर देखील तर चौकोनीच काढतो आपण , त्यावर मग एक त्रिकोणी टोपीही घालतो कौलारू घर दाखवायला . त्या घराचं दार चौकोनीच असतं , असतं ना ? 

गोल शब्द म्हटला की आठवतो लहानपणीचा ' गोल गोल राणी ' हा खेळ . पृथ्वी गोल , चंद्र , सूर्य गोल देवांच्या डोक्यामागचं वलय गोल , 
ट्राफिक सिग्नल चे light गोल , कंचे , मणी , मोती गोल . इतकंच कशाला कुठल्या होंर्डिंग वर VIP लोकांच्या फोटोना गोल वलय असतं . पूर्वी दूरदर्शनवर संध्याकाळी कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी दिसणारा , अंतराळात विलीन होत जाणारा तो गोल , ते संगीत आजही आठवतं .  कुठलीही लिपी लिहितांना गोल आकारचा खूप उपयोग केल्या जातो , कुठे अर्ध गोल , कुठे पूर्ण तर कुठे लंबोळका गोल.  

भूमितीत खरतर अजून भरपूर आकार  आपण शिकतो , काढतो , तरी खरी सुरुवात होते ती त्रिकोणापासून . कोन कुठलाही असो ,  त्रिकोण अथवा चौकोन असो , त्याला टोक हे असतंच  . टोक हे टोकदार असतं , हो ना ?  दृष्टिकोण देखील टोकाचा असेल तर टोचतोच. कोन आला की टोचलाच म्हणून समजा . यात एकप्रकारची बंदिस्त भावना जाणवते . त्रिकोण असो अथवा चौकोन , तो आखीव रेखीव असतो .  बंदिस्त असतो . त्याच्या बाहेर जाता येत नाही . जस एक छान नौकरी , घर , संसार , आपले छंद , मित्र  या काटकोन त्रिकोणात म्हणा अथवा चौकटीत आपण सगळे जगत असतो तस . चौकट म्हंटल की चार दिशा स्पष्ट असतात . काही वेळा या  4  न राहता त्या वाढत जातात , दशभुज म्हणा ना?  

चौकोनाच्या दाही दिशा सांगता येतात , पाहता येतात मात्र या चौकोनाच्या बाहेरही एक वर्तुळ आहे हे फार कमी लोकांना लक्षात येतं . 

भगवान बुद्ध हे एका वैभवशाली राजा शुद्धोधनाचे पुत्र होते . समृद्ध राज्य , बायको , मुलगा सगळं काही होतं . पुढे चक्रवर्ती राजेही  झाले  असते . एका वैभवशाली  चौकटीत राहत होते . ते ती वैभवशाली चौकट मोडून बाहेर न पडते  तर आज चक्रवर्ती राजा सिद्धार्थ म्हणून किती लोकांच्या आणि किती वर्षे लक्षात राहिले असते ? 

शहाजी राजे , जिजामाता यांची  त्यावेळी एक सरदार म्हणून समृद्ध चौकट होती . पुढच्या पिढया  बसून खाऊ शकतील इतकी संपत्ती होती . ती समृद्ध चौकट मोडून ते बाहेर पडले नसते  तर ? तर आज राजे शहाजी, जिजाऊं , त्यांनी घडवलेले शिवाजी महाराज  किती लोकांना माहिती असते ? 

संत तुकाराम सावकार होते . शेती विषयक ज्ञानी होते . प्रतिभावान कवी होते . त्यांच्या अभंगातून त्यांचे शेतीविषयक ज्ञान , प्रतिभा जाणवते .  ते देखील त्या समृद्ध चौकटीतच राहिले असते तर ?  त्यांनीही जे केले ते न करते तर ? सावकार तुकाराम म्हणून किती काळ लोकांच्या आठवणीत ते राहिले असते ? अशी एकापेक्षा एक सरस  उदाहरणे आपण सर्व जाणतो .

वर्तुळाचा  नियम आहे , जेथे आरंभ तेथेच समाप्ती. चौकटीत शिरून बहुतांशी सर्व तिथेच  वर्तुळाकार  गोल गोल फिरत राहतात .  चौकटीच्या बाहेर अजून  एक वर्तुळ आहे हे लक्षात येणारे कमी . खरतर वर्तुळाच्या अगणित दिशा आहेत .  मध्यबिंदू पासून हव्या त्या दिशेला कुठेही जाता येत .  त्याचा आवाका अमर्याद असतो .  

गाडगे बाबा , ज्योतिबा फुले ,  नेताजी सुभाषचंद्र बोस , बाबा आमटे अश्या कितीतरी लोकांची नाव आपल्या सर्वांना ज्ञात आहेत .  जुन्या वेळेचे लोक असोत अथवा नवीन . सामान्य लोकं चौकटीत जगतात आणि असामान्य लोकं त्या चौकटीला भेदून विश्वात्मक वर्तुळाचे प्रवासी होतात , महान होतात तर काही गौतम बुद्धांसारखे त्या वर्तुळालाही भेदून विश्वव्यापी होतात .



#वर्तुळ  , #विश्वव्यापी , #गौतमबुद्ध , #geometry 





Sunday, 16 August 2020

उपमा

उपमा

आज " श्रावणात घन निळा बरसला " हे गाणं रेडिओवर सुरू होतं , बाहेर पाऊसही पडत होता . ते ऐकतांना कदाचित मी शांत एकटी बसले होते म्हणून की काय , एकूणएक  शब्द अगदी लक्षपूर्वक ऐकत होते .  लहानपणापासून  हे गाणं ऐकतेय .  आज त्यातले शब्द न शब्द परत ऐकतांना जाणवलं , या गाण्यातून , आपण सर्व ,  श्रावण कित्ती वर्ष जगतोय , अनुभवतोय  . मंगेश पाडगावकरांचे शब्द ,  श्रीनिवास खळे यांच्या संगीत आणि लता मंगेशकर यांच्या आवाजाने गुंफलेलं हे सुंदर गाणं ऐकल्यावर  असच वाटतं , हो न ? किती सुंदर शब्द ,  कित्ती सुरेख आणि आकर्षक उपमा . व्वा ! रिमझिम रेशीमधारा , पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे , स्वप्नांचे पक्षी , रंगांच्या रानात , थेंबाचे फुलपाखरू , अप्रतिम । अप्रतिम !  अगदी डोळ्यांसमोर  ते चित्र उभं राहतं .  साध्या सोप्या सहज भाषेतूनही मनापर्यंत पोहोचणारी , आजही पाठ असणारी शाळेतली कविता . ' श्रावण मासी हर्ष मानसी ' ही तर आजही  श्रावणाचा सुंदर अनुभव मनाला देते . हो न ?

उपमा हा भाषेचा एक अलंकार . अलंकार घातल्यावर मूर्ती असो वा मनुष्य , त्यांचं सौन्दर्य वाढतं . त्याचप्रमाणे वेगवेगळे अलंकार घातल्यावर भाषाही जास्त आकर्षक वाटते . जस ,  पुस्तकात वाक्य असेल "  मुख खूप सुंदर आहे ' तर सुंदर म्हणजे नक्की कसं याची कल्पना  येत नाही .  तेच जर वाक्य असेल ,  ' मुख म्हणजे जणू कमळच ' हे वाक्य वाचल्यावर ती व्यक्ती जरी काल्पनिक असली तरीही ती  किती सुंदर असेल याची  कल्पना उपमा वाचून ,  करून आपण पुढे वाचू लागतो . बरोबर न ?

जसा जसा अजून यावर विचार करू लागतो तस तस कित्ती लेखक , कवी , त्यांनी लिहिलेली पुस्तकं , त्यातली अलंकारिक भाषा , तर कधी मनाला भावणारी साधी , सोपी , सहज , तरीही सुंदर अशी वर्णन  आठवतात . ' जे न देखे रवी ते देखे कवि' याची वारंवार प्रचिती येते .

उपमा फक्त गद्य किंवा पद्म यातच दिल्या जातात अस नाही . आपल्या दैनंदिन जीवनातही आपण त्या ऐकत असतो . उपमा कधी मजेदार असतात , कधी उपरोधक असतात तर कधी लाडाने , प्रेमाने दिलेल्या असतात . उपमा ऐकल्यावर ती व्यक्ती किंवा वस्तू डोळ्यासमोर उभी रहाते .

लहान मुलांचे पुऱ्यांसारखे गाल म्हंटले की तळताना टम्म फुगलेली पुरी आठवते . गाल अगदी रसगुल्ला आहे म्हंटलं की नक्कीच ते मूल खूप गोड असेल असं वाटतं , वाटतं न .

भोपळा , माठ ,  मिरची त्यातही लवंगी मिरची , कमची , काकडी , चवळीची शेंग , सुतासारखा सरळ , हरिश्चंद्र , भोळासांब , लक्ष्मी नारायणाचा जोडा हे आणि असे बरेच शब्द ऐकले की ती व्यक्ती कशी असेल याचा त्या व्यक्तीला न पाहताही अंदाज बांधता येतो . येतो न , आणि आठवले ही असतील आपल्याच आजूबाजूचे लोक , आठवले न ?

निरनिराळ्या उपमा निरनिराळ्या ठिकाणी अनपेक्षित , अचानक जेव्हा सुचतात किंवा ऐकू येतात त्यावेळी  हसू येतं . समोरून कुणी खूप हळू चालत येत असेल  तर ,  ' ' काच नाहीये खाली , ये पटकन धांवत ' अस चिडवल्या जात तर 'अगदी हळू ये  , जपून ये हं  ,  हे सांगायला ' खाली काच आहे असं समजून चाल ' अस सांगितल्या जात.  उपमा एकच मात्र एका वाक्यात मिश्किल भाव आहेत तर एकात काळजी . आहे न मजा ?

एक उपमा आणि त्यावरचा विनोद नेहमी वाचल्या आणि ऐकल्या जातो ,  ' प्रेमाला उपमा नाही ' का ?  तर म्हणे ' घरात रवा नाही ' . हा विनोद म्हणजे ' प्रेम ' आणि ' उपमा '  यातला बादरायण संबंध जरी असला तरी , जरा विचार करा  ,  की या रव्याच्या पदार्थाचं नाव उपमा कुणी ठेवलं असेल ?  आणि का ? 

बघा हं , रवा हे काही पीठ नाही , बरोबर  ? रव्याचा प्रत्येक कण वेगळा असतो  .  रवा जेव्हा भाजला जातो , तप्त होतो त्याचा रंग सुंदर तांबूस होतो . जास्त भाजला गेला तर जळतो , कमी भाजला तर उपमा खमंग होत नाही . त्यात कढीपत्ता , कांदा ,  मिरची , शेंगदाणे आणि आवडीप्रमाणे बरच काही यांची फोडणी घालुन आवश्यक तेवढं पाणी घातलं की झाला खमंग  उपमा तयार . पाणी कमी झालं तर तो घट्ट होणार , जास्त झालं तर पातळ , बरोबर न ? वरून सजवायला कोथिंबीर आणि जोडीला खोबऱ्याची चटणी  असेल तर मग , अहाहा !  तसच तर आहे न आयुष्यही. रव्याचा एकेक कण म्हणजे  जसा आयुष्यातला एक एक दिवस . रवा ज्याप्रमाणे भाजला जातो , खरपूस होतो त्याचप्रमाणे आयुष्याच्या उन्हात एक एक दिवस जगतांना ,  त्यात तावून सुलाखून निघतांना व्यक्तीवर परिपक्वतेचा  रंग चढायला लागतो . परिपक्व व्यक्तीच्या जीवनाला  सुख , दुःख  यांची  फोडणी असतेच .  त्यात शिक्षण , ध्येय , काम , सहनशीलता , जबाबदारी आणि बरंच काही  घातल्या जातं . त्यात घालायचं मेहनतीचं पाणी , ते मात्र आवश्यक तेवढं हवंच  की झाला खमंग आणि मऊसूत उपमा तयार . त्याला समाधानाची जोड असेल तर क्या बात है ।




#प्रेमालाउपमानाही, #श्रावणमासीहर्षमानसी, #श्रावणातघननिळाबरसला, 

Saturday, 8 August 2020

भाषा

 भाषा


भाषेची साधी व्याख्या म्हणजे  आपल्या अंतरंगातील मनोगत , भावना , विचार इत्यादि प्रगट करण्याचे साधन . थोडक्यात भाषा हे अभिव्यक्तीचे साधन आहे . हो न ? या साधनाचे स्वरूप नेमके कसे आहे, हे स्पष्ट करण्याचे प्रयत्न विशेषत्वाने होऊ लागले. त्यातूनच भाषाविज्ञान ही ज्ञानशाखाही विकसित होत गेली.

अक्षर अक्षर जोडलं की शब्द तयार होतात . शब्द शब्द जोडले की वाक्य तयार होतं . वाक्य वाक्य जोडत गेलं की तयार होते भाषा . 

अक्षर आणि शब्द जोडणं जेवढं महत्वाचं तेवढच तो बरोब्बर म्हणणंही . बरोबर न ? प्रत्येक अक्षराचा , शब्दांचा उच्चार कसा करावा याचं एक सुंदर प्रात्यक्षिक मी इतक्यातच पाहिलं , ऐकलं आणि लक्षात आलं की या आधी इतक्या महत्वाच्या गोष्टीकडे कधी मी लक्षच दिलं नव्हतं . कधी कुणी लक्षात आणूनही दिलं नव्हतं . त्यामुळे माझे उच्चार स्पष्ट  आहेत असा (गैर) समज होता माझा .


संत तुकाराम म्हणतात ,



आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने ।
शब्दांचीच शास्त्रे यत्न करू ।।1।।


                                                 
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन ।
शब्द वाटू धन जनलोका ।।2।।


तुका म्हणे पहा शब्दचि हा देव ।
शब्देची गौरव पूजा करू ।।3।।





हे सगळं जाणवलं जेव्हा अनघा मोडक यांच्या संवादशाळेत मी गेले . शाळेच्या पहिल्याच दिवशी माझं स्वतःच्या स्पष्ट उच्चारांबद्दल असलेलं मत स्पष्ट बदललं . कोणताही  शब्द बोलतांना प्रत्येक अक्षर कस उच्चारावं , आद्याक्षरांपासून ते  ओष्ठव्य , कंठव्य , तालव्य अशी सगळी वेगवेगळी अक्षरं कशी उच्चारावीत याच प्रात्यक्षिक पाहिल्यावर जाणवलं , कित्ती शिकायचं आहे अजून आपल्याला .


भाषा म्हणजे फक्त अक्षर , शब्द , वाक्य , विरामचिन्हे इतकंच आहे का ?  अक्षरांचे तयार केलेले  शब्दरुपी मणी  एकसारखे  माळेत गुंफले गेले की ती मोहक वाटते . ते मणी जर चकाकते मोती असतील तर क्या बात है . या माळेत असूनही न दिसणारा आणि त्या सर्व मोत्यांना बांधून ठेवणारा भावरुपी धागा हा त्या मौक्तिक माळेच सौन्दर्य अजूनच वाढवतो . तो धागा साध्या दोऱ्याचा असो , रेशमी असो ,चांदीचा अथवा सोन्याचा . तो फक्त नाजूक , सुबक  असून चालत नाही . सर्व मोत्यांना एकत्र धरून ठेवण्यासाठी ,  हवं तिथे वळवण्यासाठी तो मजबूतही असावा लागतो आणि लवचिकही .  शब्द अर्थ जरी सांगत असले तरी ते बोलतांना त्यात उमटणारा भावही तेवढाच महत्वाचा असतो . वाक्य बोलतांना एखाद्या अक्षरावर , शब्दावर  उच्चारतांना दिलेला जोर त्या त्या शब्दाचं वजन वाढवतात ,  त्यातला भाव प्रकट करतात तर कधी एखाद्या अक्षरावर किंवा शब्दावर दिलेल्या चुकीच्या जोरामुळे त्या शब्दाचं वजन कमी करतात तर कधी त्यात चुकीचा भाव उतरवतात ,  जो काही वेळा बोलणाऱ्या व्यक्तीच्या मनातही नसतो . 

जगात  कुठल्या भाषा बोलल्या जातात अस  कुणी कधी विचारलं की लगेच मराठी , हिंदी , संस्कृत , उर्दू , तेलगू , कानडी ,  इंग्रजी , जर्मन , फ्रेंच , रशियन अशी उत्तरच पटकन मनात येतात . वेगवेगळ्या जाती ,  धर्मांच्या , देशांच्या , प्रदेशांच्या भाषा वेगवेगळ्या असल्या तरी कुणी जसं म्हंटलय तस  प्रत्येक 10 मैलांवर भाषा बदलत जाते . बरोबर न ?  प्रत्येक भाषेला स्वतःचा एक बाज असतो , एक नाद असतो , एक लय असते . ती भाषा ऐकतांना  लगेच लक्षात येते . अगदी एकाच मोठया शहरात राहणारे  लोक सुद्धा निरीक्षण केलं तर नक्की शहरातल्या कुठल्या भागात राहत असतील हेही ओळखता येत . अर्थात बदलत्या काळानुसार भाषेत बदल होत गेल्याचही आपल्याला दिसून येत.

हे सगळं असलं तरी थोडा अजून विचार केला तर वाटतं , खरंच जगात इतक्याच भाषा आहेत का ? अजून कितीतरी भाषा आपण सगळे लहानपणापासून  ऐकतो , पाहतो आणि बोलतो .  टारझन आणि मोगली यांची भेट TV आणि पुस्तकांमधून झाल्यावर तर त्यांच्या त्या जंगलात राहण्याचं  , पशुपक्ष्यांशी बोलण्याचं  आकर्षण इतकं जास्त असतं की वेगवेगळे आवाज काढून भरपूर प्रयोगही केल्या जातात . बरोबर न ? 

स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी कित्ती भाषांचा प्रयोग आणि उपयोग सर्व प्राणिमात्र करतात . करपल्लवी , नेत्रपल्लवी ,  स्पर्शाची भाषा , नजरेची भाषा , प्रेमाची भाषा , देहबोली , शाळेत असतांना आपण सर्वांनी बोललेली पम ची भाषा , सांकेतिक भाषा , पशुपक्ष्यांची भाषा ,  सध्या प्रचलित असणारी संगणकाची भाषा या आणि अशा अजून खूप भाषा . काही भाषा या आपोआप येतात , काही निरीक्षण करून येतात तर काही शिकाव्या लागतात . काही वेळा विशिष्ट अर्थ व्यक्त करण्यासाठी  विशिष्ट शब्द ,   विशिष्ट खुणा अथवा संकेत किंवा टाळ्या , शिट्ट्यांचे आवाज , प्राण्यांचे आवाज हेही वापरल्या जातात .  

छोटं बाळही भूक लागली की त्याच्या भाषेत बरोब्बर दूध हवं हे सांगत . इतकंच कशाला जर आपल्याघरी पाळीव प्राणी असेल तर तो आपले शब्द ,  भाषा थोड्याच दिवसात समजू लागतो .  तसच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव , त्याला काय सांगायचं आहे  मग ते म्याव म्याव  असो , भु भु असो ,  हंबा असो किंवा अजून काही आपल्यालाही त्याची भाषा हळूहळू समजू लागते .  प्रकाश आमटे किंवा अजून तत्सम लोक वाघाच्या , सिंहाच्या डरकाळ्या , माकडाचे चित्कार  तसच  अजूनही निरनिराळ्या प्राण्यांना काय म्हणायचंय हे त्यांच्या आवाजावरून , देहबोलीवरून , हालचालींवरून समजू शकतात . ते प्राणीही या लोकांची भाषा समजतात . एकमेकांशी बोलण्यासाठी दोघांची भाषा एकच असावी असा काही नियम नाही . हो न ?


हा विचार मनात आल्यावर हेही लक्षात येत की भाषा ही फक्त आवाजाने , खाणाखुणा करून किंवा स्पर्शानेच बोलली जाते असंही तर नाही . ती ओळखलीही जाते . आपल्या जवळच्या व्यक्तीच्या मनात काय आहे हे कळण्यासाठी भाषेची गरज भासत नाही . मनाने मनाशी बोलण्याची भाषा ही न शिकवताच येते  . आपल्या लोकांबरोबर ती बोलता यायला हवी , त्यांची  समजायला हवी , आणि त्यांच्या पर्यंत ती पोहोचवताही यायला हवी . काय ? वाटतं न असं ? 

मनापासून व्यक्त केलेली आपल्या मनाची भाषा लोकांच्या मनापर्यंत पोहीचवण्यात आणि त्यांनी बोललेली भाषा ओळखण्यात आपण सर्व यशस्वी होऊ हीच मनीषा .





#computerlanguage, #संवादशाळा,