Followers

Sunday, 15 September 2019

लपंडाव

लपंडाव

लपंडाव हा बालपणी चा खेळलेला पहिला खेळ .......अगदी 3 , 4 महिन्याच्या छोट्या बाळाला कळणारा आणि आनंद देणारा. त्याचा किंवा आपला चेहरा यावर  पदर , ओढणी किंवा रुमाल ठेवला अगदी हात जरी ठेवला की  तो ते बाजूला करणार आणि आपला चेहरा दिसल्यावर ,  त्याच्या चेहऱ्यावर जो निरागस आनंद दिसतो तो केवळ अवर्णनीय .....तसच पडद्याच्या , दाराच्या किंवा भिंतीच्या मागे उभ राहून त्या बाळाकडे पाहून मग परत दारामागे जाणं .....खूप हसत ते बाळ आणि आपण परत कधी तस करतो याची वाट बघत .......अस तर कधी कधी एखाद्या अनोळखी बाळा बरोबर ही करतो आपण कुठे कधी एखाद्या लग्नात , हॉटेल मध्ये , प्रवासात .....वा मजा येते न असा लपंडाव खेळायला .

जसे जसे मग मुलं चालायला शिकतात तस मग आधी घरात नंतर बाहेर अंगणात मग कॉलनीत हा लपंडाव खेळू लागतात ...त्याच्या कक्षा रुंदवतात .......आधी लिंबोणीच्या झाडेमागे खरच चांदोबा लपलाय का हे आईबरोबर शोधायला जाणार बाळ त्याच आईबरोबर लपंडाव खेळून तिला बेजार करू लागत ......कधी लपंडाव खेळतांना तीचा आडोसा म्हणून उपयोग सुद्धा करू लागत जसं कधी मित्रांबरोबर movie ला किंवा  बाहेर जायचं असलं की आईच्या मागे लपून बाबांची परवानगी घ्यायला .

तसं पाहिलं तर लपंडाव हा साधा खेळ . लपलेल किंवा लपवलेलं  शोधण्याचा . तो खरंच कित्ती प्रकारे खेळता येतो . लपाछपी ही घरात , बाहेर तर खेळता येतेच तशी ती वस्तूंची ही करता येते ......मला आठवतं लहानपणी दिवाळीच्या वेळी थोडा फराळ आई नेहमी लपवून ठेवायची..... कुणी पाहुणे एकदम आले तर द्यायला ...... कारण आम्हाला सुट्या असल्याने दिवसभर आमचा फराळ सुरूच असायचा आणि कुणी आलं तर वेळेवर आईची पंचाईत व्हायची . प्रत्येक घरात आई  कुठे कुठे पैसेही लपवून ठेवते . ते कधी कधी कुठेतरी अनपेक्षित जागी आपल्यालाही सापडतात . आता आठवले ते प्रसंग की आईच्या त्या अदृश्य बँकेची कमाल तर वाटतेच तसाच तिचा अभिमानही वाटतो कारण हीच तिची बँक वेळोवेळी जेव्हा कधी पैशांची गरज पडते तेव्हा कामात येते .

लपंडाव हा सुरूच असतो मोठं झालं तरी ...... मित्रांबरोबर तर खेळल्या जातोच हा खेळ . आपण सगळे कुणाबरोबर तरी  एरवी देखील खेळत असतो लपंडाव ....कधी homework झालं नसेल तर शिक्षकांबरोबर , त्यांना आपण दिसणार नाही अशा प्रकारे वर्गात बसायचा  प्रयत्न करतो न ......कधी एखादा एखादा विषय नीट कळत नसेल , आवडत नसेल तर त्या विषयाबरोबर सुदधा लपंडाव खेळतो आपण , ते पुस्तक नजरेआड ठेवून  किंवा वर्गात लक्ष आहे हे भासवून दुसरंच काहीतरी करत राहतो आपण कारण जे शिक्षक शिकवत असतात ते कळत नसतं आणि कधी कधी ते सांगायला लाज वाटते किंवा भीती तर कधी हिम्मत होत नाही  .....हो न. अशा वेळी जर त्या शिक्षकांना आपण सापडलो तर मग काही खैर नसते ..... त्यावेळी वाटत न आपण लपुन जावं किंवा अदृश्य तरी व्हावं आणि सापडूच नये क्लास संपेपर्यंत तरी . असो .

चोर पोलिसांचा लपंडाव नेहमीच सुरू असतो . त्या लपंडावाच्या खेळात चोराला पकडायला बाकी लोक , कधी सापडलेल्या वस्तू , तर कधी चोरी झालेल्या वस्तूही पोलीसांना मदत करतात. त्यात कधी पोलीस लपलेल्या चोराला पकडण्यात यशस्वी होतात कधी नाही . हा खेळ थोडा वेगळा , थोडा सारखा .

लपंडाव बघा कसा खेळल्या जातो , घरातले मोठे लहानांपासून त्यांच्यातले वाद लपवतात . आईबाबा त्यांना असणाऱ्या काळज्या मुलांपासून लपवतात . मुलं कधी कधी घरच्यांपासून त्यांना शाळेत मिळालेली बोलणी , किंवा दिलेली ताकीद लपवतात .......होते तरीही कधी छोटी मिटिंग , आई बाबा आणि शिक्षकांची . काय आहे न  कधीतरी लपवलेलं सापडतच .


मोठे होत गेलो की लपंडाव खेळण्याची पध्दत आणि खेळाडू बदलत जातात .....मनात एक असत , ते लपवून दुसरच काही बोलणं शिकतो आपण ......कधी समोरच्या व्यक्तीला आवडणार नाही म्हणून, कधी वाईट वाटेल , कधी त्या व्यक्तीची काळजी घ्यायची म्हणून तर कधी त्या व्यक्तीची भीती वाटते म्हणून , होतं न अस . हा विचारांचा लपंडाव  असतो  .

जसा आपण दुसऱ्यांबरोबर लपंडाव खेळत असतो तसेच दुसरेही आपल्याबरोबर लपंडाव खेळत असतात .....कधी ते कळत , कधी नाही . आपल्यापासून ही काही गोष्टी , वस्तू दुसरे लपवून ठेवतात , त्याचे विचार लपवतात . ते शोधून त्या व्यक्तीला ओळखणं , परखणं हा सुद्धा एक लपंडावाचा खेळच .....हा पुढे नेहमीच खेळावा लागतो आणि त्यात कौशल्य जर मिळवलं तर पाठीवर धप्पा देऊन दुसऱ्याला आश्चर्यचकित करता येतं .

सगळ्यात जास्त जर कशाचा लपंडाव खेळल्या जात असेल तर तो आहे भावनांचा आणि विचारांचा .......कितीही काळजीत असली व्यक्ती तरी बाहेर तिला ते दाखवणं खूपदा शक्य नसतं .....ज्यांच्या समोर ती काळजी लपवायची गरज नाही असे लोक आजकाल फार कमी वेळा जवळ असतात ......त्यामुळे मग कोणी , कसा आहे विचारलं की मस्त ...असच उत्तर दिल्या जात . कधी कुठल्या , कुणाच्या आनंदाच्या प्रसंगात स्वतःला झालेलं दुःख लपवल्या जातं तर कधी याच्या उलट ही होतं .....कधी आपण लपवतो तर कधी दुसरे . ती व्यक्ती जर जवळचा मित्र अथवा नातेवाईक असेल तर हे जेव्हा कधी त्याला किंवा आपल्याला कळत तेव्हा हक्काने एकमेकांना रागवल्या जातं ..... असे ऋणानुबंध असणं फार भाग्याच .....कधी कुणापासून त्याच आजारपण लपवल्या जात तर कधी अजून काही . काही वेळेला एखाद्या व्यक्तीबद्दल म्हंटल्या जातं की या व्यक्तीच आयुष्य हे "खुली 'किताब" आहे ......अस दुसऱ्यांनी म्हणणं हेच महत्वाचे .

 विचार आणि भावनांचे लपंडाव खेळता खेळता नंतर कधी कधी या खेळाचा कंटाळा यायला लागतो . असं वाटत आता बस्स . आता सगळे बाहेर या . कुणीही लपू नका आणि काहीही  लपवू पण नका . सगळे छान एकत्र बसु , गप्पा मारू , एकमेकांना मनातलं सगळं सांगू . सुख वाटलं की वाढत आणि  दुःख वाटलं की कमी होत जे म्हणतात त्याचा अनुभव घेऊ . ऊन पावसाचा लपंडाव जसा पावसाळ्यात सुरू असतो तसा सुख दुःखाचा आयुष्यात . आपण सर्वच जमेल तेव्हा दुःखाला लपवून सुखाला शोधायचा प्रयत्न करू आणि  दुःखाला पाठीवर धप्पा देऊन आश्चर्यचकित करण्यात यशस्वी होऊ हिच मनीषा .


#लपंडाव

21 comments:

  1. सुंदर

    ReplyDelete
  2. Dr.Megha Kamlapurkar15 September 2019 at 09:26

    आपण तर लपंडाव परमेश्वराशी ही खेळत असतो. अन तो अंतरात्म्यात असून ही त्याला बाहेर शोधत राहतो.परमेश्वरही दयाळू, किती वेळा आपल्याला त्याच्या खुणा दाखवतो ,clue देतो नाहीतर अखेर धप्पा ! आपल्यावरचे राज्य जात नाही अन आयुष्यभर त्याच्याशी लपंडाव चालू राहतो.

    ReplyDelete
  3. एकदम बढ़िया!खरोखरीच वय वाढल्यावर आपण लपंडाव न खेळता एकत्र बसुन मार्ग काढ़ायला शिकल पाहिजे!

    ReplyDelete
  4. Very nice ......Keep it up......👍👍
    अप्रतिम,खुपच छान लेख!
    लिखाणाचा हा सुंदर प्रवाह सतत निखळपणे वाहत राहो......

    ReplyDelete
  5. Tujhi lekh lihinyachi paddhat khupach chhan aahe.wachtana sagla dolyansamor asta.nehami pramane ha pan lekh apratim!!!!

    ReplyDelete
  6. Kharach khupach chan prakar lapandav madhun vegveglya bhavna vyakta kelya aahet

    ReplyDelete
  7. Bhavna uttam prakare hrudayparyant pochtat vahini... Khup chhan lihilay nehmipramanech👌👌

    ReplyDelete
  8. सुंदर लेख .विषय साधाच .... पण तो मांडण्याची पद्धत उत्तम .

    ReplyDelete
  9. सुंदर लेख.विषय साधाच,पण तो मांडण्याची पद्धत फारच छान.

    ReplyDelete
  10. Vicharancha lapandav sundar madlay

    ReplyDelete