Followers

Sunday, 30 August 2020

वर्तुळ

वर्तुळ


आज बागेत काम करतांना थकून  एका पायरीवर बसले असतांना चाळा म्हणून सहज हातातली काडी मातीत फिरवत होते . थोड्यावेळाने लक्षात आलं , अरे मी तर  गोल , त्रिकोण , चौकोन , षटकोन असे सगळे भूमितीतले आकार काढते आहे . शाळेत असतांना  compass , स्केल , divider वापरून भूमितीत सगळ्या diagram काढणं हा माझा खूप आवडीचा अभ्यास .  एक वर्तुळ  ,  त्यात त्रिकोण तर कधी चौकोन , आयताकार , benzene रिंग , tangent , secant , वेगवेगळ्या अंशाचे कोन  , perpendicular , वा खूप दिवसांनी त्या सगळ्या ची आठवण झाली . 

भूमितीतच नाही तर चित्रकला शिकतांनाही सुरुवातीला  गोल , चौकोन , त्रिकोण हेच मूळ आकार काढून रंग भरायला आपण सर्व शिकतो . बरोबर ना ? प्रत्येक आकाराचा संबंध हळूहळू दिसणाऱ्या आजूबाजूच्या वस्तूंबरोबर जोडला जातो . 

त्रिकोण म्हंटल की दिसतो डोळ्यांपुढे डोंगर , एखादी मस्त पावसाळ्यात हिरवीगार झालेली टेकडी , पेपरचे तयार केलेले बाण जे दोन हातात धरून बरोब्बर नेम धरून वर्गात दूर बसलेल्या मित्रांवर झुउउऊ करून फेकायचे असतात ते . आठवले ? तर कधी आठवतात छान ग्रिल केलेले चीज sandwich , कधी बरमुडा ट्रँगल ही आठवतो . बरमुडा ट्रँगल बरोबर जोडल्या गेलेल्या गूढ आणि रम्य कथा हेही या आकर्षणाच मूळ असतं . प्रत्येक आकार हा निरनिराळी आठवण देऊन जातो . बरोबर ना ?  

चौकोन  म्हंटला की आठवतात शंकरपाळे ,  शाळेतला फळा . त्यावर  काढलेली चित्रही . शाळेतले डेस्क , त्यावर खडूने , पेनने काढलेली चित्र , नांव , हो ना ? त्यात खाली लपवून  वर्ग सुरू असतांना खाल्लेली चोकोनी डब्यातली भाजी पोळी .  चित्रकलेच्या वर्गात पहिल्यांदा काढलेलं घर देखील तर चौकोनीच काढतो आपण , त्यावर मग एक त्रिकोणी टोपीही घालतो कौलारू घर दाखवायला . त्या घराचं दार चौकोनीच असतं , असतं ना ? 

गोल शब्द म्हटला की आठवतो लहानपणीचा ' गोल गोल राणी ' हा खेळ . पृथ्वी गोल , चंद्र , सूर्य गोल देवांच्या डोक्यामागचं वलय गोल , 
ट्राफिक सिग्नल चे light गोल , कंचे , मणी , मोती गोल . इतकंच कशाला कुठल्या होंर्डिंग वर VIP लोकांच्या फोटोना गोल वलय असतं . पूर्वी दूरदर्शनवर संध्याकाळी कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी दिसणारा , अंतराळात विलीन होत जाणारा तो गोल , ते संगीत आजही आठवतं .  कुठलीही लिपी लिहितांना गोल आकारचा खूप उपयोग केल्या जातो , कुठे अर्ध गोल , कुठे पूर्ण तर कुठे लंबोळका गोल.  

भूमितीत खरतर अजून भरपूर आकार  आपण शिकतो , काढतो , तरी खरी सुरुवात होते ती त्रिकोणापासून . कोन कुठलाही असो ,  त्रिकोण अथवा चौकोन असो , त्याला टोक हे असतंच  . टोक हे टोकदार असतं , हो ना ?  दृष्टिकोण देखील टोकाचा असेल तर टोचतोच. कोन आला की टोचलाच म्हणून समजा . यात एकप्रकारची बंदिस्त भावना जाणवते . त्रिकोण असो अथवा चौकोन , तो आखीव रेखीव असतो .  बंदिस्त असतो . त्याच्या बाहेर जाता येत नाही . जस एक छान नौकरी , घर , संसार , आपले छंद , मित्र  या काटकोन त्रिकोणात म्हणा अथवा चौकटीत आपण सगळे जगत असतो तस . चौकट म्हंटल की चार दिशा स्पष्ट असतात . काही वेळा या  4  न राहता त्या वाढत जातात , दशभुज म्हणा ना?  

चौकोनाच्या दाही दिशा सांगता येतात , पाहता येतात मात्र या चौकोनाच्या बाहेरही एक वर्तुळ आहे हे फार कमी लोकांना लक्षात येतं . 

भगवान बुद्ध हे एका वैभवशाली राजा शुद्धोधनाचे पुत्र होते . समृद्ध राज्य , बायको , मुलगा सगळं काही होतं . पुढे चक्रवर्ती राजेही  झाले  असते . एका वैभवशाली  चौकटीत राहत होते . ते ती वैभवशाली चौकट मोडून बाहेर न पडते  तर आज चक्रवर्ती राजा सिद्धार्थ म्हणून किती लोकांच्या आणि किती वर्षे लक्षात राहिले असते ? 

शहाजी राजे , जिजामाता यांची  त्यावेळी एक सरदार म्हणून समृद्ध चौकट होती . पुढच्या पिढया  बसून खाऊ शकतील इतकी संपत्ती होती . ती समृद्ध चौकट मोडून ते बाहेर पडले नसते  तर ? तर आज राजे शहाजी, जिजाऊं , त्यांनी घडवलेले शिवाजी महाराज  किती लोकांना माहिती असते ? 

संत तुकाराम सावकार होते . शेती विषयक ज्ञानी होते . प्रतिभावान कवी होते . त्यांच्या अभंगातून त्यांचे शेतीविषयक ज्ञान , प्रतिभा जाणवते .  ते देखील त्या समृद्ध चौकटीतच राहिले असते तर ?  त्यांनीही जे केले ते न करते तर ? सावकार तुकाराम म्हणून किती काळ लोकांच्या आठवणीत ते राहिले असते ? अशी एकापेक्षा एक सरस  उदाहरणे आपण सर्व जाणतो .

वर्तुळाचा  नियम आहे , जेथे आरंभ तेथेच समाप्ती. चौकटीत शिरून बहुतांशी सर्व तिथेच  वर्तुळाकार  गोल गोल फिरत राहतात .  चौकटीच्या बाहेर अजून  एक वर्तुळ आहे हे लक्षात येणारे कमी . खरतर वर्तुळाच्या अगणित दिशा आहेत .  मध्यबिंदू पासून हव्या त्या दिशेला कुठेही जाता येत .  त्याचा आवाका अमर्याद असतो .  

गाडगे बाबा , ज्योतिबा फुले ,  नेताजी सुभाषचंद्र बोस , बाबा आमटे अश्या कितीतरी लोकांची नाव आपल्या सर्वांना ज्ञात आहेत .  जुन्या वेळेचे लोक असोत अथवा नवीन . सामान्य लोकं चौकटीत जगतात आणि असामान्य लोकं त्या चौकटीला भेदून विश्वात्मक वर्तुळाचे प्रवासी होतात , महान होतात तर काही गौतम बुद्धांसारखे त्या वर्तुळालाही भेदून विश्वव्यापी होतात .



#वर्तुळ  , #विश्वव्यापी , #गौतमबुद्ध , #geometry 





7 comments:

  1. खुपच छान लेख ......सुंदर.वाळूवर रेषा ओढतांना ......वेग वेगळे कोण चौकोन...वर्तूळ....वलय....नंतर महात्मे......हीच प्रतिभा लेखकाला लाभलेली ईश्वरीय वरदान आहे.अप्रतिम.

    ReplyDelete
  2. छान.... चौकटी बाहेर पडून विचार करणे आणि ते शब्दांकन करून लिखाणात आणणे तसे अवघडच.... पणं चांगले लिहिले आहे... आणि लेखकाचे हेचं तर वैशिष्ट असते व ते जाणवते हे विशेष.....

    ReplyDelete
  3. Aptly expressed standard geometric formations with spiritual touch.. Circle, the unbounded spiritual shap, though physically represented by boundary. It also represents continues motion, flow, thought process without end. Almost all natural satellites are in spherical shape, a 3D representation of circle, seems language of the Universe too..

    ReplyDelete
  4. Kavita Kamalapurkar

    Kharach aahe kahi veles tya chaukatichya baher gelya shivai dheya sadhya hoat nahit hyacha chan udaharan tumi mandlat khup chan lekh

    ReplyDelete